पारनेर तालुक्यात पाणी पुरवठा योजनेसाठी 30 कोटीचा निधी !
आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नांना यश
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तालुक्यातील जामगाव सह दैठणे गुंजाळ,वडगाव आमली, भांडगाव,सारोळा आडवाई व काळकूप प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी 30 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून यामुळे या सहा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली.
जामगावसह सहा गावांचा पिण्याच्या पाणी पुरवठा योजनांपैकी बहूतांशी गावांच्या पाणीपुरवठा योजना भांडगाव लघुप्रकल्पातून कार्यान्वित होत्या. मात्र येथे शाश्वत पाणीसाठा उपलब्ध नसल्याने या योजना अनेक वर्षांपासून बंदच होत्या. त्यामुळेच आ. लंके हे विधानसभा सदस्य झाल्यानंतर या गावांना काळु धरणातून पाणीपुरवठा व्हावा यासाठी ते प्रयत्नशिल होते. यासाठी त्यांनी संबंधित गावांच्या बैठका घेवून तशा प्रकारचे ग्रामसभेचे ठरावही करून घेतले होते. जामगावसह सहा गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी आ. लंके यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. संबंधित योजनेतील गावे ही अवर्षणप्रवणग्रस्त व दुष्काळी असल्याने या ठिकाणी शाश्वत पाणीपुरवठा योजना राबविण्यात यावी अशी मागणीही आ. लंके यांनी पाणी पुरवठा मंत्री पाटील यांच्याकडे केली होती.आ. लंके यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले असून आता सहा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. सहा गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 30 कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी मिळाली असून लवकरच जीवन प्राधिकरण विभागाकडून सर्वेक्षण सुरू होणार असून या योजनेसाठी वाढीव निधी लागल्यास त्याचीही तरतुद करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment