महसूल विभागाची पर्जन्यमापक यंत्रणा आता कालबाह्य - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 7, 2021

महसूल विभागाची पर्जन्यमापक यंत्रणा आता कालबाह्य

 महसूल विभागाची पर्जन्यमापक यंत्रणा आता कालबाह्य

राहुरी - गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली महसूल विभागाची पर्जन्यमापक यंत्रणा आता कालबाह्य ठरण्याची शक्यता असून 2017 मधील तत्कालीन सरकारच्या काळात महावेध प्रकल्पांतर्गत हवामान केंद्रातूनच आता ही आकडेवारी मिळणार आहे.
2017 साली झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी यंदाच्या पावसाळ्यापासून प्रत्यक्षात सुरू झाल्याने ही बाब समोर आली आहे . पावसाळ्यात प्रत्येक तालुक्यात मंडळ निहाय पर्जन्यमापक केंद्राद्वारे झालेल्या पावसाची नोंद घेऊन ती तालुका, जिल्हा ,विभागीय स्तरावर घेतली जाते. याच आकडेवारीवरून नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित निश्चित करण्यासाठी ,दुष्काळाचे मूल्यांकन, पर्जन्यमानाचे अहवाल ,पिक विमा , आदी ठरवून ते विभागस्तरावर ठेवण्याचे प्रयोजन होत होते . कृषी विभाग देखील ही आकडेवारी उपयोगात आणीत असे. याशिवाय जलसंपदा विभागाकडे धरण प्रकल्प निहाय प्रत्येक केंद्रांवर व पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमापकाची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे.
गेल्यावर्षी 22 जून 2020 च्या शासकीय आदेशानुसार महसूल विभागामार्फत मंडळ स्तरावरील मॅन्युअल पर्जन्यमापक यंत्राच्या आधारे मिळणारी माहिती वापरण्यात येऊ नये ! असे निर्देश सर्व शासकीय यंत्रणांना देण्यात आले. त्यात ही आकडेवारी असून स्तरावर ठेवण्यात येऊ नये असेही म्हटले. त्यामुळे आता केवळ महावेध प्रकल्पातील स्वयंचलित हवामान केंद्रातील पर्जन्यमापकातील पावसाची आकडेवारी गृहीत धरली जाणार आहे. म्हणून महसूल विभागाच्या मंडळनिहाय पर्जन्यमापक यंत्रना इतिहासजमा होणार काय ? असा प्रश्न या क्षेत्रातील अभ्यासक, तज्ञ मंडळी व सामान्य शेतकर्‍यांना पडला आहे.
2019 च्या खरीप हंगामापासून महावेध प्रकल्पांतर्गत केंद्रातील पावसाची आकडेवारी गृहीत धरावी असे म्हटले आहे . 8 मार्च 2017 च्या तत्कालीन सरकारच्या शासन निर्णयानुसार महावेध प्रकल्पाची सार्वजनिक - खासगी भागीदारीतून अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या अंतर्गत अंमलबजावणीसाठी सेवा पुरवठादार संस्था म्हणून स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला कराराने अधिकार देण्यात आलेले आहेत. प्रकल्पाला 7 वर्षांच्या करारावर राज्यातील महावेध प्रकल्पांतर्गत 2105 स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करून त्याद्वारे पर्जन्याची माहिती, हवामान विषयक सल्ला ,आपत्ती व्यवस्थापन ,पिकविमा, आणि बाबत अधिकार देण्यात आलेले आहेत.
या अनुषंगाने नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये 97 ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे यापूर्वीच स्थापित करण्यात आलेली आहेत . या केंद्रातून कृषी विभागामार्फत पर्जन्यमान आकडेवारी ,कृषी सल्ला, हवामान व पावसाचा अंदाज शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिला जात आहे. या शासकीय निर्णयामुळे महसूल विभागाची पर्जन्य आकडेवारी कालबाह्य होऊन आपत्ती ,दुष्काळ ,पूरस्थिती ,शासकीय मदत ,विमा,आणेवारी या सर्व शेतकर्‍यांसंबंधी निर्णयासाठी व धोरण ठरवण्यासाठी महावेध प्रकल्पाच्या आकडेवारीचाच आता आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे सध्या या विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

22 जून 2020 च्या शासन निर्देशानुसार महावेध प्रकल्पांतर्गत पर्जन्यमानाची आकडेवारी घेण्यात येत असून, राहुरी तालुक्यात सात केंद्रे कार्यरत आहेत. शेतकर्‍यांना कृषीसल्ला हवामान व पावसाचा अंदाज आदीबाबत निश्चित उपयोग होईल. - राहुरी तालुका कृषी विभाग

पुर्वी महसूलच्या मंडळ स्तरावर पावसाची आकडेवारी घेण्यात येत होती, आता ही आकडेवारी गृहीत धरण्यात येणार नसल्याचे शासन स्तरावर निर्देश प्राप्त झालेले असून स्थानिक पातळीवरच याची माहिती घेतली जाईल. - एफ आर शेख, तहसीलदार- राहुरी

No comments:

Post a Comment