सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मराठा समाज संतप्त...सोशल मीडियावर मराठा लोकप्रतिनिधींना श्रद्धांजली. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 6, 2021

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मराठा समाज संतप्त...सोशल मीडियावर मराठा लोकप्रतिनिधींना श्रद्धांजली.

 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मराठा समाज संतप्त...सोशल मीडियावर मराठा लोकप्रतिनिधींना श्रद्धांजली.नगरी दवंडी

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) -राज्यातील मराठा समाजाला राज्य शासनाने लागू केलेले आणि उच्च न्यायालयाने मान्य केलेले मराठा समाजाचे आरक्षण काल सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले.यानंतर राज्यभरातील मराठा समाजात त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

सकाळी 11 वाजता सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्याबरोबर राज्याच्या सर्वच जिल्ह्यातून मराठा समाजातील बांधवांकडून संतप्त अशाप्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त झाल्या .राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडली नाही असा आरोप नेहमी प्रमाणे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या नेतेमंडळींनी केला, तर हा निकाल निराशाजनक, दुर्दैवी असून कायदेशीर लढाई सुरू राहील असे मत सत्ताधारी नेत्यांनी व्यक्त केले.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दिलेले मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकले. मात्र सर्वोच्च न्यायालयात राज्य शासन बाजू मांडण्यात कमी पडले असे मत एका गटाने व्यक्त केले. तर फडणवीस यांनीच पंतप्रधानांचे कान भरून सर्वोच्च न्यायालयात या आरक्षणाच्या विरोधात निकाल देणे भाग पाडले असा गंभीर आरोप काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला.

आमची सहनशक्ती आता संपली असून मराठे पुन्हा उसळणार अशा प्रतिक्रिया देखील व्यक्त झाल्या .तिसरी लाट कोरोणाची नवे तर मराठ्यांची येणार, मोठे आंदोलन उभे राहणार आता माघार नाही अशा ही पोस्ट सोशल मीडिया वर वाचायला मिळाल्या .

आमचा प्रश्न मिटवा नाही तर संपूर्ण आरक्षण हटवा अशी नवी प्रतिक्रिया देखील व्यक्त झाली आणि तिला लाखो च्या संख्येने लाईक मिळाल्या.ना रक्षण ना आरक्षण फक्त राजकारण अशी भावना देखील व्यक्त करण्यात आली .

८०% मिळून देखील पोरगं ४० % वाल्यांकडून हरुन गेले अशी ही भावना व्यक्त झाली तर सोलापूरच्या एका ग्रुप वर दोन रुपये किलो तांदूळ घेण्यासाठी नव्हे तर घोडयांच्या शर्यतीत गाढव पुढे जात होते म्हणून आरक्षण मागितले अशा प्रतिक्रिया देखील ऊमटल्या.न्यायालयाचा हा निकाल आल्यानंतर राज्यातील सर्व मराठा आमदार, खासदार यांना जाहीर श्रद्धांजली वाहण्यात आली .

आजचा दिवस हा मराठा समाजासाठी काळा दिवस आहे असे ही काहींनी म्हटले तर मराठा आरक्षणासाठी आता पुन्हा मोठे आंदोलन उभारावे लागेल याचे सुतोवाच करतांना तुम देख लेना आखो से,हम फिर आयेंगे लाखो से अशी घोषणा देखील करण्यात आली .

मराठा आरक्षणाचा चेंडू आता केंद्राच्या ताब्यात असून घटना दुरुस्ती शिवाय मराठा आरक्षण मिळू शकत नाही असे मत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी बी सावंत व बी जे कोळसे पाटील यांनी नोंदवले .सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे दुरगामी परिणाम राज्याच्या राजकारणावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .

मुस्लीम,धनगर आरक्षण

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील मुस्लिम आणि धनगर समाजांना आरक्षण मिळण्याची शक्यता आता मावळली आहे .

शंभर टक्के आरक्षण द्या

प्रत्येक समाजाला आरक्षणाचीमागणी आता वाढीस लागली असून प्रत्येक समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी शंभर टक्के आरक्षणाचा कायदा केंद्र सरकारने संसदेत पास करावा आणि प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्या राज्यातील लोकांना आरक्षण द्यावे अशी मागणी मिल्लत फाउंडेशन या संघटनेने केली आहे.

No comments:

Post a Comment