भाळवणी कोविड सेंटरमधील १ हजार ४०० रुग्णांची कोरोनावर मात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 7, 2021

भाळवणी कोविड सेंटरमधील १ हजार ४०० रुग्णांची कोरोनावर मात

 भाळवणी कोविड सेंटरमधील १ हजार ४०० रुग्णांची कोरोनावर मात

६५० कोरोनाबाधितांवर उपचार सुरू

वैद्यकीय पथकासह स्वयंसेवक करतात रात्रंदिवस सेवा



नगरी दवंडी

पारनेर - प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरातील (कोविड सेंटर) दोन हजार कोरोना बाधित रुग्णांपैकी १ हजार ४१५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती येथील नोडल ऑफिसर डॉ अन्विता भांगे डॉ. मनीषा माणूरकर यांनी दिली. उर्वरितांवर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. येथील नियोजनासाठी आमदार निलेश लंके हे सेंटरमध्येच ठाण मांडून आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी मागील महिन्यात १ हजार १०० बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. आ.लंके हे दिवसरात्र येथेच थांबून आहेत. येथील रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांबरोबर बाधित रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल तपासणे, त्यांच्या शरीराचे तापमान मोजणे, त्यांच्याशी चर्चा करून काय त्रास होत आहे हे जाणून घेणे. यातून तुम्हाला नक्की बरं करणार ही आत्मविश्वासाची भावना त्यांच्या मनात बळकट करणे, ही कामे स्वतः आमदार लंके करीत आहेत. त्यामुळे रुग्णांमध्येही सकारात्मकता निर्माण होत आहेत. त्यातून त्यांना कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करण्यास बळ मिळत आहे.आ.लंके यांनी निर्माण केलेल्या सकारात्मक वातावरणाने परिणामी भाळवणीच्या आरोग्य मंदिरात कोरोनालाही माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात घरवापसी करणाऱ्या परप्रांतीय, दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिक, पायी घराकडे चाललेले, अन्न, पाण्यासाठी कासावीस झालेल्या जिवांसाठी सुप्यात मोफत भोजन व्यवस्था त्यांनी त्यावेळी केली होती. भाळवणीतील कोविड सेंटरमध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारीही नेटाने काम करीत आहेत. तर दुसरीकडे या कोळी सेंटरमध्ये रात्रंदिवस स्वयंसेवक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे पैलवान पिंटू गोडसे बाळासाहेब खिलारी उद्योजक विजय औटी सत्यम निमसे संदिप गुंजाळ अभिषेक शिंदे धनु घुमटकर नितीन मुरकुटे यांच्या शेकडो कार्यकर्ते काम करत आहेत. 

योगासने, व्यायामाकडेही आमदारांचे लक्ष

शरदचंद्र पवार महाकोव्हिड सेंटर याठिकाणी ६०० ते ६५० रूग्ण उपचार घेत असुन आमदार नीलेश लंके भाळवणीच्या कोविड केअर सेंटरमध्येच राहत आहेत. सामान्यांप्रमाणेच तेथेच ते जमिनीवर झोपत आहेत. रुग्णांवर केवळ औषधोपचारच करत नाहीत, तर त्यांच्या मनोरंजनाची व्यवस्था केली आहे. योगासने व व्यायाम, आहार, विश्रांती याकडेही लंके हे स्वतः लक्ष देतात असेही डॉ अन्विता भांगे डॉ. मानसी माणूरकर यांनी सांगितले.

शरदचंद्र पवार महाकोव्हिड कोविड सेंटरमधील सोयीसुविधा

भुजबळ कुटुंबीयांनी १० एकराचे मंगल कार्यालय विनामोबदला दिले.रुग्णांवर मोफत उपचार, सकाळी नाश्ता, दुपारी शाकाहारी व सायंकाळी मांसाहारी जेवण दिले जाते.दररोजचा खर्च ३ लाख रुपये.लोकसहभागातून आतापर्यंत १ कोटीचा निधी जमा झाला.१५ ट्रक अन्नधान्य व पंधरा ट्रक भाजीपाला, इतर साहित्य लोकांनी दिले.पुण्यातील एका व्यक्तीने २ लाख रुपये खर्च करून पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवली.दररोज कोरोना संसर्ग झालेली २०० ते ३०० लोक येतात प्रतिष्ठानचे शंभरपेक्षा अधिक स्वयंसेवक अविरत काम करतात ५० पेक्षा अधिक आरोग्य कर्मचारी, डॉक्टरही मोफत सेवा करतात.


मी तर जनतेचा जनसेवक आ.लंके

कोरानाची दुसरी लाट आली असून गोरगरीब कष्टकरी शेतकरी गरजू रुग्णांना आधार देण्यासाठी भाळवणी येथे शरद चंद्रजी पवार यांच्या नावाने महाकोव्हिड सेंटर सुरू केले आहे

ज्या  लोकांनी आमदार म्हणून जनसेवेचे संधी दिली त्या गरिबांची सेवा करून ऋण फेडतोय. कामाला २४ तास पुरत नाहीत. दिवस ४८ तासांचा केला तरी मला वेळ कमी पडेल. मला काही तरी होईल म्हणून घरात बसलो तर मला संधी दिलेल्यांकडे कोण पाहील. मी जनतेचा सेवक आहे असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment