गंभीर आजाराशीही जिंकाल..फक्त मन खंबीर ठेवा..!-व्याख्याते गणेश शिंदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 17, 2021

गंभीर आजाराशीही जिंकाल..फक्त मन खंबीर ठेवा..!-व्याख्याते गणेश शिंदे

 गंभीर आजाराशीही जिंकाल..फक्त मन खंबीर ठेवा..!-व्याख्याते गणेश शिंदे



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

काही वर्षांपुर्वी सहकार चळवळ (Cooperative movement) बळकट करण्यासाठी शासनाने त्यांची अटलपणन महाभियानाचे ब्रँड अँबिसिटर (Brand Ambassador) म्हणून नियुक्ती केली होती. त्यासाठी राज्यभर पायपीट केली.अधिकारी, पदाधिकारी,शेतकरी सर्वांना सहकारातील नवनिर्माण करण्याची अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची प्रेरणा दिली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यभर कार्यशाळा घेतल्या.सोबतच प्रवचने,व्याख्याने,संतकथा यांच्या माध्यमातून समाजाची नाळ जोडून ठेवली. मात्र कोरोनाच्या काळात सगळीच समाजसेवा,समाजप्रबोधन ठप्प झाले.सोशल मीडियावर असेलही पण प्रत्यक्ष संवाद काळजाला थेट भिडतो,तो साधायचा अन लोकांना जागृत करायचं असं ठरलं आणि हा वक्ता एकटा निघाला पुणे, बीड व नगर जिल्ह्यातील कोविड सेंटरवर (Covid Centre) जात तेथे लोकांना आधार देत,निसर्गाचे महत्व पटवून देतानाच धैर्य खचु देवू नका ही वेळही जाईल अशी आपुलकीची साद आणि मनात एक सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम प्रसिध्द वक्ते गणेश शिंदे   करीत आहेत. 

      संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. "वक्ता दशसहस्त्रेषु" म्हणजे दहा हजारांत एक वक्ता सापडतो असेच झाले आहे आपल्या अमोघ वक्तृत्वाने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे एक वक्ते म्हणजे गणेश शिंदे यांच्याबाबतीत. त्यांनी आजवर शासनाच्या अनेक अभियानात महत्वाची भूमिका बजावली आहे. झी टॉकीज वरील मोगरा फुलला या अध्यात्मिक कार्यक्रमातून ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. नुकतीच प्रसार माध्यमातून व्हायरल झालेली 'काय सांगू राणी गाव सुटेना' या कवितेने तर अनेक तरुणांची मने जिंकली. वक्ता कवी म्हणून ते प्रसिद्धीच्या झोकात आहेतच पण सध्या गणेश शिंदे त्यांच्या जिगरबाज कृतीने अधिक चर्चेत आहेत.

      कोरोनाच्या संकटात समाजात अस्वस्थता आहे. रुग्णांचे मनोबल खचलेले आहे. अशा परिस्थितीत आपण घरी बसून कसे चालेल..? या विचाराने गणेश शिंदे सध्या कोविड सेंटरला भेटी देत रुग्णांशी संवाद साधत आहेत. पुणे, बीड व नगरमधील सुमारे १५ सेंटरला भेटी दिल्या आहेत. माणूस पहिल्यांदा मनात हरतो आणि मग रणांगणात म्हणून ही लढाई जिंकायची असेल तर आपण मनाने जिंकायला हवे. त्यासाठी रुग्णांनी त्यांच्या नातेवाईकांनी सकारात्मक विचार करायला हवा.रुग्णाचे मनोबल उंचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.रुग्णांशी आपल्या खुमासदार शैलीत संवाद साधताना ते काही काळासाठी तरी त्यांना एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातात. या परिस्थितीत आपण काय काळजी घ्यावी हे सांगत असतानाच येणाऱ्या काळात आपण निसर्ग, पर्यावरण, स्वच्छता, आरोग्य या संदर्भाने काय महत्वाची पाऊले उचलायला हवीत, यावर ते जागृती करत आहेत. इमारती उभ्या राहिल्या पण झाडे लावायाला आपण विसरलो. इंधनविहीरींची खोली वाढली, मात्र पाणी जिरवण्याचे भानच राहिले नाही. असे दाखले देत रुग्णांना जाणीव करुन देत आहेत.

       आज वर वक्ता म्हणून लोकांनी भरभरून प्रेम देले.आता आपण त्यांना धीर देण्याची गरज आहे.अशा परिस्थितीत अनेक सामाजिक संघटना राजकीय कार्यकर्ते, प्रशासकीय यंत्रणा झोकून देऊन काम करत आहेत. आपलीही सामाजिक बांधिलकी आहे, या भावनेतूनच हा उपक्रम हाती घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले. सामाजिक भान लक्षात घेऊन हे धाडसी पाऊल उचलणाऱ्या या वक्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने 'असे म्हणणाऱ्या तुकोबांची 'शब्द वाटू धन जन लोकांही' ही उक्ती सार्थ ठरताना दिसते.

No comments:

Post a Comment