सर्व ग्रंथांचा अर्क व मानसशास्त्राचे मूळ भगवत गीतेत आहे : डॉ.संजय मालपाणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 24, 2021

सर्व ग्रंथांचा अर्क व मानसशास्त्राचे मूळ भगवत गीतेत आहे : डॉ.संजय मालपाणी

 सर्व ग्रंथांचा अर्क व मानसशास्त्राचे मूळ भगवत गीतेत आहे : डॉ.संजय मालपाणी

जनजाती कल्याण आश्रम आयोजित कै.ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमालेस प्रारंभ


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अनेकवेळा आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यात अपयश येते, पण त्याची चिंता अजिबात करायची नाही. कर्म महत्त्वाचे असते. हरण्यातही अनेक नवीन संधी उपलब्ध होतात. छत्रपती शिवरायांनी मिर्झा राजे जयसिंगासोबत तह केला. औरंगजेबाच्या दरबारात अपमान सहन करावा लागला. पण छत्रपतींवर भगवत गीतेचा प्रभाव होता. अपयशातूनही त्यांनी नवीन संधी शोधून काढल्या व इतिहास घडवला. छोट्या छोट्या अपयशांनी आपण विचलित होतो, पण त्यातून मिळणारे अनुभव हे पुढील यशाचा पाया रचत असतात, हीच मोलाची शिकवण भगवत गीता देते. आधुनिक व्यवस्थापनाच्या सर्व ग्रंथांचा अर्क, मानसशास्त्राचे मूळ भगवत गीतेत आहे असे मार्मिक विवेचन डॉ.संजय मालपाणी यांनी केले.
जनजाती (वनवासी) कल्याण आश्रम, नगर शाखा आयोजित कै.ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमालेत सामाजिक उद्बोधन व समुपदेशनाचा ग्रंथ- भगवतगीता या विषयावर पहिले पुष्प गुंफताना डॉ.मालपाणी बोलत होते. या व्याख्यानमालेचे यंदा 11 वे वर्ष असून लॉकडाऊनमुळे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून यंदा व्याख्यानमाला होत आहे. प्रारंभी प्रशांत आढाव यांनी प्रास्ताविक करीत जनजाती कल्याण आश्रम व कै. ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमालेचा आढावा सादर केला. सौ.वैष्णवी कुलकर्णी यांच्या एक हे वरदान दे  या गीताने व्याख्यानमालेची सुरुवात झाली.
भगवत गीतेवर विवेचन करताना डॉ.मालपाणी म्हणाले की, महाभारतात प्रत्यक्ष युध्दाला सुरुवात होण्याआधी अर्जुनाच्या मनात धर्मयुध्द सुरु होते. त्याच्या मनातील युध्द हे परिवार धर्म व राष्ट्रधर्म यातील युध्द होते. तो मध्यभागी उभा राहुन दोन्ही बाजूंच्या सेनेकडे पाहत होता. दोन्ही बाजूंनी माझे आप्तेष्ट आहेत, दोन्ही बाजूंनी मोठा नरसंहार होणार आहे या जाणीवेतून तो विदीर्ण झाला होता. स्त्रीचा अवमान करणार्या दुर्योधनरुपी  प्रवृत्तीला देहदंड दिलाच पाहिजे हा क्षात्रधर्म आपण पाळला पाहिजे याचीही अर्जुनाला जाणीव होती. पण त्याची मनस्थिती व्दिधा झाली होती. तो भ्रमित झाला होता. त्याला उभे करण्याचे काम भगवान श्रीकृष्णांनी केले. त्यांनी धर्म म्हणजे काय हे समजावून सांगितले. भगवत गीतेत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असा धर्म अजिबात अभिप्रेत नाही. आपले कर्म निष्ठेने करणे हा धर्म भगवान श्रीकृष्णांना अभिप्रेत आहे. योगशास्त्राचा विचार असलेला श्रीकृष्ण व धनुष्य घेवून प्रत्यक्ष कृती करणारा अर्जुन जिथे आहे, तिथे विजय निश्चित आहे.  अधिष्ठान असलेली कृती ज्या संघटनेकडून होते, तीच संघटना युगानुयुगे काम करू शकते. बाकी अनेक संघटना भूछत्राप्रमाणे उगवतात व नामशेष होतात. भगवत गीता हा धर्माची व्याख्या करणारा ग्रंथ आहे. धर्म म्हणजे कर्तव्य हा मंत्र भगवतगीता देते.
आपली आवड लक्षात घेवून आवडते काम धर्म म्हणून स्विकारायचे व त्यानुसार कर्म करायचेे. एकापेक्षा अनेकांचा विचार करण्याचे शिक्षण भगवत गीता देते. राष्ट्र प्रथम हाच संदेश भगवंतांनी दिला आहे. आपले अंतिम उद्दीष्ट समोर ठेवून काम केल्यास इतर गोष्टींचा प्रभाव कमी होत जातो.  मन व बुध्दीने एकत्र येऊन काम करणे हेच योगशास्त्र आहे. काम करताना नेतृत्त्वाने आपले वागणे व बोलणे आदर्श ठेवले पाहिजे. शिवरायांचा आदर्श याबाबत महत्त्वाचा आहे. कर्तव्यात अजिबात कसूर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. भगवान सांगतात,कर्म करताना छोट्या छोट्या फळाची चिंता करायची नाही. कोय लावली तर आंब्याचे झाड उगवणारच व त्याला रसाळ फळे येणारच. लोकांची मने जोडणारे शब्द आपल्या तोंडून निघावे असे काम नेतृत्त्वाकडून झाले पाहिजे. आळशी,कर्तृत्वशून्य, आजचे काम उद्यावर ढकलणारी माणसं यशस्वी होत नाही. जे काम दिलेय ते अतिशय तन्मयतेने करणाराच यशस्वी होतो. विचार न करता सांगणे म्हणजे प्रतिक्रिया असते व विचार करून सांगणे हा प्रतिसाद असतो. भगवत गीतेत असा प्रतिसाद अपेक्षित आहे. विवेक व विचारांनी काम करणे मन व बुध्दीच्या संयोगानेच योग्य निर्णय घेता येतो.
सुख, दु:ख ही बाहेरुन येतात. मनातून जे बाहेर येते तो फक्त आनंद असतो. आपण सुखाच्या मागे लागतो व त्याचा शेवट दु:ख असतो. यातून निराशाच पदरी पडते. म्हणून आनंदाचा शोध घ्या, सर्व दु:खावर विजय प्राप्त करू शकतो. बुध्दीला स्थिर करण्यासाठी मन प्रसन्न ठेवले पाहिजे, असा भगवत गीतेचे सार डॉ.मालपाणी यांनी सांगितले.शेवटी पसायदानाने व्याख्यानाची सांगता झाली. या उपक्रमासाठी राजाभाऊ मुळे, अध्यक्ष महेंद्र जाखेटे, सचिव निलकंठ ठाकरे, व्याख्यानमाला प्रमुख शेखर भावे, अनिल लवांडे, प्रशांत आढाव आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here