नालेसफाई, लसीकरण, बर्थडे सेलिब्रेशन, पथदिवे दुरुस्ती या मुद्द्यांवरून नगरसेवक आक्रमक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 4, 2021

नालेसफाई, लसीकरण, बर्थडे सेलिब्रेशन, पथदिवे दुरुस्ती या मुद्द्यांवरून नगरसेवक आक्रमक

 नालेसफाई, लसीकरण, बर्थडे सेलिब्रेशन, पथदिवे दुरुस्ती या मुद्द्यांवरून नगरसेवक आक्रमक

‘स्थायी’च्या ऑनलाइन सभेत आरोप-प्रत्यारोप; मनपा प्रशासनास विचारला जाब


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः चार दिवसांपासून शहरातील बंद पडलेले लसीकरण, पावसाळा सुरू झाल्यानंतर नालेसफाईची मंजूर करण्यात आलेली निविदा, पथदिवे दुरुस्ती वाहनाद्वारे नगरसेवकाने काढले आंबे, बर्थडे सेलिब्रेशन, कोवीड सेंटरमधील तात्पुरत्या उपाययोजनांवर लाखोंचा खर्च इत्यादी विषयांवर स्थायी ची ऑनलाइन सभा आरोप-प्रत्यारोपांनी काल गाजली. अनेक महत्त्वाच्या विषयांवर नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अंतर्गत नाले, गटारी सफाईसाठी कंत्राटी कामगार पुरविण्याची निविदा मंजूर करण्यात आली. नगरसेवक शाम नळकांडे यांनी यावर आक्षेप घेत पावसाळ्यापूर्वीच निविदा प्रक्रिया का राबविण्यात आली नाही?असा सवाल उपस्थित केला. आता पावसाळा सुरू झाला आहे. मोठे ओढे नाल्यांची सफाई सुरू आहे. अंतर्गत नाल्यांची सफाई ही पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक होते. मात्र प्रशासनाकडून प्रशासकीय कार्यवाही उशिरा करण्यात आल्याने आता पावसाळा सुरू झाल्यानंतर नालेसफाई प्रभावीपणे होणार का? या नालेसफाईचा उपयोग होणार का असे सवाल त्यांनी उपस्थित केले. नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनीही या मुद्द्यावर प्रशासनाचे लक्ष वेधत येत्या दोन दिवसात नालेसफाईचे काम सुरू करावे व नंतर काढण्यात आलेला गाळ उचलून नेण्याची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या.
शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम मागील चार दिवसांपासून बंद असल्याने महापालिकेच्या झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सभापती अविनाश घुले नगरसेवक सागर बोरुडे ,रवींद्र बारस्कर चांगलेच आक्रमक झाले. त्यावर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरुडे यांनी लसीचे डोस जिल्हा परिषदेकडून प्राप्त झाले आहेत. उद्यापासून शहरात लसीकरण सुरू करण्यात येईल असे सांगितल्याने त्यांचा रोष कमी झाला.
प्रकाश भागानगरे यांनी मुंबई मनपाच्या धरतीवर लस खरेदी करण्याची मागणी केली. दिव्यांगांसाठी एक दिवस ठरवून देण्याची सूचना केली. दिव्यांगांसाठी एक दिवस देता येईल हे डॉक्टर अनिल बोरगे यांनी मान्य केले. डॉक्टर सागर बोरुडे यांनी हॉस्पिटलच्या दुरुस्तीबाबत प्रश्न उपस्थित केला. शासकीय तंत्रनिकेतन येथील कोविड केंद्राच्या विद्युतीकरणाच्या खर्चाचा विषय चर्चेत आल्यानंतर बोरुडे यांनी इतर हॉस्पिटल वर खर्च करण्यापेक्षा मनपाने स्वतंत्र हॉस्पिटल उभारावी असा मुद्दा मांडला. सभापती घुले यांनी याबाबत लवकरच बैठक घेऊन एम हॉस्पिटलची इमारत घेता येईल का याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. प्रशासकीय अधिकार्‍याने कार्यालयात साजरा केलेल्या वाढदिवस प्रकरणी संबंधिताला नोटीस बजावली असल्याचे उपायुक्त प्रदीप पठारे यांनी स्पष्ट केले.  बारस्कर यांनी दोन दिवसापासून लसीकरण का बंद आहे असा सवाल केला. त्यावर प्रशासनाने चार जून पासून उपलब्ध होईल असे सांगितले. लसीकरणातील गोंधळाबाबत  तीव्र नाराजी व्यक्त करून नगरसेवक मनोज कोतकर यांनी केडगाव केंद्राला येणार्‍या कमी लसीचा मुद्दा मांडला. सभेत मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठीची निविदा मंजूर करण्यात आली. तसेच अग्निशमन विभागासाठी साहित्य खरेदीला ही मंजुरी देण्यात आली. नगरसेवक बोरुडे यांनी अग्निशमन विभागाच्या नवीन वाहनाचा मुद्दा उपस्थित केला याबाबत प्रक्रिया सुरू असून कंपनीकडून चेसी खरेदीची ऑर्डर देण्यात आल्याचे फायरफायटर शंकर मिसाळ यांनी सांगितले. येत्या तीन महिन्यात नवीन वाहन अग्निशामक दलात दाखल होईल असे त्यांनी स्पष्ट केले.शहरात मोठ्या इमारतींची संख्या वाढत असून त्यादृष्टीने वाहन खरेदी करणे आवश्यक आहे. मनपाचे याबाबत कार्यवाही करावी अशा सूचना बोरुडे यांनी दिल्या. समिती सभेच्या अजेंड्यावरील सर्व विषय सभेत मंजूर करण्यात आले.
यावेळी सभापती अविनाश घुले, नगरसेवक मुदस्सर शेख, श्याम नळकांडे, विजय पठारे, मनोज कोतकर, सागर बोरुडे, रवींद्र बारस्कर, प्रकाश भागानगरे, सुप्रिया जाधव, वंदना ताठे, सोनाबाई शिंदे, उपायुक्त डॉ. प्रदीप पठार,े यशवंत डांगे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment