अकाली निधन झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांना दिला वर्गमित्रांनी आधार
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अवघ्या 34 वर्ष वयाच्या तरुणाचे अकाली निधन झाले. त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याची माहिती मिळताच वर्गमित्रांनी एकत्र येत अकाली निधन झालेल्या वर्गमित्राच्या कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेत अवघ्या 2 दिवसांत सुमारे 80 हजार रुपये जमा करत मयत वर्गमित्राच्या दोन्ही लहान मुलांच्या नावावर पोस्टात ठेव पावत्या करत समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
सारोळा कासार (ता.नगर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शिक्षण घेतलेल्या आणि 2001 साली दहावीची परीक्षा दिलेल्या वर्गमित्रांनी 3-4 वर्षापूर्वी एक व्हाटस अप ग्रुप बनविलेला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून सर्व वर्गमित्र एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होत असतात. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवीत असतात. या ग्रुपमधील सचिन पांडुरंग चारुडे (वय 34,रा.अस्तगाव, ता. पारनेर) याचे 6 मे रोजी अल्पआजाराने अकाली निधन झाले. त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, 2 लहान मुले असा परिवार आहे. ही घटना के.बी.पी.व्ही.2001 ग्रुपला समजताच प्रत्येकजण हळहळला. मात्र या दु:खातून सावरत वर्गमित्राच्या कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सर्वांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून वर्गमित्रांना मदतीसाठी आवाहन केले. अवघ्या 2 दिवसांत सुमारे 80 हजारांचा मदतनिधी जमा झाला.
या सामाजिक उपक्रमासाठी के.बी.पी.व्ही.2001 ग्रुपमधील साध्वी शोभा कवडे, सविता वराळे, सविता पुंड, सोमनाथ झेंडे, विजय देवखुळे, सुनिल देवखुळे, संदीप कडूस यांच्यासह अनेकांनी पुढाकार घेत अकाली निधन झालेल्या वर्गमित्राच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला. या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment