सोमवार पासून ‘अनलॉक’! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, June 5, 2021

सोमवार पासून ‘अनलॉक’!

 सोमवार पासून ‘अनलॉक’!

‘अनलॉक’चा गोंधळ संपला; मध्यरात्री निघाले आदेश.
पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यात ‘अहमदनगर’ अग्रस्थानी
दुसर्‍या टप्प्यात 2, तिसर्‍या टप्प्यात 15, चौथ्या टप्प्यात 8 जिल्हे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः काल दिवसभर चाललेला अनलॉक प्रक्रियेेचा गोंधळ मध्यरात्री संपला. अनलॉकची प्रक्रिया 5 टप्प्यात सुरू होणार असल्याचा आदेश आज पहाटे मुख्यमंत्री कार्यालयांमधून प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आला. ज्या जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 5% व ऑक्सिजन बेड 25% पेक्षा कमी भरले आहेत त्या जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे. या निकषात अहमदनगर जिल्हा बसत असून सोमवारपासून जिल्हा अनलॉक करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांकडून आज पारित होण्याची शक्यता आहे.
ही अधिसूचना सोमवारपासून (7 जून) लागू होणार आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे त्याच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या प्रशासकीय पातळीवरील या निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे. या अधिसूचनेनुसार पहिल्या टप्प्यात येणारे जिल्हे आणि शहरांमध्ये कमीतकमी निर्बंधित असतील, तर तर पाचव्या टप्प्यातील निर्बंध अधिक कडक असतील. अनलॉक करत असताना पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. पहिल्या स्तरात 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसर्‍या स्तरात 2 जिल्ह्यांचा समावेश आहे. तिसर्‍या स्तरात 15 जिल्ह्यांचा समावेश आहे तर चौथ्या स्तरांमध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या पाचव्या स्तरात एकही जिल्हा नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली तर पाचव्या स्तरात त्या जिल्ह्याचा समावेश केला जाईल. 20 टक्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट असेल आणि 75 टक्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील, तो पाचवा स्तर असेल. पहिल्या स्तरात मॉल, थिएटर आणि सर्व दुकानं सुरळीत राहतील. तर दुसर्‍या स्तरात येणार्‍या शहर आणि जिल्ह्यांमध्ये मॉल आणि थिएटर्स 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. तर तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या स्तरातील शहर आणि जिल्ह्यांमध्ये निर्बंधासह सेवा सुरु राहिल.
पहिल्या स्तरामध्ये अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ.
दुसर्‍या स्तरामध्ये हिंगोली, नंदुरबार.
तिसर्‍या स्तरामध्ये  मुंबई आणि उपनगर, ठाणे, नाशिक,औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, गडचिरोली, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम.
चौथ्या स्तरामध्ये पुणे, बुलढाणा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग.
दि.3 जून रोजी संपलेल्या आठवड्याच्या सरासरीनुसार भरलेल्या ऑक्सिजन बेडचे प्रमाण आणि पॉझिटिव्हीटी दर या आधारे प्रत्येक जिल्हा प्रशासन नियमावली संदर्भात स्वतंत्र आदेश काढतील, पण या दोन निकषांच्या आधारे नियमावली कशी असेल हे राज्य शासनाने निश्चित केले आहे. प्रत्येक आठवड्यात या दोन निकषांवर जिल्ह्यांची वर्गवारी करून नियमावलीनुसार निर्बंध शिथिल वा कडक केले जाणार आहेत. एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी अनलॉक संदर्भात घोषणा केली होती. पण त्यानंतर काहीच तासात राज्य शासनाने खुलासा करून कोणतीही नियमावली अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही असे स्पष्ट केले होते. त्यामुळे सरकारी गोंधळ समोर आला होता. मात्र, अखेर नियमावली जारी करण्यात आली.मुंबई, ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर महापालिका हे स्वतंत्र प्रशासकीय युनिट समजण्यात येतील. याचा अर्थ तेथील महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन (ग्रामीण- मुंबई वगळता) हे नियमावलीसंदर्भात स्वतंत्र आदेश काढतील.
जेथे पाच टक्क्यांपेक्षा कमी कोरोना पॉझिटिव्हीटी दर आहे आणि जिथे 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले आहेत तेथील सर्व व्यवहार खुले करण्यात येतील. हा पहिला स्तर मानला जाईल. पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हीटी दर आहे आणि 25 ते 40 टक्के ऑक्सिजन बेड भरलेले आहेत ते दुसर्‍या स्तरात मोडतील. पाच ते दहा टक्के पॉझिटिव्हीटी रेट असेल आणि 40 टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील, असा तिसरा स्तर मानला जाईल. तेथील व्यवहार सायंकाळी 5 वाजता बंद होतील. दहा ते वीस टक्के पॉझिटीव्हीटी दर असेल आणि 60 टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील असा चौथा स्तर मानला जाईल आणि तेथे सायंकाळी 5 नंतर व्यवहार बंद होतील आणि शनिवार, रविवारी व्यवहार बंद असतील. 20 टक्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हीटी रेट असेल आणि 75 टक्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील, तो पाचवा स्तर असेल. पहिल्या स्तरात मोडणार्‍या ठिकाणी मॉल, दुकाने, सिनेमा हॉल आणि सभागृहांच्या वेळेचे बंधन नसेल. दुसर्‍या स्तरातील ठिकाणी मॉल आणि सिनेमा हॉलमध्ये 50 टक्केच उपस्थितीची अट राहील. तिसर्‍या स्तराच्या ठिकाणी दुकाने दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील. सिनेमागृहे, सभागृहे, नाट्यगृहे बंद राहतील. चौथ्या स्तरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील आणि अन्य दुकाने बंद राहतील. पाचव्या स्तरातील ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 4 पर्यंतच सुरू राहतील. शनिवार, रविवारी ती बंद असतील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here