शेतकऱ्याच्या दुधाला पाण्याचे भाव ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, May 22, 2021

शेतकऱ्याच्या दुधाला पाण्याचे भाव !

 शेतकऱ्याच्या दुधाला पाण्याचे भाव !

दुधाचे भाव घसरल्यामुळे पशुपालन व्यवसाय संकटात !नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी (संतोष सोबले)

शेतातील उत्पन्नाला बाजारात भाव नाही तर दुसरीकडे संचारबंदीमुळे पशुखाद्याच्या किमती वाढत असताना, गाईच्या दुधाचा भाव उतरल्याने एक लिटर बाटली बंद पाण्याच्या दरात दूध विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक आता थांबणार का ? लॉकडाऊनमुळे बाजारभावातील चढ-उतार आणि त्यातही दुधाच्या उतरलेल्या किमती यामुळे शेतकरी  मेटाकुटीला आला आहे.

कोरोनाची दुसरी लाट, त्यामागून आलेली टाळेबंदी याचा फायदा उचलत बाजारात मागणी नसल्याचा कांगावा करत दुधाचे दर कमी केले आहेत. मात्र, प्रत्यक्षात दुधाला प्रतिलिटर उत्पादन खर्चा एवढा देखील दर सध्या मिळत नाही. जनावरांच्या खुराकाच्या वाढलेल्या किमती व चाऱ्याचा विचार केला तर शेतकऱ्यांना एक लिटर दूध उत्पादनासाठी तब्बल २५ रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, हेच दूध सध्या २० ते २३ रुपये दराने विकले जात असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे जनावरांना लागणारा खुराकही लॉकडाउनमुळे वेळेवर मिळत नसल्याने, दुधामध्ये मोठ्या प्रमाणात घट येत आहे. शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे तसेच पशुखाद्यासह कडब्याच्या दरात वाढ झाल्याने आधीच संकटात सापडलेल्या दूध उत्पादकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असणाऱ्या गायीच्या दुधाला २३ रुपये दर दिला जात आहे. प्रत्यक्षात राज्य सरकारने दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मिती व विक्रीवर कोणतेही निर्बंध लादले नाहीत. मात्र, प्राप्त परिस्थितीचा फायदा उचलत दूध संस्था दूध उत्पादकांची पिळवणूक करत आहेत. दुधाचे भाव घसरल्यामुळे पशुपालन व्यवसाय संकटात !

लॉकडाउनमुळे शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे. दुधासह शेतमालाचे भाव घसरले असल्याने पशुपालक शेतकरी अडचणीत आला आहे. शेतीबरोबर पशुपालन व्यवसाय संकटात सापडला आहे. दुधाचा भाव 34 रुपयांवरून 20 रुपयांपर्यंत खाली आलेला आहे. मात्र, दुसऱ्या बाजूने जनावरांसाठी आवश्‍यक पेंडीचे भाव गगनाला भिडले असल्यामुळे दुग्ध व्यवसाय धोक्‍यात आलेला आहे. त्यात शेतकरी घायकुतीला आलेला आहे.  

अनिल देठे पाटील (शेतकरी नेते)


दूध उत्पादकांची पिळवणूक थांबवा! 

एक लिटर बिसलरीचे पाणी बनविण्यासाठी पॅकिंगसह तीन रुपये खर्च येतो. मात्र बाजारात बिसलरी २० रुपये लिटरने मिळते. एक लिटर दुधाला २५ रुपये उत्पादन खर्च येतो. मात्र, त्याचा दर २० ते २३ रुपये मिळतो. हे अन्यायकारकच आहे. सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा.

-   शरद औटी, दूध उत्पादक

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here