पवार - फडणवीसांच्या भेटीमागचे राजकारण (भाग- १) - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

पवार - फडणवीसांच्या भेटीमागचे राजकारण (भाग- १)

 पवार - फडणवीसांच्या भेटीमागचे राजकारण (भाग- १)



नगरी दवंडी

मागे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राजकीय आत्मकथा 'लोक माझे सांगाती' ही पुस्तकाच्या रूपाने लोकांसमोर आली होती. आपल्या पाच दशकांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासातील अनेक धागेदोरे आणि कंगोरे पवार साहेबांनी लोकांसमोर मांडले होते. त्यामध्ये पवार साहेबांनी अनेक गौप्यस्फोटही केले होते. अनेक पक्षांबरोबर असलेले संबंध, समविचारी, भिन्नविचारी पक्षांसोबत असलेले संबंध यावर पवार साहेबांनी भाष्य केले होते. त्यामध्ये पवारसाहेबांनी एक उल्लेख केला होता की 'वैचारिक मतभेद असले तरी सुसंवाद ठेवता येतो' आणि हाच अनुभव पवारांच्या चाहत्यांना कार्यकर्त्यांना किंवा महाराष्ट्राला वेळोवेळी येतच असतो आणि आजही तो आला.  पवार हे पुरोगामी विचारधारेचे असले तरी पवार यांच्याकडे वैचारिक ताठरपणा नसून वैचारिक लवचिकता असल्याचे वेळोवेळी दिसून येते. अगदीच भिन्नविचारी पक्षांशी किंवा भिन्नविचारी पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे घनिष्ट संबंध आहेत. अगदी त्या काळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे नेते आणि देशभरात हिंदुरुदयसम्राट म्हणून ओळखले जात होते. त्या हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी सेक्युलर असणाऱ्या पवार साहेबांचे अगदी जवळचे संबंध होते आणि पवार साहेब वेळोवेळी आपली मैत्री निभवण्यासाठी मातोश्रीवर जात असत आणि बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेत असत त्यावेळी त्यांना जर का पत्रकाराने विचारलं की तुम्ही अगदी आपल्या कट्टर राजकीय विरोधकाशी किंवा भिन्न विचारी पक्षाच्या नेत्यांशी तुम्ही भेटीगाठी कशा काय घेतात.  त्या वेळी ते सांगत की ज्यावेळी मी मातोश्रीवर जातो त्यावेळी राजकारणाचे जोडे बाहेर काढून ठेवतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शरद पवार यांना अनेक सभांमध्ये शेलक्या विशेषणांचा वापर करत असत. बारामतीचा म्हमद्या, मैद्याचं पोतं असे अनेक शिवराळ शब्दप्रयोग शरद पवारांच्या बाबतीत करण्यात येत असत. त्यावेळी महाराष्ट्राच्या सत्ताकारणांमध्ये शरद पवार यांचं मोठं वर्चस्व होतं आणि अशा शरद पवारांवर टीका केल्याशिवाय बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला मजा येत नसे. परंतु तरीसुद्धा शरद पवार बाळासाहेबांना खिलाडूवृत्तीने घेत असत आणि मैत्री मैत्रीच्या जागेवर आणि राजकारण राजकारणाच्या जागेवर ठेवत असत बाळासाहेब ठाकरेही मोठ्या मनाने शरद पवारांचा सन्मान करत असत. शरद पवार जरी सेक्युलर विचारधारेचे असले तरी त्यांच्याकडे वैचारिक लवचिकता आहे आणि या वैचारिक लवचिकतेचे मुळेच भिन्न विचारी पक्षांसोबत अगदी हिंदुत्ववादी पक्षांसोबत सरकार बनवून ते टिकवण्याची किमया शरदराव पवार यांनी करून दाखवली आहे. राजकारणात वैचारिक लवचिकता असलीच पाहिजे तरच सत्ताकारण जुळवता येत,  हे तात्कालिन अटल बिहारी वाजपेयी सरकारने दाखवून दिलं आहे. अगदी टोकाच्या भिन्न विचारधारा असल्या तरी सुसंवाद साधला गेला पाहिजे याचाच आणखी एक उदाहरण म्हणजे मनमोहन सिंग सरकारमध्ये शरद पवार देशाचे कृषी मंत्री होते त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि शरद पवार हे नरेंद्र मोदी यांना भेटण्यास गुजरातमध्ये जात असत. काँग्रेसचे निर्बंध झुगारून शरद पवार मोदींशी मैत्री जोपासत असत. त्या वेळी काँग्रेसचे आणि भाजपचे विळा भोपळ्याचे नाते होते. तरीसुद्धा काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीतील एका घटक पक्षाचा मंत्री भाजपच्या मुख्यमंत्र्याकडे भेटायला जातो हे काँग्रेससाठी आणि राहुल गांधींसाठी त्यावेळी अवघड जागचे दुखणे झाले होते. त्यामुळे काँग्रेसने शरद पवार यांच्यावर अनेक आक्षेप घेतले होते तरीही त्या आक्षेपांना न जुमानता शरद पवार हे नरेंद्र मोदी असतील किंवा भाजपचे अनेक नेते असतील यांच्याशी संबंध जुळवूनच राहिलेले पाहायला मिळते . सांगायचं तात्पर्य असं की नुकतेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आणि त्या भेटीची मोठी बातमी झाली. बातमी होणे हे स्वाभाविकच आहे. कारण राज्यात राजकीय अस्थिरता असलेले सरकार कार्यरत आहे. राजकीय अस्थिरता असेल तर सरकारला निर्णय घेण्यात अडचणी निर्माण होतात किंवा वेळ तरी लागतो. तीन पक्षांचे मिळून सरकार बनवल्यामुळे कोणता पक्ष कधी पाठिंबा काढून घेईल. कोणता पक्ष कुठल्या मागण्या करील यामुळे एक राजकीय अस्थिरता महाराष्ट्रात दिसत असते आणि मग या भेटीगाठी यांना महत्त्व प्राप्त होतं. मागे काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची गुजरातमधील अहमदाबाद मध्ये भेट घेतली होती. त्या भेटीची अशीच बातमी झाली होती परंतु ही भेट गुप्त होती. पण आता शरद पवार आजारपणानंतर अनेक दिवसानंतर राजकारणात सक्रिय झालेले पाहायला मिळाले. भाग 1

No comments:

Post a Comment