उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत द्या! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 21, 2021

उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत द्या!

 उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत द्या!

‘रेशन’वर काय भागणार? विडी कामगारांचा आक्रोश.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः टाळेबंदीत उदरनिर्वाहासाठी विडी कामगारांना दोन हजार रुपये अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी लालबावटा विडी कामगार युनियनच्या (आयटक) वतीने श्रमिकनगर येथे विडी कामगारांनी घरा बाहेर येऊन निदर्शने केली. रेशनवर मिळणारे गहू, तांदूळ व डाळवर कुटुंब चालत नसून, इतर गरजा भागविण्यासाठी राज्य सरकारने तातडीने अनुदान देण्याची मागणी विडी कामगारांनी यावेळी केली. अन्यथा श्रमिक बालाजी मंदिराच्या आवारात आमरण उपोषण करण्याचा इशारा कामगारांनी दिला.
टाळेबंदी काळात एमआयडीसी सुरू असून, तेथील कामगारांना पगार मिळत आहे. सरकारी कर्मचार्यांनाही पगार सुरू आहे. रिक्षाचालक, बांधकाम कामगार, मोलमजूर यांना राज्य सरकारने दीड हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले. विडी कामगारांना एक महिना झाला असून, त्यांचे हातावर असलेले विडी वळण्याचे काम बंद आहे. विडी कामगार आर्थिक दुर्बल घटक असून रोज मजूरी करुन त्यांचा प्रपंच चालत असतो. शहरात चार ते पाच हजार विडी कामगार असून, टाळेबंदीत सर्व काही बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने सातत्याने संघटनेच्या वतीने दोन हजार रुपये अनुदान मिळण्याची मागणी लाऊन धरण्यात आली आहे. राज्य सरकार व जिल्हा प्रशासन विडी कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास तयार नसल्याने विडी कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
यावेळी जिल्हा सचिव अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्षा कॉ. भारती न्यालपेल्ली, शोभा पासकंठी, शारदा आडेप, रेणुका अंकारम, संगिता कोंडा, भाग्यलक्ष्मी, गड्डम, निर्मला न्यालपेल्ली, सुनिला बिटला, रेणुका दिकोंडा, वन्ना कल्याणम आदिंसह परिसरातील विडी कामगार महिला उपस्थित होत्या.

विडी कामगार अत्यंत दुर्बल घटक आहे. दैनंदिनच्या मजुरीवर त्यांचा प्रपंच चालतो. शहरातील साबळे वाघीरे या एकाच कंपनीने आगाऊ रक्कम देण्याची तयारी दर्शवली आहे. इतर विडी कंपन्यांनी देखील कामगार जगविण्यासाठी या संकटकाळात मदत करण्याची अपेक्षा आहे. तर शासनाने देखील विडी कामगारांना प्रत्येकी दोन हजार रुपयाची आर्थिक मदत देऊन आधार देण्याची गरज आहे. आमदार व खासदार यांनी शहरासह, जिल्ह्यातील विडी कामगारांना या टाळेबंदीत जगविण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. - कॉ. सुधीर टोकेकर, जिल्हा सचिव  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here