आ. लंके यांचे काम पाहून आर आर पाटलांच्या आठवणींचा उजाळा ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 10, 2021

आ. लंके यांचे काम पाहून आर आर पाटलांच्या आठवणींचा उजाळा !

 आ. लंके यांचे काम पाहून आर आर पाटलांच्या आठवणींचा उजाळा ! 

आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांचे गौरवोदगार ! 


पारनेर :
कोरोना संकटाच्या काळात अनेक लोकप्रतिनिधी काम करीत आहेत. परंतू १ हजार १०० बेडच्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदीराच्या माध्यमातून स्वतःचा जिव धोक्यात घालून आ. नीलेश लंके जे काम करीत ते पाहून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व.आर आर पाटील यांच्या आठवणींना उजाळा मिळत असल्याचे गौरवोदगार राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी काढले. 
     केडगांव येथील पोपटराव पवार मित्र मंडळाच्या वतीने आ. लंके यांच्या नेतृत्वाखालील भाळवणी येथील कोव्हीड सेंटरला रविवारी टेम्पोभर साहित्य भेट देण्यात आले. त्यानिमित्त उपस्थितांशी संवाद साधताना पवार यांनी आ. लंके यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. यावेळी अ‍ॅड. राहूल झावरे, बाळासाहेब खिलारी, दत्ता कोरडे, संदीप चौधरी ,राजेंद्र चौधरी, अशोक रोहोकले, किसन सातपुते, सचिन ठाणगे, अविनाश जाधव, डॉ.योगेश पवार, शाम पवार, सुरज भुजबळ, बापू शिर्के, प्रमोद गोडसे, संदीप रोहोकले, मुंकूंद शिंदे, सत्यम निमसे, संदीप रोहोकले आदी यावेळी उपस्थित होते. 
     पवार म्हणाले, आर आर आबांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यांच्या रूपाने महाराष्ट्रात ग्रामविकासाचे न भूतो न भविष्यती अशी मोठी चळवळ उभी राहिली. कोरोना संकटाच्या काळात अनेक आमदार, खासदार तसेच इतर लोकप्रतिनिधी काम करीत आहेत. परंतू भाळवणी येथे तरूण असलेले आ. लंके पूर्ण वेळ झोकून  देऊन ज्या पद्धतीने काम करीत आहेत ते कौतुकास्पद आहे. त्यांचे हे काम पाहून आर आर पाटील यांच्या आठवणींना उजाळा मिळतो. आ. लंके कोव्हीड सेंटरमध्येच झोपतात, रूग्णांची आस्थेवाईपणे चौकशी करतात.त्यातून विश्‍वास निर्माण होतो. याच विश्‍वासाच्या भावनेतून रूग्णांच्या मनामध्ये आपणास काही झाले नसल्याची भावना निर्माण होते. कुटूंबासारखी भावना मिळाल्याने रूग्ण आजारातून बाहेर पडतो. संकटाच्या काळात अशाच पद्धतीने सर्वांनी काम केले समाजावर आलेले हे संकट आपण नक्कीच दुर करू असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

जागतिक महामारी 
जगाच्या पाठीवर आजपर्यंत वेगवगळया स्वरूपाची महामारी आलेली आहे. त्यावेळी त्या त्या देशापुरती महामारी मर्यादीत असे. कोरोनाची महामारी मात्र जागतीक स्तरावर आलेली आहे. विमान, समुद्री वाहतूकीमुळे जग वेगवान झालेलं आहे. त्यामुळेच महामारीचा फैलाव जगभर झाला. या वैश्‍विक महामारीत पुढारपण करणाऱ्या कार्यकर्त्यांची भुमिका फार महत्वाची आहे. खासदार, आमदारांपासून सरपंचापर्यंत विकासाचे काम करताना ज्यावेळी समाजावर संकट येते त्या काळात समाजासाठी धावून जाणे ही लोकप्रतिनिधीची पहिली जबाबदारी आहे. वेळेत सगळ्या सोई सुविधा उपलब्ध करून देणे हे खूप गरजेचे असते ते काम आ. लंके हे चोखपणे बजावत असल्याचे पवार यांनी सांगितले. 

