समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून त्यांना सेवा देणे आवश्यक : अ‍ॅड. अभय राजे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, June 24, 2021

समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून त्यांना सेवा देणे आवश्यक : अ‍ॅड. अभय राजे

 समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून त्यांना सेवा देणे आवश्यक : अ‍ॅड. अभय राजे

लॉकडाऊननंतर प्रथमच झालेल्या नेत्र शिबिराला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः रोटरीचे उद्दीष्टच समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून त्यांना सेवा देणे हे आहे. डोळे हा शरीराचा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. दृष्टी निर्दोष असेल तरच आपण सुंदर सृष्टी पाहू शकतो. ही बाब लक्षात घेवून ग्रामीण भागात असे उपक्रम राबविण्यावर रोटरीयन्सचा नेहमीच भर असणार आहे. करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर रोटरी याच उद्देशाने विविध उपक्रम राबवत आहे, असे प्रतिपादन रोटरीचे उपप्रांतपाल अ‍ॅड.अभय राजे यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल, स्व.सुंदरबाई कन्हैयालाल शिंगवी सेवाभावी प्रतिष्ठान तसेच आनंदऋषीजी नेत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने नगर तालुक्यातील अकोळनेर येथे मोफत नेत्रतपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अ‍ॅड. राजे बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य राणीताई निलेश लंके उपस्थित होत्या. यावेळी पीडीजी शिरीष रायते, डॉ.एस.व्ही.जोशी, उपप्रांतपाल मनिष बोरा, शिंगवी चष्माघरचे अशोक शिंगवी, रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष प्रसन्न खाजगीवाले, सचिव ईश्वर बोरा, आनंदऋषीजी नेत्रालयाचे डॉ.सुशिल गाडेकर, संजय गारुडकर, राजेंद्र शेळके, सरपंच दादासाहेब कोळगे, सरपंच स्वाती सुंबे, सरपंच भास्कर भोर, नितीन पवार, प्रतिक शेळके, अविनाश जाधव आदी उपस्थित होते.
ईश्वर बोरा यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, करोनाच्या दुसर्या लाटेनंतर प्रथमच भव्य नेत्रतपासणी शिबीर आयोजित केले आहे. अकोळनेर, सोनेवाडी, भोरवाडीसह परिसरातील गावातील रूग्णांना याचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रूग्णांना नगरमध्ये ने आण करण्याची, त्यांच्या निवासाची, जेवणाची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर प्रत्येकाला काळा चष्मा तसेच औषधेही मोफत दिली जाणार आहेत.
राणीताई लंके म्हणाल्या, करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून एप्रिलपासून सुरु असलेला कडक लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सामाजिक संस्थांनी ग्रामीण भागात करोना व्यतिरिक्त आजारांसाठी शिबिरांसाठी पुढाकार घेतला आहे. रोटरी सेंट्रल, शिंगवी चष्माघर, आनंदऋषीजी नेत्रालयाने अकोळनेरमध्ये नेत्र शिबीर घेवून ग्रामस्थांना निर्दोष दृष्टी मिळावी यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. या उपक्रमातून अनेकांच्या जीवनात नेत्र प्रकाश येईल. प्रसन्न खाजगीवाले म्हणाले की, करोना महामारीत प्रत्येक जण आरोग्याबाबत सजग झालेला आहे. डोळ्यांचे आरोग्यही यात अतिशय महत्त्वाचे आहे. या शिबिरात जवळपास 183 रूग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. यातील 41 रूग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून सर्व नेत्रोपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत. शिबिरस्थळी अल्पोपहाराची व्यवस्थाही करण्यात आली होती. करोना प्रतिबंध नियमावलीचे संपूर्ण पालन करून अतिशय उत्तम नियोजन पहायला मिळाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here