कोरोनाचा उद्रेक; रेमडेसिव्हीरचा काळा बाजार. कोणी.. बेड देता. का बेड?; रुग्णांचा आक्रोश ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 8, 2021

कोरोनाचा उद्रेक; रेमडेसिव्हीरचा काळा बाजार. कोणी.. बेड देता. का बेड?; रुग्णांचा आक्रोश !

 कोरोनाचा उद्रेक; रेमडेसिव्हीरचा काळा बाजार. कोणी.. बेड देता. का बेड?; रुग्णांचा आक्रोश !

प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवतयं; खाजगी हॉस्पिटलकडून लूट चालुच.

कोरोनाच्या भस्मासुराने जिल्ह्यात उग्र स्वरूप धारण केलं असताना कोणी बेड देता का बेड? असा आक्रोश कोरोना रुग्ण करत आहेत. बेड आहेत,पण खाजगी हॉस्पिटलवाल्यांनी ते पैसे लुटण्यासाठी राखून ठेवलेत. कोरोना साठी संजीवनी ठरलेल्या ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचा काळा बाजार सुरू आहे. 800 ते 1300 रुपयात मेडिकल विक्रेत्यांना मिळणार्‍या या इंजेक्शनची विक्रीची किंमत 1040 रू असताना ते आता 10 हजार रुपयांना विकल जातयं. कोरोना लसीचा तुटवडा होवू लागलाय. मात्र जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन कागदी घोडे नाचवून सर्व अलबेल असल्याचं भासवत आहे. जिल्हाधिकारी खाजगी हॉस्पिटलसाठी आदेश काढतात. बेड उपलब्ध आहे असं सांगत आहेत. पण खाजगी रुग्णालये आधी 50 हजार भरा, मगच उपचार करू असं रुग्णांच्या नातेवाइकांना सांगत आहेत. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांनी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून सत्य परिस्थिती जाणून घेण्याची गरज आहे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येचा आज उद्रेक झाला. आतापर्यंत बाधितांचा हा सर्वाधिक आकडा आहे. गेल्या 24 तासांमध्ये 2 हजार 233 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आहे. नगर शहरात पुन्हा सहाशे पुढे रुग्णसंख्या गेली आहे. नगर शहरात 611 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरापाठोपाठ कर्जतमध्ये दोनशेच्या पुढे रुग्ण वाढले आहे.विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत कोरोना उपचारासाठी कोणाला वणवण फिरण्याची वेळ येणार नसल्याचे सांगितले असले, तरी जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवत असल्याचे दिसत आहे. ‘रेमडेसिव्हीर’चा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खाजगी रुग्णालयांनी बेड अडवून ठेवले आहेत. रुग्णांची लुट मोठ्या प्रमाणात चालू आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी खासगी डॉक्टरांना शासन नियमांप्रमाणे बिले आकारण्यात यावी असे आदेश दिले होते. मात्र हे नियम खासगी रुग्णालये पायदळी तुडवीत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांसाठी पुरेसे बेड उपलब्ध असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी खासगी रुग्णालयांकडून लाखो रुपयांची बिले वसूल केली जात आहेत. आधी 50 ते 70 हजार रुपये अ‍ॅडव्हान्स भरा, मगच उपचार सुरू होतील, असे नातेवाइकांना सांगितले जात आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. जिल्हाभरातून रुग्ण नगर शहरातील रुग्णालयांत दाखल होत आहेत. महापालिकेने शहरातील 31 खासगी रुग्णालयांना कोव्हिड सेंटर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. खासगी रुग्णालयांना प्रथमदर्शनी भागात दरफलक व बेड उपलब्धते बाबतचा फलक लावणे बंधनकारक आहे. हे फलक रुग्णालयात लावले आहेत किंवा नाही, कुठल्या रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत. त्यापैकी ऑक्सिजनचे किती, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र अधिकार्‍यांची नेमणूक केलेली आहे. असे असतानाही रुग्णालयांकडून दरफलक तर दूरच, पण त्यांच्याकडे किती बेड शिल्लक आहेत, याची माहितीदेखील दिली जात नाही. रुग्णांना गरज पडल्यास कुणाकडे संपर्क करायचा, याचीही कोणतीही सोय महापालिकेने केलेली नाही. महापालिकेचा वचक नसल्याने खासगी रुग्णालये अव्वाच्या सव्वा दर आकारत असून, 50 जे 70 हजार रुपये भरून घेतल्याशिवाय रुग्णांवर उपचार सुरू केले जात नाहीत. असे चित्र सध्या जिल्ह्यात सुरु आहे.
काही दिवसांपासून शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, बळींची संख्याही वेगाने वाढत आहे. त्यामुळे, शहरातील स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीसाठी ’वेटिंग’ करावे लागत आहे. नेप्ती नाकाजवळील स्मशानभूमीमध्ये अनेक पार्थिव अंत्यसंस्कारांसाठी आणण्यात येत असल्याने तेथील यंत्रणा व जागांच्या मर्यादामुळे अंत्यसंस्कारांसाठी थांबून राहावे लागत आहे. असे भयाण चित्र सध्या दिसून येत आहे. कोरोनाबाधितांवर येथील अमरधाममध्ये अंत्यविधी केला जातो. त्यासाठी महापालिकेने दोन विद्युत दाहिन्यांची व्यवस्था केलेली आहे. साधारणपणे एका मृतदेहासाठी दीड तासांचा कालावधी लागतो.
सकाळी 10 वाजता दोन्ही विद्युत दाहिन्या सुरू करण्यात येतात. सायंकाळी सहा वाजेपर्यंत 14 मृतदेहांवर अंत्यविधी केला जातो. कोरोनाबाधित रुग्णांचा अकडा बुधवारी काहीसा कमी झाला. रुग्णसंख्या घटली असली तरी मृतांचा आकडा वाढला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा आकडा मंगळवारी 13 होता. दुसर्‍या दिवशी बुधवारी हा अकडा अचानक वाढला. त्यामुळे अंत्यविधीसाठी अमरधाम येथे दिवसभर वेटिंग होती. अंत्यविधीसाठी नातेवाइकांना रात्री उशिरापर्यंत थांबावे लागले.
सध्या कोरोनाच्या आजारावर प्रामुख्याने रेमडेसिव्हीर हे इंजेक्शन औषध प्रभावी असल्याचे आढळून येत आहे. जिल्हात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिव्हीरचा इंजेक्शन मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे बोललं जात आहे. गेल्या दोन दिवसात शहरात रेमडेसिव्हीरचा इंजेक्शनचा तुटवडा पाहायला मिळत आहे.  कोरोना रुग्ण, डॉक्टर, हॉस्पिटलसह सरकारलाही या इंजेक्शनसाठी कसरत करावी लागत आहे. इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे.

No comments:

Post a Comment