आणखी एक निर्मळ मनाचा हसरा तारा निखळला... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 22, 2021

आणखी एक निर्मळ मनाचा हसरा तारा निखळला...

 आणखी एक निर्मळ मनाचा  हसरा तारा निखळला...


अहमदनगर-
आजही सायंकाळी ढग दाटून आले होते. सर्वत्र अंधारल्यासारखे झाले. थोडीशी निराशा देखील पसरली. ढग तर पावसाळी घनदाट मात्र पावसाचा थेंबही नाही.  अचानक मधूनच एक लख्ख किरणांचा झोत बाहेर पडला आणि मग कॅमेरा शोधण्याची घाई सुरु झाली. सज्ज होईपर्यंत जे आपल्या हातात नसते तेच झाले. मला टेरेसवर जाईपर्यंत तो  लुप्त झाला होता . मी दुसर्‍या क्षणाची वाट पाहत थांबून होतो. निराशेचे काही ढग बाजूला झाले आणि पुन्हा आशावाद पसरला. कॅमेरा सरसावला आणि प्रसाद बेडेकर सर यांचा फोन आला. आज बेडेकर सरांचा वाढदिवस आणि लग्नाचाही वाढदिवस होता. फेसबुकवर मी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या परंतु योगायोगाने त्यांचाच फोन आला म्हणून मी लगेच शुभेच्छा म्हणे पर्यंत सर म्हणाले तुम्हाला काही समजले का ? पुन्हा एकदा काळजाचा ठोका चुकला. सर म्हणाले रामदिन सर आत्ताच एक्सपायर्ड झाले........ ओ माय गॉड ... काही सेकंद मला काहीच सुचेना आणि विश्वासही बसेना ...सर अडमिट होते .. रोज आम्ही मित्र चौकशी करत होतो. चारच दिवसापूर्वी ते आता पूर्ण बरे झाले.. स्वतःच्या हाताने जेवण करतात हे समजले होते. मृत्यूच्या दाढेतून ते बाहेर आल्याची खात्री वाटत असतानाच काळाने आज आणखी एक नगरचा हिरा हिसकावून नेला. खरंच आपले हे दुर्दैव आहे. विज्ञानाची हार आहे. हतबलता आहे.
प्रमोद रामदिन हे भाऊसाहेब फिरोदिया शाळेत कला शिक्षक होते. मेटल एम्बॉसिंग या प्रकारावर त्यांची हुकूमत होती. अनेक देवदेवता आणि ऐतिहासिक वास्तूंचे त्यांनी ताम्रपटावर लीलया कोरीव काम केलेले आहे. सतत हसतमुख आणि प्रसन्नता हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते. आम्ही अनेक वेळा एकत्र निसर्ग भटकंती केली. सरांना गाण्याची भारी हौस. आवाज साधारण असतानाही किशोर कुमार त्यांच्या नसानसात भिनलेला होता. त्यामुळे सतत मनसोक्त  गाणारा  हा अवलिया एक उत्तम खवय्या देखील होता. आपल्या स्वतःच्या कलेपेक्षाही दुसर्‍याच्या कलेला उस्फुर्त दाद देण्याची दानत असणारा हा अवलिया अचानक आम्हाला राम राम ठोकून मोकळा झाला. आजचे ढग खरंच निराशेचे होते. इतका वेळ ढगाआड लपलेला  तो सूर्य  पुन्हा बंधने तोडून बाहेर आला. रोज घाईने मावळणारा हा आज जरा थबकला होता. त्याच्या मनोहारी रूपाचे गोडवे गाणारा माझा कॅमेराही रुसला होता. आज रामदिन सर जरी देह रूपाने आपल्यात नसतील तरीही हृदयाच्या ताम्रपटावर  त्यांनी कोरलेल्या अनंत आठवणी सतत आपल्या बरोबर राहतील . अलविदा रामदिन सर ...अलविदा ...
ये जीवन हैं .. इस जीवन का ... यही है ... यही हैं रंग रूप...

No comments:

Post a Comment