वाढलेल्या खतांचे दर कमी करा ः आजबे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 20, 2021

वाढलेल्या खतांचे दर कमी करा ः आजबे

 वाढलेल्या खतांचे दर कमी करा ः आजबे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः अगोदरच लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यावर दुष्काळात तेरावा महिना म्हणायची वेळ आली आहे. रासायनिक आणि मिश्र खतांच्या किमतींमध्ये झालेल्या प्रचंड दरवाढीमुळे राज्यातील शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे.त्यामुळे खतांची दरवाढ मागे घेण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख मंगेश आजबे यांनी दिला आहे.
पुढे बोलताना मंगेश आजबे यांनी सांगितले की केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमतीत केलेल्या भरमसाठ वाढीमुळे शेतकर्यांचे कंबरडेच मोडणार आहे. जामखेड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना या दरवाढीचा तीव्र निषेध करीत आहेत . गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच शेतीमालाचे खूप मोठे नुकसान होत आहे. राज्य सरकारने महिन्यापासून लॉकडाऊन लावले आहे. शेतीमालाची वाहतूक करण्यास बंदी घातलेली आहे. मार्केट कमिट्या बंद ठेवल्या आहेत. याचा सगळ्यात मोठा फटका शेतकर्यांना बसलेला आहे. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमतीमध्ये शेतकर्यांचा अर्थकारण पूर्णपणे कोलमोडणार आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत 50 ते 60 टक्के दरवाढ झालेली आहे. कोरोना संसर्गाच्या संकट छायेतही शेतकर्यांनी कंबर कसलेली असताना देखील ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ही दरवाढ होत असल्याने शेतकर्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाले आहे.
केंद्र सरकारने खतांच्या कीमती कमी केल्या नाहीत तर  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका प्रमुख मंगेश आजबे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment