कठीण परिस्थितीतही तेवत आहे माणुसकीचा महायज्ञ...! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 24, 2021

कठीण परिस्थितीतही तेवत आहे माणुसकीचा महायज्ञ...!

 कठीण परिस्थितीतही तेवत आहे माणुसकीचा महायज्ञ...!

कोरोना काळात डॉ. नंदू पवार बनले रुग्णांचा आधारवड


नगरी दवंडी/अविनाश निमसे
अहमदनगर ः कोरोना महामारीने सर्वत्र धुमाकूळ घातला असून मोठमोठ्या महानगरापासून ते गावाखेडया पर्यंत माणसे होत्याचे नव्हते झाले आहेत. महामारीमुळे अनेक कुटूंबातील करती माणसे गेल्यामुळे कुटुंबाचा आधार गेला आहे. महामारीच्या भीतीने सख्ख्या रक्ताचं नातंही फिकं पडत असताना  माणसाचं माणूसपणच कामाला येत असल्याचा प्रत्यय मात्र काही ठिकाणी आल्याशिवाय राहात नाही.  असाच माणूसपाणाचा महायज्ञ चालू ठेवलाय तो साकतखुर्द येथील मूळ रहिवाशी असलेल्या डॉ. नंदकुमार पवार यांनी!
कोरोना महामारीच्या कठीण परिस्थितीत गेल्या वर्षभरापासून साकत परिसरातील कोरोना बाधित व्यक्तींना व त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार व त्याचबरोबर योग्य आरोग्य विषयक मार्गदर्शन देण्यासाठी डॉ. एन. डी. पवार रात्रंदिवस धावून जाताना दिसत आहेत. अहमदनगर येथील एका सुप्रसिद्ध खासगी हॉस्पिटल येथे असिस्टंट डॉक्टर म्हणून ते कार्यरत आहेत. वास्तविक ऑर्थो  तज्ञ असल्याने कोरोना रुग्णावर स्वतः ते उपचार करत नसले तरी रुग्णांना मानसिक आधार देऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचं कार्य आजही सुरूच आहे.
गाव खेड्यातून ’पॉझिटिव्ह’ नावाचा दाखला घेऊन आलेला माणूस प्रचंड भांबवलेल्या अवस्थेत असतो. पॉझिटिव्ह निघाल्यावर नेमके काय करावे, कुठल्या दवाखान्यात जावे, स्कॅन कधी करावे, रक्त कधी तपासावे, अशी कुठलीही इत्यांभूत माहिती त्याच्याकडे नसते. आपल्याला यातून ’जगायचं’ आहे एव्हडंच फक्त त्याला माहित असतं. अशा वेळेस त्या व्यक्तीला गरज असते ती पैशा पेक्षाही मानसिक आधाराची. डॉ. पवार हे अशा व्यक्ती व कुटुंबाच्या जवळ जाऊन त्यांचा आधारवड झाल्याने साकतकरांसाठी ते आरोग्यदूत झाले आहेत.
गावाकडून गंभीर अवस्थेतील पेशंट नगर येथे खासगी हॉस्पिटलला आल्यावर प्रत्येक वेळी आपली ड्युटी सांभाळून ते पेशंट जवळ हजर होतात. सिरीयस पेशंट जवळ स्वतः थांबून त्याला धीर देतात. त्याचबरोबर गावातील रुग्णांना  व त्यांच्या कुटूंबाना वेळोवेळी आलेल्या अडचणी सोडवून त्यांचं मनोधैर्य वाढवतात. खचलेल्यांना धीर देण्या सोबतच मोठी मदत शक्य नसली तरी आपल्या परीने शक्य तितकी मदत करण्याचा डॉ. नंदकुमार पवार यांचा महायज्ञ आजही सुरु आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here