आशेची ज्योत तेवणार ? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

आशेची ज्योत तेवणार ?

 आशेची ज्योत तेवणार ?


जा
नेवारी २०२० पुर्वी गावागावात गावच्या ग्रामदैवताचे सप्ताह पार पडत. माणुस हा जितका समाजप्रिय प्राणी आहे तितकाच धर्मप्रिय प्राणी आहे. माणुस जन्माला येतो त्यावेळी त्याचा पिंड कुठल्या ना कुठल्या धर्माशी जोडलेला असतो. प्रत्येक धर्मामध्ये सण, वार, प्रथा, परंपरा तसेच धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्यातच आपला महाराष्ट्र म्हणजे धार्मिक आणि सामाजिक अस्मितेची राजधानी म्हणुन ओळखला जातो. येथे अगदी भैरुबाच्या, खंडोबाच्या म्हसोबाच्या जत्रा मोठ्या दणक्यात साजर्या केल्या जातात. अनेक नृत्य अविष्कार पाहायला मिळतात. या जुन्या चालत आलेल्या सगळ्या परंपरामागे एक व्यापक दृष्टिकोन लपलेला असतो. हिंदु धर्मातील कुठलीही परंपरा वाह्यात नसते. फक्त त्याला एक व्यापक व्यवस्थेची जोड द्यावी लागते. महाराष्ट्रातील थोर साधु संत तुकोबा, ज्ञानोबा, निळोबा, गोरोबा, सावतामाळी यांनी हिंदु धर्माला व्यापक बनवत सहिष्णुता जोपासुन व्यापक व्यवस्थेची जोड दिली आहे. धर्माचं लोकशाहीकरण केलं आहे. म्हणुन कधी कधी वाटतं गावच्या भैरुबाची जत्रा पण मानवी जीवनात आनंद आणत असते. तात्विक अर्थाने पाहिलं तर देवाच्या उपासनेचा जो दिवस सण म्हणुन साजरा केला जातो त्यादिवशी देवासमोर हात जोडताना डोळे मिटुन स्वतःमध्ये डोकावण्याची एक नामी संधी चालुन आलेली असते. जत्रेला आपल्या पाहुण्या-रावळ्यांना आमंत्रण पाठविली जातात आणि  ते अगत्याने उपस्थित राहतात. कामाच्या व्यापात वर्षभर न भेटलेले जिव्हाळ्याचे पाहुणे आणि मित्र त्यादिवशी प्रेमाने भेटतात. विचारपुस होते. सुखाबरोबर दुखःही वाटली जातात. सायंकाळी गोडधोड पुरणपोळीचा बेत असतो. सर्वजण मनमुराद जेवनाचा आनंंद घेतात. माझ्या मते अशा जत्रा म्हणजे गावच्या सामाजिक व्यवस्थेच्या रक्तवाहिन्याच जणु असतात. गावच्या जातीपलीकडच्या व्यवस्थेला या जत्रांनी सणांनी मजबुत बांधलं आहे. यामुळेच गाव एकोप्याने गुण्यागोविंदाने नांदत असतो. गावचा एखांदा कोणी माणुस मेला तर सगळा गाव गोळा होतो. दुखाःत सहभागी होतो. कोणाच्या  पोराचं, कोणाच्या पोरीचं लग्न असेल तर सगळा गाव त्याच्या आनंदात सहभागी होतो. दिलीप न्हाव्याची रामा पाटलाकडे असलेली दाढीची उधारी सगळ्या गावाला माहिती असते. एखांद्या मुलाचं एखांद्या मुलीसोबतच असलेलं पवित्र प्रेम समद्या गावातील घराघरात लफडं म्हणुन माहिती असते. ही प्रत्येक गावाची सोशल सिस्टिम अर्थातच सामाजिक व्यवस्था असते. त्या व्यवस्थेने सर्व गावाला एकत्र बांधलं आहे. गावच्या भैरवनाथाच्या जत्रेला गावात भंडारा उधळला जातो. आमच्याकडे जत्रेच्या दिवशी शेरनी वाटली जाते. आता अनेकांना प्रश्न पडेल शेरणी म्हणजे वाघीण आहे की काय? पण शेरणी म्हणजे वाघिण नसुन गावात येणार्या जत्रेकरुंना एखांद्या श्रध्दाळु भाविकाकडुन गुळाचा प्रसाद वाटला जातो. मी सुध्दा लहाणपणी अशाप्रकारची शेरणी वाटलेली आहे. मंदिरावर आकर्षक प्रकाशयोजना केलेली असते. अख्ख्या गावातील बायाबापड्या, कर्ते - धर्ते पुरुष सायंकाळी भैरुबाच्या चरणी लीन होण्यासाठी तुटुन पडत. त्या गर्दीतुन वाट काढत जेव्हा मी देवाचं दर्शन घ्यायचो तेव्हा जीव भांड्यात पडे आणि समोर त्या आकर्षक मुर्तीला 'याची