पावसाने मुंबईची दैना का झाली? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

पावसाने मुंबईची दैना का झाली?

 पावसाने मुंबईची दैना का झाली?


मुं
बईत मान्सूनने जोरदार सलामी दिली. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडवली. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली. पाणी तुंबल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. जागोजागी गुडघाभर पाणी साचले. रस्त्यावर देखील पाणी साचले. लोकांच्या घरात पाणी साचले.  रस्त्यावर पाणी आल्याने रस्ते वाहतूक खोळंबली. महामार्गावर पाणी आल्याने शेकडो गाड्या जागेवरच थांबल्या. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. रिक्षा टॅक्सी यांनी जणू अघोषित संप पुकारला, अशी अवस्था झाली. रेल्वे मार्गावर पाणी साचून रूळ पाण्याखाली गेल्याने अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द कराव्या लागल्या. काहींच्या मार्गात बदल करावे लागले. काही मार्गावरील लोकल रद्द कराव्या लागल्या तर काही मार्गावर धीम्या गतीने लोकल सोडव्या लागल्या. लोकल जणू पाण्यावरून धावत आहे असेच चित्र सर्वत्र दिसत होते.  पावसाचे पाणी रेल्वे स्थानकावरून धबधब्याप्रमाणे वाहत होते.  पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले.  विमानतळावर पाणी साचल्याने अनेक उड्डाणे रद्द करावे लागले. या पावसाने 26 जुलै 2005 साली झालेल्या प्रलयकारी पावसाची आठवण झाली. पावसामुळे मुंबईची दैना झाल्यावर नेहमीप्रमाणे दोषारोपांचे सत्र सुरू झाले. मोठ्या पावसात मुंबईची दैना झाली याला जबाबदार कोण? यावर राजकारण सुरू झाले पण; पण मोठ्या पावसानंतर मुंबईची दैना का होते, या प्रश्नाकडे मात्र सर्वच पक्ष डोळेझाक करीत आहेत. 26 जुलैच्या प्रलयकारी पावसानंतर शासन, प्रशासन व नागरिकांनी कोणताही धडा घेतला नाही म्हणूनच ही वेळ पुन्हा आली. पूर्वी मुंबईत मोकळ्या जागा असायच्या त्यामुळे तिथे पाण्याचा निचरा व्हायचा. पण आता मुंबईत मोकळ्या जागाच राहिल्या नाहीत. विकासाच्या नावाखाली मुंबई म्हणजे सिमेंटचे जंगल बनले आहे. रस्तेदेखील सिमेंटचे आणि पेव्हर ब्लॉकचे बनले आहेत त्यामुळे पाणी मुरायला जागाच  नसते. त्यात मोठा पाऊस आणि भरती एकाच वेळी आली तर ते सर्व पाणी नागरी वस्तीतच शिरते. मुंबई तुंबण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे प्लास्टिक! राज्य सरकारने प्लास्टिकवर बंदी घातली असली तरी मुंबईत दररोज हजारो टन प्लास्टिक कचरा जमा होतो. या प्लास्टिक कचर्‍याचे व्यवस्थापन करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. हे प्लास्टिक नदी नाल्यामध्ये अडकल्याने  तेथून पावसाचे पाणी वाहत जाण्यास अडचण निर्माण होते. राज्य सरकारने प्लास्टिकवर घातलेली बंदी किती योग्य आहे हे या पावसामुळे तरी नागरिकांना समजेल. नागरिकांनीही प्लास्टिकवर निर्बंध घालायला हवेत. ग्लोबल वार्मिंगमुळे मुंबईच्या समुद्र पातळीत दरवर्षी तीन मीटरची वाढ होत आहे. मुंबई तुंबण्याचे हे ही एक महत्वाचे कारण आहे. पावसामुळे केवळ मुंबईचीच नाही तर राज्यातील सर्वच प्रमुख शहरांची हीच अवस्था होते. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराची दोन वर्षापूर्वी पावसाने काय अवस्था झाली होती हे आपण पहिलेच आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू असताना पावसाचे पाणी थेट विधान भवनात शिरले. त्यामुळे विधिमंडळाचे कामकाज तहकूब करावे लागले होते. पावसामुळे विधिमंडळाचे कामकाज तहकूब करण्याची नामुष्की सरकारवर  आली होती. पावसामुळे विधिमंडळाचे कामकाज तहकूब करण्याची इतिहासातील ती पहिलीच वेळ होती. मागील वर्षी पुणे, नाशिक, औरंगाबाद ही शहरे जलमय झाल्याचे आपण पाहिले आहे. राज्यातील सर्वच शहरात कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे. पूर्वीसारखा पावसाचा  देखील अंदाज येत नाही. दोन दोन महिने न येणारा पाऊस दोन तासात येऊन दोन महिन्यांची सरासरी गाठतो.  या सर्व परिस्थितीचा विचार करता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद यासारख्या मोठ्या शहरांच्या नियोजनाचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे. जलव्यवस्थापनाची आजची पद्धत बदलून नवीन पद्धतीचा अवलंब करायला हवा. त्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. त्यासाठी परदेशातील तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी. परदेशातील मोठ्या शहरांच्या जलव्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांना परदेशात पाठवायला हवे. परदेशातील अधिकार्‍यांची त्यासाठी मदत घ्यायला हवी.
- श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे  9922546295

No comments:

Post a Comment