दरोडेखोरांची टोळी गजाआड. ग्रामसुरक्षा दल, सोनई पोलीस, ग्रामस्थांच्या जागरूकतेचे यश. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 15, 2021

दरोडेखोरांची टोळी गजाआड. ग्रामसुरक्षा दल, सोनई पोलीस, ग्रामस्थांच्या जागरूकतेचे यश.

 दरोडेखोरांची टोळी गजाआड. ग्रामसुरक्षा दल, सोनई पोलीस, ग्रामस्थांच्या जागरूकतेचे यश.

सहाही आरोपी 25 चे आतील. दरोड्याचे साहित्य जप्त


सोनई -
सोनई परिसरातील नागरिकांची सतर्कता, चोरीच्या घटना रोखण्यासाठी युवकांची रोजची ग्रस्त, ग्रामसुरक्षा दलाच्या व्हाट्सअप ग्रुपमधील जागृकता, महेश तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांची जागृकता सोनई पोलिसांचा खबरी नेटवर्क या सर्व बाबी जुळून आल्याने मध्य प्रदेशातील दरोडेखोरांची टोळी गजाआड करण्यात पोलिसांना यश आले असून या टोळीतील सहा जणांकडून मोबाईल, घातक शस्त्र, लोखंडी कटवन, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी कटर, टाटा कंपनीची सफारी असा 5,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
धर्मेंद्र सोळंकी, अजय मालवीय, समीर खान नूर महम्मंद, राकेश सोळंकी, मिथुन सोळंकी, अशोक मालवीय हे सहा ही युवक 20 ते 25 वयोगटातील असून सोनई मोरे चिंचोडी रोडवर पकडलेले आरोपी इसम हे परराज्यातील राहणारे आहेत व बरेच दिवसांपासून ही टोळी महामार्गावरील थांबलेले वाहनांमधील डिझेल चोरी ही चोरी करताना जबरी चोरीचे गुन्हे करत असल्याची प्राथमिक माहिती तपासात मिळाली आहे. त्यांचे विरुद्ध गुन्हेगारी रेकॉर्ड ची पडताळणी सुरू आहे. त्यांच्याकडून महामार्गावरील दरोडे, ज.चोरी सोनई शहर व परिसरात काही दिवसांपासून सुरू असलेले चोरी, घरफोडी गुन्हे या आरोपींकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे.
बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये वडापाव खाण्यासाठी निळ्या रंगाच्या टाटा सफारी मोटारीतील चौघांच्या संशयास्पद हालचाली सोनईतील युवकांनी हेरल्या. गावकर्‍यांना संशय आल्याचे लक्षात येताच चोरटे सफारीमधून पसार झाले. वांबोरी रोडने वेगाने निघालेल्या या संशयितांचा ग्रामसुरक्षा दलाचे युवक व पोलिसांनी पाठलाग केला. सोनई आणि परिसरातील ग्रामस्थ गेल्या दहा दिवसांपासून चोरट्यांच्या दहशतीखाली होते. तरुणांची गस्त सुरू केल्यानंतर चोरीचे प्रयत्न थांबले तरी चोरट्यांची टेहळणी सुरुच होती. मात्र महेश तरुण मंडळाचे सदस्य, ग्रामस्थांच्या सहकार्याने सहा परप्रांतीय चोरट्यांना पकडण्यात सोनई पोलिसांना यश आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दहा दिवसांपूर्वी काही संशयित चोरटे रात्री डॉक्टर गुरसळ हॉस्पिटल जवळील शिक्षक कॉलनीत हातात हत्यार घेऊन फिरत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर दुसर्या दिवशी चोरट्यांनी महादेव मंदिराजवळील महेश चौकात चोरी करण्याचा प्रयत्न केला पण तेथील कार्यकर्त्यांनी त्यांना पळवून लावले. तिसर्या दिवशी त्यांनी महावीर पेठेतील विजय चांडक यांचे घराचे कुलूप तोडून कृष्णा चांडकवर हल्ला करून त्याला जखमी केले. महेश तरुण मंडळाच्या सदस्यांनी ग्रामसुरक्षा दल स्थापन करून चोरटे सापडत नाहीत तोपर्यंत रात्रीचा पहारा देण्याचा निर्धार करून दररोज रात्रीपासून पहाटे पाच पर्यंत पोलीस यंत्रणा व ग्रामसुरक्षा दल कार्यकर्ते, मुळा एज्युकेशन व मुळा कारखान्याचे सुरक्षारक्षक तीन दिवस जागता पहारा देत होते. याचवेळी एक संशयित निळ्या रंगाची सफारी गाडी (एपी 04 सीजी 2007) ही संशयास्पद फिरत असून हिचा शोध घेण्याचे ठरले. आज सकाळी अचानक बसस्थानक परिसरात ती गाडी आली असल्याची माहिती ग्रामसुरक्षा दलाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मिळाल्याने महेश तरुण मंडळातील सदस्य अक्षय म्हसे, शैलेश दरंदले, सचिन चांदघोडे, विशाल वने यांनी त्या गाडीचा शोध घेऊन तिचा पाठलाग सुरू ठेवून बाकीच्या सुरक्षा दलातील सदस्यांना व माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुगळे, अनिल दरंदले, दिनेश चव्हाण व सोनई पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्यांच्या मागे ठराविक अंतर ठेवून होते. शेवटी ती गाडी मोरेचिंचोरे परिसरात पकडली. त्यातील चार संशयित व्यक्ती उसाच्या शेतात पळू लागले. त्यांचा पाठलाग करून तिघांना पकडले. त्यावेळी त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली असल्याचे समजले आहे.त्यातील एक जण फरार झाला आहे. त्या तिघांना पकडून सोनई पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्या तीन साथीदारांनाही अटक करण्यात आली असल्याची माहिती समजली. महेश तरुण मंडळाच्या सदस्यांनी चोरट्यांना पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली त्यामुळे सोनई ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. या कारवाईत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, बाबा वाघमोडे, सचिन ठोंबरे सहभागी होते.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे मॅडम, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे, शेवगा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस ठाणे नियुक्तीचे सहा पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, फौजदार संजय चव्हाण, रवींद्र लबडे, बाबा वाघमोडे, अमोल जवरे, गोरख जावळे, ज्ञानेश्वर आघाव, सचिन ठोंबरे, गृहरक्षक दलाचे दरंदले, शिंदे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment