महापौर पदाचा ‘चेकमेट’ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 28, 2021

महापौर पदाचा ‘चेकमेट’

 महापौर पदाचा ‘चेकमेट’


‘महापौर’
पदाची मुदत संपत आल्याने नगर शहरातील राजकीय पक्षांमध्ये कोरोना काळात चैतन्य निर्माण झालं आहे. नगर मनपाचा महापौर म्हणजे ‘मिनी आमदार’ असल्यासारखे महत्त्वपूर्ण सत्तास्थान. शहरात अनेक वर्ष भाजपा-शिवसेना युतीचे प्राबल्य असताना राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपला सोबत घेवून शिवसेनेला कात्रजचा घाट दाखविला. आज भाजपकडे महापौर पदाचा उमेदवार नसल्यामुळे राष्ट्रवादीला महापौर पद प्राप्त करण्याची आलेली संधी आमदार संग्राम जगताप कधीच गमविणार नाहीत यात शंका नाही. भलेही शिवसेनेचे शहरातील नेते, नगरसेवक मुख्यमंत्र्यांना भेटले असतील. शिवसेना संपर्क प्रमुख महापौर शिवसेनेचा होणार अशी वल्गना करीत असले, तरी शिवसेनेला अखेरच्या क्षणी आ. जगताप चेकमेट देण्याची शक्यता आहे. स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी काय घडलं याचा शिवसेनेने विचार करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्य चालवायचं आहे. त्यासाठी नगरमधील भेटायला आलेल्या नगरसेवकांना व शिवसेना नेत्यांमध्ये हवा भरण्यासाठी महापौरपदाचं गाजर भले दाखविलं ही असेल, पण ठाकरे नगरच्या महापौर पदासाठी मुख्यमंत्रीपद पणाला लावण्याची शक्यता कमीच आहे.

समजा शिवसेनेला महापौरपद मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी फिल्डींग लावावी परंतु शहरातील शिवसेनेत आलबेल नाही. गटातटात शिवसेना विभागलेली आहे. शिवसेनेला आज शहरात नेता नाही असं म्हणावं लागेल. अनिल भैया राठोड यांच्या हयातीत शिवसेना विखुरली होती ती आता अधिकच विस्कळीत झाली आहे. स्व. राठोड समर्थकांना विश्वासात न घेता शिवसेनेच्या संभाव्य महापौरपदाच्या उमेदवारीसाठी रोहिणी शेंडगेंचीे मुख्यमंत्र्यांची भेट शिवसेनेतील सर्व नेत्यांना एकत्र येवून घेतली असती तर महापौर पदासाठी शिवसेनेला मुख्यमंत्र्यांनीही पाठबळ दिलं असते. पण सर्वाधिक 23 नगरसेवक असणार्‍या शिवसेनेत महापौर पदाबाबत एक मत नसेल ,तर मुख्यमंत्री या निवडणुकीत लक्ष घालण्याची शक्यता कमीच आहे. स्व.अनिल राठोड यांचे पुत्र विक्रम राठोड यांनी शिवसेनेतील गटतट संपविण्याचा चांगला प्रयत्न केला असला, तरी या प्रयत्नांना महापौरपदाच्या निवडणुकीवरून सुरंग लागल्याचे दिसत आहे. मुंबईत गेलेल्या महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या शिवसेना नेत्यांच्या राजकीय हालचालीनंतर शिवसेनेच्या दुसर्‍या गटाने महापौर पदासाठी रीता भाकरे यांचं नाव पुढे करून नवी खेळी केली आहे. आता रोहिणी शेंडगे कि रिता भाकरे या दोन नावातून एकच नाव पुढे आलं, तर महापौरपदाच्या निवडणुकीत रंगत येणार आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत राज्याच्या शिवसेना नेत्यांनी शिवसेनेतील गट संपविण्याचा प्रयत्न केला नाही तर शिवसेनेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
आगामी महापौर पदासाठी सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये पडद्याआडून हालचाली सुरू आहेत. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांच्या पत्नी शीला चव्हाण यांचे तर, शिवसेनेकडून संजय शेंडगे यांच्या पत्नी रोहिणी शेंडगे यांची नावे पुढे येत आहेत. काँग्रेसचे महापालिकेतील संख्याबळ कमी असले तरी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यातील काँग्रेसचे वजनदार मंत्री आहेत. सेनेचे मंत्री या नात्याने महापौर निवडणुकीची सूत्रे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे येतील, असे दिसते. त्यामुळे महापौर निवडणुकीतही या दोन मंत्र्यांसह  आमदार संग्राम जगतापांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
थोरात, गडाख व जगताप कुणाच्या मागे ताकद उभी करतात, त्यावरच नगरचा पुढचा महापौर ठरणार आहे.राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाही एकत्रित सामोरे जाण्याचा निर्णय महाविकास आघाडीत झालेला आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूकही या तिन्ही पक्षांनी एकत्र लढविली. त्यापूर्वी झालेल्या महापालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीतही हे पक्ष एकत्र आले होते. अर्थात सेनेकडून जलसंधारण मंत्री गडाख यांनीच त्यासाठी पुढाकार घेतलेला होता. त्यानंतर प्रथमच आता महापौरपदाची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीतही सेनेकडून गडाख यांच्यावर जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील स्थानिक नेत्यांना एकत्र आणण्याचे शिवधनुष्य गडाखच पेलू शकतात, असा एक मतप्रवाह आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीत गडाख यांनी ते सिध्दही केले आहे.
महापालिकेत शिवसेना नंबर एकचा पक्ष आहे. त्यामुळे महापौरपदावर सर्वात आधी सेनेने दावा ठोकला. त्यापाठोपाठ काँग्रेसने चव्हाण यांचे नाव पुढे करत महापौरपदावर दावा सांगितला आहे. पण, मनपात राष्ट्रवादी क्रमांक दोनचा पक्ष आहे. तिन्ही पक्षांमध्ये ज्याची ताकद जास्त, त्या पक्षाला महत्त्व, असे सत्ता स्थापनेचे सूत्र आधीच ठरलेले आहे. या निकषानुसार शिवसेनेचे पारडे जड आहे. परंतु, सेना गटातटात विभागली गेली आहे. त्यांच्यात स्थानिक पातळीवर एकमत होईल, अशी परिस्थती अजिबात नाही. अप्रत्यक्षरित्या काँग्रेससाठी ही संधी आहे. परंतु, त्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची काँग्रेसला मदत घ्यावी लागेल. तसेच थोरात यांना वरिष्ठ पातळीवर आपले वजन वापरावे लागेल. चव्हाण हे थोरात यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे थोरात हे त्यांच्यासाठी आग्रही राहतील. मंत्री थोरात व गडाख यांनी ठरविल्यास ते शक्यही होईल. परंतु सेनेच्या पदाधिकार्‍यांना ते मान्य राहिल का हा एक प्रश्न आहे.
शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेचाच महापौर होणार, असा दावा पक्षाकडून केला जात आहे. अहमदनगरच्या महापौर पदाची मुदत 30 जूनला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरचे शिवसेना पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. यावेळी नगरच्या महापौर पदाबाबत समीकरणं जुळवण्यावरुन, महापौरपदाच्या उमेदवारीवरुन चर्चा झाल्याची माहिती आहे.गेल्या वेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपचा महापौर झाला होता, मात्र यावेळी शिवसेनेचाच महापौर होणार असा दावा पक्षाने केला आहे. अहमदनगरचे महापौर पद अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असल्याने कोणाची वर्णी लागणार, याकडे लक्ष आहे. यंदा कोणते समीकरण पाहायला मिळणार याचीही उत्सुकता आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here