काशीच्या पाण्याने पाद्यपुजन, पुष्पवृष्टी : मराठवाड्यातही आ. लंके यांचीच हवा ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 24, 2021

काशीच्या पाण्याने पाद्यपुजन, पुष्पवृष्टी : मराठवाड्यातही आ. लंके यांचीच हवा !

 काशीच्या पाण्याने पाद्यपुजन, पुष्पवृष्टी : मराठवाड्यातही आ. लंके यांचीच हवा !

बीडमधील उमापूरमध्ये आ. लंके यांचे जल्लोषात स्वागत !


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः आमदार नीलेश लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचा गौरव करण्यासाठी बीड जिल्हयातील उमापूर येथे आ. लंके  यांची काशीवरून  आणलेल्या पाण्याने ब्रम्हवृंदाच्या  मंत्रघोषात पादयपुजन करण्यात आले. आ. लंके यांचे उमापुरमध्ये आगमन होताच जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. हजारो तरूणांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात आ. लंके यांना कार्यक्रमस्थळी नेण्यात आले.
आ. लंके यांनी कोरोेना काळात केलेल्या अतुलनिय कामगिरीबबद्दल उमापुर (जि.बीड) येथील ग्रामस्थांनी त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी माजी मंत्री बदामराव पंडीत,युवा नेते रोहित पंडित,पंचायत समितीचे सभापती गोकुळ दौंड, पंचायत समितीचे सदस्य महादेव औटी, सुभाष काळे, मधुभाऊ आहेर, शिवसेना नेते रफिक शेख, मा. पं. स. सदस्य राजेंद्र चौधरी, अ‍ॅड. राहूल झावरे, अशोक घुले, बापूसाहेब शिर्के,बाळासाहेब ब्राम्हणे, अमोल उगले, संदीप चौधरी, सत्यम निमसे, गणेश भापकर, दत्तात्रेय साळुंके, अमोल दळवी, अमोल पवार आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी  बोलताना आ. लंके म्हणाले, केवळ मतदार संघातीलच नव्हे तर राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील रूग्णावर शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरात उपचार करण्यात आले. आतापर्यंत तेथून 10 हजारांपेक्षा अधिक रूग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. विशेष म्हणजे या आरोग्य केंद्रामधील एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. 30, 40 प्राणवायू किंवा 23 एचआरसीटी स्कोअर असलेल्या रूग्णांनीही तेथे कोरोनावर मात केली. कोरोनाच्या भितीमुळे 80 टक्के रूग्ण दगावतात. त्यांना मानसिक आधार देण्याचे काम आपण आरोग्य मंदीरात केले. आरोेग्य मंदीरात उपचार करताना आपण कोणताही भेदभाव केला नाही. प्रत्येक माणसाचा जिव वाचला पाहिजे यासाठी आपण काम केले.
मला कोरोनाचे औषध सापडले !
कोरोना बरा करण्यासाठी मला औषध सापडले आहे ! ते इतर कोणाला सापडले नाही. कोरोनाची बाधा झालेले 80 टक्के रूग्ण भीतीने मृत पावले. शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरात मी रूग्णांची भीती घालविण्याचे काम केले. रूग्ण बरे करण्यासाठी हायपावर इंजेक्शन अथवा गोळया वापरल्या नाहीत. रेमडेसिवरचाही वापर केला नाही. केवळ मानसिक अधार देण्याचे काम केले.  त्यातूनच सर्व रूग्ण बरे झाल्याचे आ. लंके म्हणाले.
बीडमध्ये कोरोना आहे की नाही ?
कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्यांनी मास्क लावलेले नव्हते. त्यावर बोलताना आ. लंके म्हणाले, मराठवाडयात कोरोना आहे की नाही ? कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी तज्ञांनी तिसर्‍या लाटेचे भाकीत केले आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोना प्रतिबंधासाठी काळजी घेतली पाहिजे. माझी बरोबरी करू नका. यापुढे सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन आ. लंके यांनी केले.
त्वचेची पादत्राणे केली तरी उपकार फिटणार नाहीत !
कोरोना संकटाच्या काळात उमापूर भागातील रूग्णांवर आ. लंके यांनी उपचार केले. अगदी रेमरेसिवीर इंंजेक्शनही उपलब्ध करून दिली. कोरोनामुळे सर्वत्र भितीचे वातावरण असताना आ.लंके यांनी मात्र जिवावर उदार होऊन आमच्या लोकांची काळजी घेतली. त्यामुळेच त्यांचे काशीच्या पाण्याने पाद्यपुजा करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आ. लंके यांनी आमच्यासाठी दिलेल्या योगदानासाठी माझ्या त्वचेची पादत्राणे केली तरीही त्यांचे उपकार फिटणार नाहीत अशी भावनीक प्रतिक्रीया किरण आहेर या कार्यकर्त्याने दिली.
ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत !
पारनेरवरून उमापूरकडे जाताना ठिकठिकाणी आ. लंके यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्वागताच्या फलकाबरोबरच फटाक्यांची आताशबाजी, ढोल ताशांच्या गजरात करंजी, बोधेगाव, चापडगाव, बालमटाकली येथे आ. लंके यांचे स्वागत करण्यात आले.

No comments:

Post a Comment