अश्रू असायला हवेत! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 27, 2021

अश्रू असायला हवेत!

 अश्रू असायला हवेत!

कोरोना काळात रडायलाही वेळ नाही... 


रा
त्रीचे साडे तीन वाजलेले. स्मशानामध्ये भयाण शांतता.. शेजारच्या काकूंच्या अंतिम संस्काराकरिता मी गेलेले स्मशानभूमीत जाण्याची ही काही माझी पहिलीच वेळ नव्हती पण अशा मध्यरात्री स्मशानात जाण्याची ही पहिलीच वेळ. मन खूप अस्वस्थ होतं. तिथे आमच्या व्यतिरिक्त इतरही बरेच लोकं होती. कोरोनामुळे गेलेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी ताटकळणारी. आपण नेहमीच बघतो की आपल्या जवळची व्यक्ती गेली की एक आक्रोश असतो, रडणे असते, पण तेव्हा स्मशानात मी फक्त शांतता आणि थिजलेलं एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित प्रत्येकाच्या नजरेत बघितलं. आता अंतिम संस्कार करायला पण नंबर लावावा लागतो. सर्वांची नजर अंतिम संस्कार करायला आपला नंबर केव्हा येईल याकडे. ज्या डोळ्यामध्ये आपली व्यक्ती गेली, त्याकरिता अश्रू असायला हवेत. मात्र ती डोळे थिजलेले आणि भावनाशुन्य होती. एक प्रश्न चिन्ह दिसत होते. तिथे रडण्याकरिता  सुद्धा आप्तेष्टांना वेळ नव्हता? सर्वांच्या चेहर्‍यावर दुःखापेक्षा मला प्रश्नचिन्ह दिसत होते. त्या रात्री मी जे अनुभवले त्यावरून असे लक्षात आले की महामारी आपल्याला किती गोष्टी शिकवून जात आहे. आपण जन्मापासून मृत्यू पर्यंत भौतिक गोष्टी मिळवण्या करिता धडपड करतो. सर्व जबाबदार्‍या पार पाडण्याच्या प्रयत्न करीत असतो. पण खरंच आपण गेल्याने संपतात का जबाबदार्‍या किंवा जीवनचक्र थांबते का? 

जर माझ्या जाण्याने कोणतेही कार्य जर थांबत नसतील, जीवन चक्र थांबत नसेल, तर माझी धडपड ही कशासाठी? माझ्या डोक्यात प्रश्नांचे काहूर माजले होते. शांतता फक्त स्मशानातच आहे का? तर नाही शांतता प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आयुष्यभर आपण फक्त जबाबदार्‍या पार पाडत असतो. स्वतःचे आयुष्य जगायचे राहुनच गेलेले असते. खुप असह्य होत होते. मला या महामारी ने सर्वांचे आयुष्य बदलून टाकले. मनाला असह्य करणारी ती रात्र होती माझ्यासाठी. जीवनाच्या या रंग मंचावर अनपेक्षीतपणे आगमन होताच वेगवेगळ्या भूमिका वठवता वठवता त्या पात्राचा कधी शेवट होतो, हे त्या कलाकाराला सुद्धा कळत नाही. आणि उरतात फक्त आठवणी.. मनुष्य जन्माला आल्यानंतर ‘स्व:’ च्या अस्तित्वासाठी आणि स्वतःच्या साम्राज्य साठी धडपड करत असतो. पद, पैसा, प्रतिष्ठेच्या आभासी दुनियेत तरंगायला लागतो. वास्तविक नाचणारा मोर आणि पैशांचा जोर फार काळ टिकत नाही म्हणतात. त्याचा त्याचा काळ संपला की मग पिसारा आणि पसारा आवरायला खूप कठीण जातो. खरं तर एक ना एक दिवस या मायावी जगाचा मला निरोप घ्यायचा आहे. एक दिवस हे जग सोडून आपण जाणारच आहोत. याची कल्पना असून पण मनुष्य असा जगतो की जणू काही तो अमर पट्टा घालून आला आहे.

जगण्याची ही नशा वृद्ध काळापर्यंत कमी कमी होत जाते. आणि मग तेव्हा मर्म कळायला लागतो. पण काळ शिल्लक नसतो. तिथे माझ्या मनात एक विचार आला.. जर मला माहित आहे, मी मरणार आहे आणि जर मृत्यू हे अंतिम सत्य आहे, तर जे आयुष्य आपल्या हातात आहे, ते का नाही आनंदाने जगायचे? आपण बघतो गेल्या वर्षभरापासून शाळा, कॉलेज, ऑफिस, दुकान सर्व बंद बंद आहे. कोणताही गुन्हा न करता !! आपण सारेच जेल बंद आहोत. थोड्या वेगळ्या प्रकारच्या जेलमध्ये! यामुळे लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वांचे मानसिक संतुलन ढासळत चालले आहे. सर्वांचे जीवन विस्कळीत झाली आहे. आर्थिक बजेट कोसळलाय, मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे, मनुष्य हानी झाली आहे. कोणाचे तर अवघ्या कुटुंबाच्या कुटुंब महामारी मध्ये मृत्यू पावले. मुलांचे शालेय शिक्षण वर्षभरापासून स्थिरावलेले. ती मुलं घरात राहून एश्रशलीीेंपळल माध्यमाच्या च्या आहारी गेली. तरुण वर्ग त्यांचे कॉलेज बंद मुळे मित्र मैत्रिणीसोबत मनसोक्त गप्पा मस्ती सर्वकाही त्यांच्यापासून हिरावले गेले आहे. त्यामुळेही त्यांचा संवाद ती मस्ती कॉलेज, करिअर सर्व गोष्टी ऑनलाइन वर येऊन ठेपले आहेत.

स्त्रियांना दिवसभर घरातील काम, पुरुषांना ऑफिस वर्क, महामारी मुळे आपण शरीराने एकत्र आलो आहोत घरात खरे पण मनाने दुरावलेले आहोत.  कारण आपल्या जीवनात नवीन काहीच घडत नाही. जेणे करून आपण संवाद साधून एकमेकांना नीट उमजून घेऊ. आपण ऑनलाईन शिकून एकमेकांना शेअर केले तर प्रत्येकाच्या कलागुणांना वाव मिळेल, नवीन व्यक्ती सोबत सवांद होईल, नवीन ओळखी होतील, संवाद वाढल्याने तुमच्या जीवनात नवीन गोष्टी घडतील, नैराश्य कमी होईल. काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. यामधून यू नेवर नो ! तुम्हाला एखादी छान संधी मिळेल.

 वरिष्ठ गझलकार सदानंद डबीर यांची कविता मनाला प्रेरणा देऊन जाते.

आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे,

रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे.॥

अश्रूच यार माझा मदिरे समान आहे,

काट्यातही फुलांची झुलती कमान आहे ॥

उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे,

जगणे निरर्थक म्हणतो, तो बेइमान आहे ॥

सुखासाठी कधी हसावं लागतं, कधी रडावं लागतं,

कारण सुंदर धबधबा बनायला, पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं ॥

मग आपण ही संधी का नाही घ्यावी? आणि यातून जर काही चांगले बदल घडवू शकत असू तर काय हरकत आहे?जर परिस्थिती आपण बदलू शकत नसू, तर मनस्थिती बदलायला काय हरकत आहे?

सकारात्मक दृष्टिकोन  

मंदाकिनी पाटील (पुणे)

No comments:

Post a Comment