म्हणून जबाबदारी आहे पुढाऱ्यावरी ! 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संगत 'पुढारी वागती जशी गावोगावी तशी लोकं वागती घरोघरी, म्हणून जबाबदारी आहे पुढाऱ्यावरी !' विनोबा भावे यांनीही त्यांच्या आत्मचिंतामध्ये अशीच मांडणी केली आहे. तुम्ही कोणत्या पक्षाचे, जातीचे आहात यापेक्षा तुमच्या मनात समाजाविषयी जी आंतरीक भावना आहे. ती भावनाच मोठं काम उभे करू शकते. लोकप्रतिनिधीच्या मनामध्ये जी अंतरिम भावना असणे गरजेचे असते ती भावना आ. लंके यांच्या कार्यातून दिसून येते. 

संकटकाळातील योग्य नेतृत्व ! 
संकटामध्ये स्वतःचा जिव झोकून  देउन सेवा करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. अशा आव्हानात्मक स्थितीमध्ये जो स्वतःला झोकून देतो तोच खरा लोकप्रतिनिधी असल्याचे सांगून यावेळी पुढे बोलताना पवार म्हणाले, समाजावर आलेल्या संकटकाळात आ. लंके यांचे नेतृत्व योग्य असल्याचे त्यांच्या कृतीतून सिद्ध झाले आहे.गेल्या महिन्यापासून  मतदारसंघ सोडा, जिल्हा तसेच राज्यभरातून येथे रूग्ण दाखल होत आहेत. म्हणूनच संकटाच्या काळात जो समाजासाठी उभा राहतो. त्यांच्यासोबत आपणही गेले पाहिजे म्हणून आम्ही ही मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यातून मोठी चळवळ उभी राहिल  असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

समाजासाठी उभ्या राहणाऱ्या माणसाची गरज ! 
  समाजामध्ये आज पैशांची कमतरता नाही. समाजासाठी उभ्या राहणाऱ्या माणसाची गरज आहे. आ. लंके हे समाजासाठी उभे राहिले. उभ्या राहणाऱ्या माणसाचा अनुभव घेतल्यावर देशातूनच काय जगभरातून जगभरातून लोक पैसा देतात. पैसा ही समस्या नाही तर समाजासाठी जिव झोकून देणं व काम करणं महत्वाचे असते. ते काम आ. लंके व त्यांचे सहकारी करीत आहेत. 

आ. लंके यांच्याप्रमाणे कार्यकर्तेही आघाडीवर ! 
कोरोनाच्या या संकटात आ. लंके यांनी स्वतःला झोकून दिले आहे. त्याच बरोबरीने ताकदीच्या कार्यकर्त्यांचीही फळी त्यांनी उभी केलीय हे फार महत्वाचे आहे. नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यानंतर स्वतः ला झोकून देउन त्यांनी कामाला सुरूवात केली आहे. सामान्य कुटूंबातील चळवळीतील हा कार्यकर्ता आमदार नसतानाही त्याच तडफेने जनतेसाठी धावून जात होता. संकटाच्या काळात सरकारी तिजोरी कमी पडू लागली आहे. उपलब्ध सर्व साधनांना मार्यादा आलेल्या आहेत.  अशा स्थितीत बाधित रूग्णांना गावपातळीवर विलगीकरणात ठेवणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. आ. लंके हे काम करीत आहेत. आमदार रूग्णांसाठी धावून जात असताना त्यांचे कार्यकर्तेही रूग्णांच्या सेवेत आघाडीवर असल्याचेही पवार यांनी आवर्जुन सांगितले. 

भाळवणीकरांचे योगदान मोठे 
भुजबळ कुटूंबाने कोव्हीड सेंटरसाठी मंगलकार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल पवार यांनी त्यांचे कौतुक केले. भाळवणीकर हुषार आहेत असे सांगतानाच आदर्श गाव योजनेची कामे राबविताना कोटयावधी रूपयांचा निधी त्यांनी गावासाठी मिळविला आहे. गावात विविध पक्षांचे तालुकाध्यक्ष आहेत, मात्र विकासासाठी ते एकमेकांत भांडत नाहीत. वैष्वीक महामारीतही मदतीसाठी भाळवणीकरांनीच पुढाकार घेतला  याचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.

No comments:

Post a Comment