देहि याची डोळा' पाहुन 'याचसाठी केला होता का अट्टहास' याचि प्रचिती येऊन जायची. अशीच प्रचिती मला शिर्डीच्या साईंच्या दर्शनानंतर होत असे. कारण तब्बल पास तास ताटकळत रांगेत गर्दीतील धक्काबुक्की खात जेव्हा दोन सेकंदासाठी साईंपुढे आगमन व्हायचे तेव्हा जीव भांड्यात पडायचा आणि साईबाबा खरंच सेलिब्रिटी वाटायचे. साईंप्रति माझी प्रचंड श्रध्दा आहे. आजही जेव्हा केव्हा गर्दीत धक्काबुक्की सहन करत साईंसमोर दोन सेकंद जातो तेव्हा साई सेलिब्रिटी वाटतात. कारण मनात असं वाटतं की अख्ख्या जगातुन लोक, पंतप्रधान, राष्ट्रपती ज्याच्या दर्शनासाठी साईनगरीत येतात त्या साईंच्या पुढे आपण क्षणभर का होईना उभे आहोत या भावनेने उर दाटुन येतो. वेगवेगळ्या देवाच्या बाबतीत माझ्या वेगवेगळ्या श्रध्दा आहेत. पंढरीचा विठ्ठलसुध्दा मला सेलिब्रिटी वाटतो. अर्थात तो नायक आहेच पण महानायक नव्हे तर विश्वनायक आहे. तो सेलिब्रिटी वाटतो याचे कारणही तेच आहे. त्यालाही याची देहि याची डोळा पाहण्यासाठी मोठी यातायात करावी लागते. याउलट आमचा भैरोबा, खंडोबा मित्र वाटतात. कधीही जाऊन त्यांच्या चरणी डोकं ठेवता येतं. गर्दी नाही, प्रवास नाही, यातायात नाही, विचारणा नाही, सुरक्षा नाही , रांग नाही, कधीही जाऊन त्याच्या चरणी लीन होता येतं. आमच्या मारुतीरायाचंही तसंच आहे. मारुतीच्या सप्त्याला जाऊन सलग आठ दिवस महाप्रसादाचा लाभ घेता येतो. असो. काही गावातील भैरवनाथ मंदिरात काठ्यांची परंपरा असते. गावातील एखांद्या विशिष्ट समुदायाकडे पिढोनपार चालत आलेला काठ्यांचा मान असतो. गावातील अठरा पगड जातीचे लोक या सणावारांनी जत्रांनी एकत्र जोडलेले आहेत. गावची निकोप सामाजिक व्यवस्था त्यावरच टिकुन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या सर्व गोष्टींनी देशातील गावागावांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या समृध्द केलं आहे. भारत देश या अंतर्गत समाज व्यवस्थेच्या धमण्यांनी जोडला आहे. फक्त हिंदु धर्मातच नाही तर देशातील प्रत्येक धर्मात सामुहिक सणवार आनंदाने साजरे केले जातात. मंदिरांमध्ये सप्ताहाचे दरसाल आयोजन असते. सात दिवस सायंकाळी महाप्रसादासाठी सर्व गाव एकत्र जमा होतो. किर्तने प्रवचने आणि देवांचे धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर पंगत पडते.  आणि या पंगतीत जेवनाचा आस्वाद घेतला जाते. प्रत्येकजण जेवणावर यथेच्छ ताव मारतो. घरी कितीही भारी जेवन असलं तरी त्या पंगतीत आपल्या लोकांसमवेत घेतल्या जाणार्या जेवणाची मजाच न्यारी असते. आणि या मजेला मी आणि आपण सर्वच जण गेल्या दीड वर्षापासुन मुकलोय. समुहप्रिय माणसाच्या जीवनात कोरानानं एकटं राहण्याची वेळ आणली. आज माणुस कोरोनानं आजारी पडण्यापेक्षा एकटेपणानं आजारी पडला आहे. माणुस एकटा येतो आणि एकटा जातो असे जरी अनेक विचारवंत सांगत असले तरी जीवन जगताना मात्र त्याला समुहात राहावं लागतं आणि त्याचं समुहापासुन माणसाला दुरावं लागलं आहे. पण लवकरचं माणुस माणसात येईल असा आशावाद आहे. साधारण एक दीड वर्षांपुर्वी शिर्डी येथे दर्शनाला गेलो असता पंगतीत जेवनाचा आनंद घेतला होता. तेव्हाची आठवण ताजी झाली आणि सहज मनात एक विश्वासाचा विचार तरळुन गेला 'पुन्हा असे दिवस येतीलच'.


लेखक - दत्ता पवार, लेखक, पत्रकार आणि राजकीय अभ्यासक.

No comments:

Post a Comment