कर्जत तहसिल कार्यालयासमोर वंचित चे आमरण उपोषण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

कर्जत तहसिल कार्यालयासमोर वंचित चे आमरण उपोषण

 कर्जत तहसिल कार्यालयासमोर वंचित चे आमरण उपोषण


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
कर्जत ः कर्जत तालुक्यातील तरडगाव येथील दलित मागासवर्गीय समाजासाठी शासनाने 1974 साली गट नंबर 8/1/अ मधील हरिजन स्मशानभुमी साठी 5 आर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. तरी देखील या ठिकाणी या समाजाला दफनविधी करुन दिला जात नाही. गेली 45 वर्षे झाली संबंधित जमीन मालक या लोकांना या जागेमध्ये येऊ देत नाही. अशा विविध मागण्यांसाठी  कर्जत तहसिल कार्यालयासमोर वंचितने आमरण उपोषण केले.
अनेक वेळेस शासन दरबारी हा प्रश्न मांडला मात्र शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे आज कर्जत तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करण्याची वेळ या समाजावरती आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक ड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आमरण उपोषण करण्यात आले.  यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कर्जत तालुका अध्यक्ष सोमनाथ भैलुमे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव चंद्रकांत नेटके सर, मोहन केसकर, पोपट खरात, रामदास देवमुंडे, संतोष केसकर, भरत देवमुंडे, पिंटू देवमुंडे, अण्णासाहेब देवमुंडे आदी कार्यकर्ते या उपोषणात सहभागी झाले होते.
या दलित मागासवर्गीय समाजाच्या व्यथा मांडताना उपोषणकर्ते वैजीनाथ केसकर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून या समाजाच्या स्मशानभुमीचा प्रश्न प्रलंबित असून या समाजाने मयत व्यक्तीचा दफनविधी कोठे करावा हा मोठा प्रश्न  निर्माण झाला आहे .त्यांना दफन विधी करण्यासाठी गावांमध्ये कोठेही जागा उपलब्ध नाही. त्यांना स्वतःच्या जमिनी देखील नाहीत. या समाजातील मयत व्यक्तींचा दफनविधी नदीला करावा लागतो  परंतु पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नदीला पाण्याचा पूर आल्यानंतर हे प्रेत कोठे न्यावी हा प्रश्न निर्माण होतो, पर्याय त्यांना या प्रेताचे दफन विधी स्वतःच्या घरासमोरील दारात  करावा लागतो, भारताला स्वातंत्र्य मिळून एवढे दिवस झाले तरी देखील या समाजाला आणखीन न्याय मिळाला नाही याचा प्रथमता मी निषेध करतो असे ते म्हणाले.
मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभुमीच्या जागेबाबत जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतल्यामुळे महसूल प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. यावेळी उपोषणकर्त्यांनी स्मशानभूमीची जागा ताब्यात मिळणेसाठी अंमलबजावणी तात्काळ करा, आणखीन आम्ही किती दिवस अन्याय सहन करणार, आमचा लढा न्यायासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी, सोसणार नाही अत्याचार, स्मशानभूमीची जागा घेतल्याशिवाय नाही राहणार, अशी त्यांची ठाम भूमिका असल्याने महसूल प्रशासनाचे लक्ष वेधले गेले. तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
जोपर्यंत या समाजाला त्यांच्या हक्काच्या स्मशानभुमी जागा उपलब्ध होणार नाही. तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी गप्प बसणार नाही. येणार्‍या पुढील काळामध्ये  मागण्या मान्य न झाल्यास आदरणीय ड. बाळासाहेब आंबेडकर साहेब, ड. डॉ. अरुण जाधव व प्रा. किसन चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

No comments:

Post a Comment