भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 13, 2021

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करा

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करा

राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सध्या जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांची जयंती साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यासंदर्भात, राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे अपर जिल्हादंडाधिकारी संदीप निचित यांनी कळविले आहे.
दरवर्षी 14 एप्रिल या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी विविध कार्यक्रम आयोजित केले जात असतात. यावर्षी राज्य शासनाने जयंती उत्सवासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, यावर्षी कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी सकाळी 7 वाजेपासून ते रात्री 8 वाजण्यापूर्वी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत जयंती साजरी करणे अपेक्षित आहे. दरवर्षीप्रमाणे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अथवा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना पाचपेक्षा जास्त संख्या नसावी. त्याठिकाणी सोशल डिस्टंन्सिंग आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सॅनिटायझर) पालन करुन जयंती साजरी करण्यात यावी. शासनातर्फे जयंतीदिनी चैत्यभूमी दादर, मुंबई येथील कार्यक्रमाचे दूरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने अनुयायांनी चैत्यभूमी येथे न जाता घरातूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सार्वजनिक ठिकाणी गाणी, व्याख्याने, पथनाट्य आदींचे  सादरीकरण अथवा इतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जयंती निमित्ताने करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्कद्वारे अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्यात यावी. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी आरोग्यविषयक उपक्रम, शिबीरे (उदा- रक्तदान) स्थानिक प्रशासनाच्या पूर्वानुमतीने आयोजित करता येतील आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करता येईल. तथापि, आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंग आणि स्वच्छता नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना आणि जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचे पालन करण्याचे आवाहन श्री. निचित यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment