लसीकरणाच्या वाटपात बनवाबनवी, अधिकृत टोकन असूनही मिळेना लस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 28, 2021

लसीकरणाच्या वाटपात बनवाबनवी, अधिकृत टोकन असूनही मिळेना लस

 लसीकरणाच्या वाटपात बनवाबनवी, अधिकृत टोकन असूनही मिळेना लस

नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः  कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीचा उघडपणे काळा बाजार केला जात असताना तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी स्वच्छ कारभार म्हणून पाठ थोपटून घेत पारदर्शी कारभार असल्याचे म्हणत आहेत,  याचा अर्थ येथे होणार्‍या गैरप्रकाराला पाठीशी घालत आहेत का? असा प्रश्न पत्रकार आशिष बोरा यांनी उपस्थित केला आहे.
कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल गेली अनेक दिवसांपासून लसीकरणाचा मोठा गैरव्यवहार होत आहे, याबाबत सातत्याने प्रश्नही उपस्थित केले जात असताना जिल्हाधिकारी, जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख या बाबीकडे का लक्ष देत नाहीत असा  कळीचा प्रश्न उपस्थित होत आहे.
कर्जत मध्ये लसीकरनात सुसूत्रता यावी यासाठी अनेक प्रयोग केले गेले, यातून टोकन सिस्टम निर्माण झाली यातही ज्यांनी अगोदर लस घेतली त्यांना प्राधान्य असा नियम लावत तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक स्वतः जातीने उपस्थित राहून अत्यंत पारदर्शीपणे टोकन वाटप करत असताना व जेवढ्या लस आहेत तेवढेच टोकन वाटले जात असताना,  टोकन घेणार्यांनाच लस मिळत नसल्याचा संताप जनक प्रकार समोर येत आहे.    
कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सातत्याने हा प्रश्न निर्माण होत असून दि 27 मे रोजी कोव्हक्सीनच्या 120 लस असताना सकाळी 120 टोकन वाटण्यात आले, पत्रकार आशिष बोरा यांनी नियमा प्रमाणे सकाळी 8 वाजता रांगेत उभे राहून तहसीलदार नानासाहेब आगळे व गटविकास अधिकारी अमोल जाधव यांचे कडून टोकन घेतले, लस घेण्यासाठी शासनाने 5 वाजेपर्यतची वेळ जाहीर केली असल्याने व गर्दीत जायला नको म्हणून बोरा हे 3 वाजता लस घेण्यासाठी गेले असता तेथील कर्मचारी व उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सोनाली बांगर यांनी सरळ लस संपली असल्याचे सांगितले, यावर बोरा यांनी अधिकृत टोकन असताना माझी लस इतराना कशी काय दिली असा प्रश्न उपस्थित केला असता, डॉ बांगर यांनी उलटसुलट बोलायला सुरुवात केली. सकाळी 9 वाजता लसीकरण सुरू होते डॉ बांगर यांच्या म्हणण्या नुसार सकाळी सव्वा अकरा पर्यत 110 लोक झाले व नंतर उर्वरित लोकांना लस देण्यात आली. पण  लस देण्याची कार्यपद्धती पाहता दोन तासात 110 डोस देणे शक्य आहे का, या अगोदर ही लसीकरणातील सावळा गोंधळाच्या काही बातम्या प्रसिद्ध केल्यामुळे डॉ बांगर यांचे म्हणणे होते तुम्ही मुद्दाम आम्हाला त्रास देत आहात. मात्र लसीचे टोकन प्रशासन वाटते,  उपजिल्हा रुग्णालयाचा अधिकृत राजमुद्रा असलेल्या शिक्क्याचे टोकन आहे, तेे घेऊन लस घेण्यास येणे व लस संपली असेल तर त्याबाबत विचारणा करणे यात त्रास देण्याचा प्रश्न येतो कोठे, अधिकृत टोकन असल्याने मला लस मिळायलाच हवी असा मुद्दा बोरा यांनी उपस्थित केला. मात्र लस मिळू शकली नाही, या दिवशी असे अनेक जण आहेत त्याना ही टोकन असून लस मिळालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनातील सावळागोंधळाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी बोरा यांनी केली आहे. याबाबत सातत्याने अनेक लोक आवाज उठवत असताना वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कोणतीही जबाबदारी न स्विकारता पाठीशी घालण्याचे काम करत असून यामध्ये वरिष्ठांनी लक्ष घालावे असे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment