शिर्डीतील म्युकरमायकोसिसबाधित ‘त्या’ चिमुकलीची झुंज अखेर अपयशी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 16, 2021

शिर्डीतील म्युकरमायकोसिसबाधित ‘त्या’ चिमुकलीची झुंज अखेर अपयशी

 शिर्डीतील म्युकरमायकोसिसबाधित ‘त्या’ चिमुकलीची झुंज अखेर अपयशी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी  ः शिर्डी येथील सहा महिन्यांच्या चिमुकलीचा म्युकरमायकोसिसने मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. इतक्या कमी वयाच्या मुलीचा म्युकरमायकोसिसने मृत्यू झाल्याची देशातील कदाचीत ही दुर्मिळ घटना असावी. श्रद्धा कोरके असे मृत चिमुकलीचे नाव आहे. लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या सर्व तज्ञ डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र श्रद्धाला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.
वारी कान्हेगाव येथील एक कुटुंब सध्या शिर्डीतील पंढरीनाथनगरमध्ये वास्तव्यास आहे. त्यांना दोन मुली असून, लहान मुलगी पाच महिन्यांची आहे. 27 मे रोजी त्यांच्या पाच महिन्यांच्या मुलीला जुलाब आणि उलट्या होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पालकांनी तिला कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात नेले. त्यावेळी तिला ऍडमिट करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अखेर त्यांनी तिला नाशिक येथील साफल्य ट्रामा केअर सेंटरमध्ये ऍडमिट केले. तिथे तिची कोविड चाचणी केली असता, तिची चाचणी निगेटिव्ह आली. मात्र रक्ताच्या तपासणीत तिला ऑण्टिबॉडिज मिळून आल्या. तिला कोरोना होऊन गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, तिचा चेहरा, डोळा आणि शरीराला सूज येत होती. दरम्यान, उपचारात सर्व पैसे संपल्याने तिच्या पालकांनी तिला लोणीतील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तपासणीअंती तिला म्युकरमायकोसिसची लागण झाल्याचे आढळून आले होते.
प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे-पाटील, निवृत्त ब्रिगेडीयर डॉ. हेमंत कुमार, प्रवरा ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता राजवीर भालवर यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग विभागाचे प्रमुख राजीब बॅनर्जी, बालरोगतज्ञ डॉ. आमीर खान, कान-नाक-घसा तज्ञ पूजा नगरे यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू झाले. अतिदक्षता विभागात तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, संसर्ग मेंदूपर्यंत गेल्याने शर्थीचे प्रयत्न करूनदेखील तिला वाचवण्यात अपयश आल्याचे डॉ. भालवर यांनी सांगितले. कोरोना आणि म्युकरमायकोसिसने अनेकांचे बळी घेतले आहेत पण या चिमुकलीचे जाणे. काळजाला चटका लावून गेले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here