फिटर, टेलर, मेकॅनिक इ. व्यवसायाला परवानगी द्या- शेख. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 8, 2021

फिटर, टेलर, मेकॅनिक इ. व्यवसायाला परवानगी द्या- शेख.

 फिटर, टेलर, मेकॅनिक इ. व्यवसायाला परवानगी द्या- शेख.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पिस फाउंडेशनचे निवेदन..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  कोरोनाला रोखण्यासाठी सार्वजनिक उपक्रमांवर प्रतिबंध असावा. शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या त्या आवश्यक आहेत. पण सामान्य माणसाचा रोजीरोटीचा विचार करून ज्या क्षेत्रात पाचपेक्षा कमी लोक लागतात अशा फिटर, टेलर, मेकॅनिकची दुकाने चालू ठेवण्यास काहीच अडचण नाही. या व्यवसायास परवानगी द्या अशी मागणी पिस फाउंडेशनचे अध्यक्ष आर्किटेक्ट अर्शद शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
अर्शद शेख यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या एक वर्षात आपण आपल्या प्रामाणिक प्रयत्नाने महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आणि सहानुभूती संपादित केली आहे. विशेषतः कोव्हीडच्या भयंकर महामारीत आपण आणि आपल्या सहकार्यांनी जे पोटतिडकीचे जे प्रयत्न केले ते निश्चितच कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र पुन्हा एकदा कोव्हीडच्या दुसर्‍या लाटेच्या विळख्यात आहे. राज्य शासनाने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत, ज्या आवश्यक आहेत. सार्वजनिक उपक्रमांवर प्रतिबंध असावा, जमाव बंदी असावी यात दुमत नाही. परंतु या उपाययोजना करत असताना सामान्य माणसाच्या रोजीरोटीचा विचार होणे अनिवार्य आहे. अगोदरच कोव्हीडने सामान्य माणसाचे अर्थकारण उद्ध्वस्त केले आहे. जेमतेम गाडी रडारवर येत असताना पुन्हा नवीन प्रतिबंध जगणे असह्य करणार आहे. कोव्हीड संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजनांची दक्षता घेऊन सर्व उद्योगधंद्यांना परवानगी द्यावी विशेषत पाच लोकांपेक्षा कमी लोक काम करतात त्या ठिकाणी उदा. फिटर, टेलर, मेकॅनिक इ. सुरू ठेवण्यास काहीच अडचण नाही कारण त्यांच्यामुळे  कोव्हीडचा प्रसार होण्याची शक्यता नगण्यच असते. तसे पाहता लॉकडाऊन हा  कोव्हीड वर संपूर्ण उपाय नाही. यासंदर्भात शासन आणि प्रशासनाने जर सामाजिक संघटनांचे जनजागृती, प्रबोधन आणि उपचारात सहकार्य घेतल्यास कोवीड नियंत्रणात येण्यास मोलाची मदत होईल. आमच्यासारख्या अनेक संघटना या कामी शासनाच्या मदतीसाठी तत्पर आहोत. तरी लॉकडाऊन मध्ये सर्वसामान्यांचा विचार करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करून उद्योगधंद्यांना परवानगी द्यावी असेही निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment