जिल्ह्यासाठीचा ऑक्सीजन व्यवस्थापन आराखडा तयार करणार : डॉ. भोसले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 29, 2021

जिल्ह्यासाठीचा ऑक्सीजन व्यवस्थापन आराखडा तयार करणार : डॉ. भोसले

 जिल्ह्यासाठीचा ऑक्सीजन व्यवस्थापन आराखडा तयार करणार : डॉ. भोसले

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी ‘मिशन ऑक्सीजन स्वावलंबन’


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आरोग्य सुविधांचे बळकटीकरण केले जात आहे. या लाटेत ऑक्सीजनची गरज अधिक प्रमाणात लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात असून त्या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यात मिशन ऑक्सीजन स्वावलंबन अवलंबिले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिली. याशिवाय, जिल्ह्याचा ऑक्सीजन व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संभाव्य तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने आज राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्हा स्तरावरील सर्व यंत्रणांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे सर्व जिल्ह्यात नवे निर्बंध लागू झाले आहेत. आपल्या जिल्ह्यातही स्तर- 3 चे निर्बंध लागू झाले आहेत. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय, संभाव्य तिसर्‍या लाटेचा सामना कऱण्यासाठी आता आपणाला किमान 230 मेट्रीक टन ऑक्सीजनची गरज लागेल, असा अंदाज आहे. त्याची उपलब्धता करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाणार आहे. तिसर्‍या लाटेत संभाव्य रुग्णांची संख्या जास्त असेल, त्यामुळे किमान तीन दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक असेल, असे नियोजन करुन जिल्हा ऑक्सीजन व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. तो आपण लवकरच राज्य शासनाला सादर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यासाठीची संभाव्य गरज 230 मेट्रीक टन इतकी आहे. त्यापैकी 70 टक्के लिक्विड मेडीकल ऑक्सीजन, 20 टक्के सिलींडर द्वारा तर ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पातून 10 टक्के ऑक्सीजन मिळेल, असे नियोजन  आहे. सध्या जिल्ह्यात 14 ग्रामीण रुग्णालयांसह  17 ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. सध्या 6 ठिकाणी त्यासाठीची मशीनरी प्राप्त झाली आहे. उर्वरित ठिकाणीही ती लवकरच येईल. मात्र, आपल्याला केवळ या निर्मिती प्रकल्पावर अवलंबून राहून चालणार नाही तर ऑक्सीजन साठवणूक क्षमता वाढवावी लागणार आहे. त्याच्या अनुषंगानेही सूचना देण्यात आल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले. महानगरपालिकेकडे स्वताचे रुग्णालय नाही, त्यामुळे महानगरपालिकेने 20 के.एल. एवढ्या साठवण क्षमतेची टाकी बनवावी, याशिवाय, जी मोठी रुग्णालये आहेत, त्यांनी ड्युरा सिलींडर उपलब्ध करुन घ्यावीत. याशिवाय, किमान 6 के. एल. इतक्या क्षमतेची साठवण क्षमता निर्माण करावी. तसेच, किमान तीन दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक राहील, याप्रमाणेच नियोजन करावे.  लिक्विड मेडीकल ऑक्सीजन स्टोरेज क्षमता वाढवावी लागेल, अशा सूचना प्रत्येक रुग्णालयाला देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात पुन्हा एकदा इंडियन मेडीकल असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन त्यांना याबाबत कार्यवाहीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात येईल. यापूर्वीच त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे तिसर्‍या लाटेचा सामना आपण निश्चितपणे प्रभावीपणे करु शकू, असेही त्यांनी स्पष्ट केले. जी हॉस्पिटल्स स्टोरेज टँक उभारणी करणार आहेत, त्यांनी आताच ऑक्सीजन उत्पादक कंपन्यांशी करार करुन ठेवावा. लिक्विड मेडीकल ऑक्सीजन विनाकारण गैरवापर होणार नाही, तो  वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी, यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिल्या आहेत. ऑक्सीजन साठा आणि वापर, वाहतूक यावर नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय पथक कार्यान्वित करण्यात येणार असून त्यात पोलीस, आरटीओ, अभियांत्रिकी प्राध्यापक आदी असतील, अशी माहिती त्यांनी दिली. राखीव साठ्यापैकी निम्मा साठा हा जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी तर उर्वरित पन्नास टक्के साठा हा तालुकापातळीवर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment