नगर जिल्ह्यासाठी कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसीचे डोस तातडीने द्यावेत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 19, 2021

नगर जिल्ह्यासाठी कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसीचे डोस तातडीने द्यावेत

 नगर जिल्ह्यासाठी कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसीचे डोस तातडीने द्यावेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांची निवेदनाद्वारे मागणी

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जागतिक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात ऑक्सिजन सिलेंडर व रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत होता. नगर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात सुमारे 2 ते 3 हजारपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या होती. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून शिवसेना नगर दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी लक्ष वेधले होते. त्यानंतर जिल्ह्याची गरज मुख्यमंत्र्यांनी तातडीने पूर्ण केली होती. सद्य परिस्थितीबाबत निवेदनाद्वारे श्री. दळवी यांनी पुन्हा एकदा विविध मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या असून, त्या पूर्ण कराव्यात, ही विनंती केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यात रुग्ण संख्या कमी होत असताना नगर जिल्ह्यात ही संख्या वाढतेच आहे. कोरोनाचे हे युद्ध जिंकण्यासाठी औषधोपचारांबरोबरच लसीकरणाचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. पण जिल्ह्याचे दुर्दैव असे की, लोकसंख्या 50 लाखांच्या आसपास असली तरी लशींचा पुरवठा मात्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. 18 ते 44 वयोगटातील 43% व 45 ते 60 वयोगटातील 30 टक्के अशी 73% लोकसंख्या आहे. या हिशोबाने 36 लाख 50 हजारजणांचे लशीकरणासाठी 73 लाख डोस आवश्यक आहेत. 11 मेपर्यंत जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे 4 लाख 66 हजार 400 व कोवॅक्सिनचे 97 हजार 140 डोस एकूण 5 लाख 63 हजार 540 इतके डोस उपलब्ध झाले. हे प्रमाण खूपच कमी आहे.
कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी नगर जिल्ह्यासाठी 50%पर्यंत तरी लसीचे डोस उपलब्ध होणे आवश्यक आहेत. ते तातडीने उपलब्ध करून द्यावेत. राज्याबरोबरच आपण नगर जिल्ह्याची काळजी घेतली असून, जिल्ह्यासाठी इंजेक्शन व ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले आहेत. याबद्दल नगरकरांच्या वतीने आपणास विशेष धन्यवाद देतो. कोरोनावर सद्य परिस्थितीत नगर जिल्हा हळूहळू नियंत्रण मिळवून पूर्वपदावर येत आहे. मात्र, तातडीने जिल्ह्यातील नागरिकांचे लशीकरण न झाल्यास पुन्हा उद्रेक होण्याचा धोका संभवतो. लशीकरणाचे अधिक डोस उपलब्ध झाल्यास कोरोनावर नियंत्रण मिळविता येईल. तरी नगर जिल्ह्यासाठी कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसींचा तातडीने पुरवठा करावा, अशी विंनंती या निवेदनाद्वारे आपणास करीत आहोत.

No comments:

Post a Comment