मुळ अहमदनगरकर पोलीस बांधवाकडून कोविड सेंटरला मदतीचा हात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

मुळ अहमदनगरकर पोलीस बांधवाकडून कोविड सेंटरला मदतीचा हात

 मुळ अहमदनगरकर पोलीस बांधवाकडून कोविड सेंटरला मदतीचा हात 

भाळवणीतील शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिराला अडीच लाखांचे सहाय्य

आमदार निलेश लंके यांच्याकडे धनादेश सुपूर्द



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी 

लोकवर्गणीतून निवडून आलेल्या आपल्या लोकप्रतिनिधीने लोकसहभागातून राज्यातील आदर्शवत असे कोविड सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणाहून हजारो रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आमदार निलेश लंके यांच्या कामाची कीर्ती सर्वदूर पोहोचली आहे. असे असताना त्यांच्या या सामाजिक कार्याला अल्पसा हातभार लागावा या उद्देशाने अहमदनगर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिराला दोन लाख 51 हजार रुपयांची मदत दिली. आ.लंके यांच्याकडे मदतीचा धनादेश नुकताच सुपूर्द करण्यात आला. या माध्यमातून संबंधित पोलिस बांधवांनी आपल्या कर्मभूमी बरोबरच जन्मभूमीशीही बांधिलकी जपली आहे.

पारनेरसह  अहमदनगर जिल्ह्यातील अनेकजण वेगळ्या ठिकाणी पोलीस दलात काम करीत आहेत. त्यामध्ये पोलीस उपआयुक्तांपासून कॉन्स्टेबल पर्यंत कर्तव्य निभावतात. विशेष करून मुंबई आणि नवी मुंबईत सर्वाधिक अहमदनगरकर खाकी वर्दीची इमानेइतबारे सेवा करीत आहेत. याशिवाय नागपूर सह इतर जिल्ह्यातही त्या त्या ठिकाणी मुळ अहमदनगरचे पोलीस आपले कर्तव्य निभावत आहेत. एस आर पी या व्यतिरिक्त रेल्वे पोलीस दलातही अहमदनगरकर नोकरी करतात. विना काना वेलांटी मात्रा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचे एक ऐतिहासिक महत्त्व आहे. या ठिकाणी देशप्रेमाचा आणि लढवय्या पणाचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे नोकरी निमित्त जरी संबंधित पोलिस कर्मचारी आणि अधिकारी बाहेर असले तरी त्यांची आपल्या मूळ भूमीशी नाळ कायम जोडलेली आहे. कर्म भूमी बरोबरच जन्मभूमी वर त्यांचे विशेष प्रेम असल्याचे नुकतेच प्रत्ययास आले. भाळवणी या ठिकाणी आमदार निलेश लंके यांनी शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर नावाने कोविड सेंटर सुरू केले आहे. लोकसहभागातून सुरू केलेल्या या आरोग्य केंद्राची महती  सातासमुद्रापार पोहोचले आहे. मदतीचा ओघ सुरू झालेला आहे. त्यानुसार आपणही आपल्या मातीशी असलेले बांधिलकी जपण्याचा संकल्प जिल्ह्यातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बांधवांनी आपण कर्तव्य बजावत असलेल्या ठिकाणी केला. अर्थात समाज माध्यमावर हे सर्व जण एकत्र आले. म्हणजेच व्हाट्सअप ग्रुप करून अहमदनगर मधील मूळ पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यामध्ये समावेश करून घेण्यात आला. माहितीचे आदान-प्रदान त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयांवर सकारात्मक चर्चा या ग्रुपवर सातत्याने सुरू असते. या पोलीस ग्रुपचे ॲडमिन गोकुळ शिंदे यांनी पुढाकार घेऊन आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिराला मदतीचा हात देण्याची संकल्पना या ग्रुपवर मांडली. साहाजिकच बर्‍याच जणांनी या कामाला हातभार लावण्यासाठी सकारात्मकता दर्शवली. आणि पाहता-पाहता दोन लाख 51 हजार रुपयांचा निधी पोलीस बांधव आणि भगिनींनी जमा केला. नुकताच मदतीचा धनादेश आमदार निलेश लंके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी पोलीस निरीक्षक हनुमंत ढवण , निलेश लंके प्रतिष्ठान चे मुंबई सचिव नितीन  चिकणे , संतोष उंडे बाबाजी जगताप, गोपिनाथ  पठारे आणि गोकुळ  शिंदे उपस्थित होते. निलेश लंके प्रतिष्ठान चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी, सचिव अॅड  राहुल झावरे यांनी पोलिस बांधवांचे आभार मानून त्यांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.


पारनेर सह अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस बांधवांना एकत्रित करण्यासाठी आम्ही एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे. ग्रुप ॲडमिन म्हणून मी सर्व सदस्यांना भाळवणी येथील कोविड सेंटरला मदत करण्याची संकल्पना मांडली. त्याला अनेकांनी  प्रतिसाद देऊन सढळ हाताने मदत केली. एकत्रित करून आम्ही दोन लाख 51 हजार रुपयांचा धनादेश कार्यक्षम व कार्य तत्पर आमदार निलेश लंके यांच्याकडे सुपूर्द केला. आपल्या माणसांसाठी पारनेर नगरचे आमदार रात्रीचा दिवस करीत आहेत . त्यांना साथ देण्याच्या उद्देशाने पोलीस बांधवांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.

गोकुळ शिंदे मुंबई पोलीस

No comments:

Post a Comment