महापौरपदी रोहिणी शेंडगे, उपमहापौरपदी गणेश भोसले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 29, 2021

महापौरपदी रोहिणी शेंडगे, उपमहापौरपदी गणेश भोसले.

 महापौरपदी रोहिणी शेंडगे, उपमहापौरपदी गणेश भोसले.

नगरमध्येही महाविकासआघाडी एकत्र, राष्ट्रवादी पक्ष निरीक्षक - अंकुश काकडे.

काँग्रेसची महापौर-उपमहापौर निवडणुकीतून माघार..; राष्ट्रवादी-शिवसेनेमध्ये आनंदोत्सव.

दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवड.नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहराच्या विकासासाठी आ संग्राम जगताप यांच्या मनातील सहमती एक्सप्रेसच्या डब्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा स्थानापन्न झाल्याने अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या सौ रोहिणी शेंडगे, उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली असून शिवसेना राष्ट्रवादी समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. या दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज आल्याने काँग्रेस ने या निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्ट झाले. “राज्याच्या सत्तेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाविकासआघाडी म्हणून सत्तेत असून हाच फॉर्म्युला नगरमध्येही राबविण्यात येणार असून त्यामुळे नगरच्या विकासाला चालना मिळेल” असा आशावाद राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी व्यक्त केला. भाजपा या निवडणुकीत शांत राहिला म्हणजे तेही एक प्रकारे आमच्या बरोबर आहेत असे ही काकडे म्हणाले. उद्या 30 जून ला होणार्‍या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने माघार घेतल्याने शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांची महापौरपदी तर राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली असून पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले उद्या घोषणा करण्याची शक्यता आहे. काल काँग्रेसच्या शीला चव्हाण यांनी दोन उमेदवारी अर्ज नेले असल्याने थोडी उत्सुकता निर्माण झाली होती पण आज अर्ज भरण्याच्या मुदतीत त्यांचे अर्ज न आल्याने काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्ट झाले.
महापौर निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी पासून शिवसेना व काँग्रेस पक्षाकडून आगामी महापौर आमचाच असल्याचा दावा केला जात होता. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे पाठबळावर महापौरपद मिळविण्याचे स्वप्न काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी पहिले असताना मुंबईतील शिवसेना-राष्ट्रवादी नेतृत्वाने मुंबईत राष्ट्रवादीचे आ संग्राम जगताप यांनी आगामी महापौर शिवसेनेचाच असेल अशी घोषणा केल्यानंतर काँग्रेसचा महापौर पदावरील दावा संपुष्टात आला असल्याचे स्पष्ट झाले पण काल काँग्रेसच्या वतीने दोन उमेदवारी अर्ज नेल्याने थोडी उत्सुकता मात्र निर्माण झाली होती.

महापौरपदासाठी सौ रोहिणी शेंडगे यांचे नाव मुंबईतील शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून निश्चित झाले असले तरी उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मोठी रस्सीखेच चालू होती. विनीत पाऊलबुद्धे, मीनाताई चोपडा, गणेश भोसले या तिघांमध्ये उपमहापौर पदासाठी मोठी स्पर्धा असताना आज उपमहापौरपदाचा अर्ज भरण्या अगोदर काही मिनिट आधी आ.संग्राम जगताप यांनी या तीनही उमेदवारांशी बंद खोलीत चर्चा केली. काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी राष्ट्रवादी पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून महत्त्वाची भूमिका पार पडली. काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत उमेदवारी अर्ज ठेवला तर राज्यात महाविकास आघाडी म्हणून वेगळे संकेत जातील याचा विचार करून थोरात यांनीही या निवडणुकीतून माघार घेण्याचे आदेश शहरातील काँग्रेस नेत्यांना दिले. विरोधी पक्षनेते पद भाजपकडे अन्य सत्तेत काँग्रेसचा वाटा निश्चित झाल्याने महापौर-उपमहापौर निवडणूक बिनविरोध झाली असेच म्हणावे लागेल. महापौर, उपमहापौर निवडणुकीत पळवा पळवी, सहली, घोडेबाजार, शत्रुत्व दिसून न आल्याने एक प्रकारे ही निवडणूक प्रथमच योग्य पद्धतीने पार पडल्याने नगरकरांना प्रथमत समाधान वाटले असल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment