अहमदनगर मर्चंटस् को.ऑप.बँकेला मागील आर्थिक वर्षात 5 कोटी 22 लाखांचा निव्वळ नफा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, May 20, 2021

अहमदनगर मर्चंटस् को.ऑप.बँकेला मागील आर्थिक वर्षात 5 कोटी 22 लाखांचा निव्वळ नफा

 अहमदनगर मर्चंटस् को.ऑप.बँकेला मागील आर्थिक वर्षात 5 कोटी 22 लाखांचा निव्वळ नफा

करोना काळातही आर्थिक घोडदौड कायम, ठेवींमध्ये 117 कोटी 73 लाखांची वाढ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शिस्तबध्द व आदर्श आर्थिक कारभारासाठी नावाजल्या जाणार्या अहमदनगर मर्चंटस् को ऑप.बँकेने मागील आर्थिक वर्षातही यशाची घोडदौड कायम राखली आहे. करोना महामारीच्या काळात अर्थकारणाला ब्रेक लागलेला असतानाही बँकेने उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम राखत 31 मार्च 2021 अखेरपर्यंत 5 कोटी 22 लाखांचा निव्वळ नफा मिळवला आहे. बँकेचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असून ठेवींमध्येही मागील आर्थिक वर्षात 117 कोटी 73 लाखांनी वाढ झाली असून 31 मार्च 2021 अखेर बँकेच्या एकूण ठेवी 1371 कोटीवर पोहचल्या आहेत.  अशी माहिती बँकेचे चेअरमन अनिल पोखरणा यांनी दिली.
सन 2020-2021 या आर्थिक वर्षात बँकेच्या कामगिरीचा लेखाजोखा सादर करताना चेअरमन पोखरणा यांनी सांगितले की, मागील आर्थिक वर्षात बँकेचे संस्थापक चेअरमन व विद्यमान ज्येष्ठ संचालक हस्तीमलजी मुनोत यांच्या कुशल नेतृत्त्वाखाली व माजी चेअरमन आनंदराम मुनोत, व्हाईस चेअरमन सुभाष बायड तसेच संचालक मंडळातील सर्व सहकारी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कटारिया, जॉइंट सीईओ नितिन भंडारी यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या योगदानातून बँकेने उत्तम कामगिरी केली आहे. बँकेच्या ठेवी 31 मार्च 2020 अखेर 1253 कोटी 49 लाख इतक्या होत्या. त्यात 31 मार्च 2021 पर्यंत 117 कोटी 73 लाखांनी वाढ होवून एकूण ठेवी 1371 कोटींच्या झाल्या आहेत. 31 मार्च 2020 अखेर कर्ज वितरण 875 कोटी 61 लाख रुपये होते. त्यात आर्थिक वर्षात 38 कोटी 61 लाखांनी घट होवून 31 मार्च 2021 अखेर एकूण कर्ज वितरण 837 कोटी रुपये इतके आहे. बँकेमार्फत नजरगहाण कर्जाव्यतिरिक्त गृहतारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, सोनेतारण कर्ज, वाहन, वस्तू, शेअर्स तारण, शॉप ऑफिस खरेदी कर्ज, कमर्शियल इमारत बांधणी कर्ज, स्थावर मिळकत तारण कॅशक्रेडिट आदी कर्ज उपलब्ध आहेत. त्याचा लाभ अनेक सभासद घेत आहेत. नजरगहाण कर्जावरील व्याजदर रिबेट वजा जाता 8.50 टक्के इतके आहे. सोनेतारण कर्जात 2 लाखापर्यंत 8 टक्के व्याजदर असून सोनेतारण कॅशक्रेडिट 5 लाखापर्यंत 8 टक्के व्याजदर, वाहन कर्ज (खासगी कार) 25 लाखापर्यंत 8 टक्के एवढेच व्याजदर असून ते कोणत्याही नागरी सहकारी बँकेपेक्षा कमी आहे. गेल्या काही काळात बँक ठेवीदारांना ठेवींवर जास्त व्याजदर देत असून इतर सरकारी बँकांच्या तुलनेत कर्जावरील व्याजदर कमीत कमी ठेवलेला आहे. त्यामुळे ठेवीवर द्यावे लागणारे व्याज व कर्जावर मिळणारे व्याज यातील फरक दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच बँकेच्या व्यावसायिक खर्चामध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. आर्थिक वर्षात बँकेने कर्जदारांना व्याजामध्ये 18 कोटी 2 लाखांचा भरघोस रिबेटही दिला आहे. याही परिस्थितीत बँकेने 16 कोटी 75 लाखांचा ढोबळ नफा मिळवला आहे. इतका मोठा ढोबळ नफा मिळवणारी अहमदनगर मर्चंटस् बँक जिल्ह्यातील एकमेव बँक असावी. आवश्यक तरतुदी वजा केल्यानंतर 31 मार्च 2021 अखेर बँकेस 5 कोटी 22 लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. गतवर्षी कोविड 19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्रच अर्थकारणावर परिणाम झालेला आहे. त्याचा थेट परिणाम वसुलीवर झाल्याने बँकेच्या एन.पी.ए.मध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. सन 2020-21 या आर्थिक वर्षात कोविड परिस्थितीमुळे तुलनेने नफा कमी झालेला असला तरी संचालक मंडळाने 15 टक्के लाभांश देण्याचा मानस केला आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेकडे परवानगी मागण्यात येणार असून परवानगी मिळताच सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्यानंतर लाभांश वाटप करण्यात येईल.
जानेवारी 2014 पासून बँकेने कोअर बँकिंग प्रणाली कार्यरत केलेली असून स्वत:चे डेटा सेंटरही उभारले आहे. या माध्यमातून ग्राहकांना अधिकाधिक अत्याधुनिक सेवा देण्यासाठी कोअर बँकिंग उपसमितीचे सदस्य सी.ए., आय.पी.अजय मुथा, सी.ए.मोहन बरमेचा, संजीव गांधी यांनी मोलाचे योगदान दिले आहे. मागील आर्थिक वर्षात 31 मार्च 2020 अखेर बँकेचे रिझर्व्ह व इतर फंडस 145 कोटी 18 लाख रुपये होता. त्यात 14 कोटी 20 लाखाने वाढ होवून 31 मार्च 2021 अखेर ते 159 कोटी 38 लाखांचे झाले असून वाढीचे प्रमाण 9.78 टक्के इतके आहे. कोविड महामारीमुळे निर्माण झालेली आर्थिक मंदी, अर्थकारणाला बसलेला फटका यामुळे देशातील सर्व बँकांसमोर थकीत कर्ज वसुलीची समस्या निर्माण झालेली आहे. याही परिस्थितीत बँकेने कर्ज वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले. दि.31 मार्च 2021 अखेर बँकेचे निव्वळ एन.पी.ए.चे प्रमाण 7.64 टक्के इतके आहे.
भारत सरकारने बँकांच्या बचत ठेव खातेदारांसाठी लागू केलेली पंतप्रधान अपघात विमा योजना बँकेकडून राबविली जात असून अपघात विम्याच्या प्रिमियमची रक्कम खातेदारांकडून न घेता बँक ती आपल्या नफ्यातून भरत आहे. बँकेमार्फत नागरिकांसाठी स्टॅम्प फ्रँकिंग सुविधाही मार्केट यार्ड शाखेत उपलब्ध करून देण्यात आली आहे.  महाराष्ट्र शासनाने आता ई स्टॅम्पिंग संकल्पना राबविली असून सदरची सुविधाही बँकेच्या सर्व शाखांत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.नगर शहरात 11 एप्रिल 2020 पासून सीटीएस क्लियरिंग व्यवस्था सुरु झाली आहे. बँकेने पहिल्या दिवसापासून एचडीएफसी बँकेच्या सहकार्यातून ही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. याव्दारे दररोज अडीच हजार ते 3500 चेक पाठवले जातात व दोन ते तीन हजार चेक्स कलेक्शनसाठी येतात. बँकेचे सर्व कर्मचारी ही बँकेची मोठी मालमत्ता आहे. कर्मचारी अतिशय तत्पर व बिनचूक बँकिंग सेवा देत असल्याने बँकेचा नावलौकिक वाढण्यास मदत होते. सेवकांच्या मान्यताप्राप्त युनियनचे पदाधिकारी धनंजय भंडारे, एम.वाय.कुलकर्णी यांचेही बँक व्यवस्थापनास अमूल्य सहकार्य लाभत असते. बँकेच्या अहमदनगर शहरात 7, जिल्ह्यात जामखेड, श्रीगोंदा, शेवगाव, पाथर्डी, सोनई तर जिल्ह्याबाहेर औरंगाबादमध्ये 2, पुणे जिल्ह्यात 3 व बीड जिल्ह्यात 1 अशा एकूण 18 शाखा कार्यरत आहेत. अवघ्या 49 वर्षात अहमदनगर मर्चंटस् बँक नगर जिल्ह्यासह राज्यात अग्रगण्य व सातत्याने प्रगती करणारी बँक म्हणून ओळखली जाते, हे अभिमानास्पद असल्याचे चेअरमन अनिल पोखरणा यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here