मनपा कोवीड सेंटरमध्ये ना.. ऑक्सिजन बेड, ना.. व्हेंटिलेटर, ना.. रेमडेसिविर! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 15, 2021

मनपा कोवीड सेंटरमध्ये ना.. ऑक्सिजन बेड, ना.. व्हेंटिलेटर, ना.. रेमडेसिविर!

 मनपा कोवीड सेंटरमध्ये ना.. ऑक्सिजन बेड, ना.. व्हेंटिलेटर, ना.. रेमडेसिविर!

कोरोना रुग्णांची अ‍ॅडमिट होण्यास टाळाटाळ.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रुग्णांची संख्या मोठी असल्याने त्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता भासत आहे; परंतु यापैकी कोणत्याही सुविधा महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होण्याआधी ऑक्सिजनचे बेड आहे का अशी विचारणा करतात. त्यांना नाही असे उत्तर मिळाल्यानंतर ते खासगी रुग्णालयांचा रस्ता धरतात. याशिवाय बहुतांश लक्षणे नसलेले रुग्ण घरी उपचार घेत आहेत. त्यामुळे मनपाच्या कोविड केअर सेंटरमधील खाटा रिकाम्या राहत असल्याचे दिसून येत आहे.
नगर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन महापालिकेने तीन कोविड केअर सेंटर सुरू केले; परंतु या सेंटरमध्ये रुग्ण दाखल होत नसल्याने दीडशेहून अधिक बेड रिकामे आहेत. या उलट खासगी रुग्णालयातील बेड फुल्ल झाल्याने मनपाचे कोविड केअर सेंटर रिकामे, खासगी रुग्णालये फुल्ल असे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे. नगर शहरात काल 496 नवे रुग्ण आढळून आले आहेत. महापालिकेच्या अहवालानुसार शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3 हजार 546 इतकी आहे.
सध्या महापालिकेच्या नटराज कोविड केअर सेंटरमध्ये 142, जैन पितळे बोर्डिंग येथे 58 आणि केडगाव येथील डॉन बास्को येथे 47 लक्षणे नसलेले रुग्ण दाखल झालेले आहेत.रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मनपाने कोविड सेंटर वाढविण्याचीही तयारी केली होती. परंतु, सध्याच्या कोविड केअर सेंटरमधील खाटा शिल्लक असल्याने मनपाने सेंटर सुरू करण्याबाबत हात आखडता घेतला आहे.
महापालिकेच्या वतीने दररोज 1 हजार 200 नागरिकांची चाचणी केली जात आहे. काल 1200 पैकी 496 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यावरून शहरातील कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण 21.92 टक्के इतके आहे. शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेऊन कोविड सेंटर वाढविण्याची तयारी केलेली आहे. सध्या तीन सेंटर सुरू आहेत. या सेंटरमधील बेड रिकामे आहेत. आवश्यकता भासल्यास आणखी सेंटर सुरू केले जातील. असे उपायुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले .
एकमेव बुथ हॉस्पिटल फुल्ल - कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी नगरमधील पहिले कोविड सेंटर  बुथ हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आले. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही हे रुग्णालय फुल्ल होते. सध्याही या रुग्णालयात बेड शिल्लक नाहीत. या रुग्णालयात ऑक्सिजनचे बेड असल्याने रुग्णांची पहिली पसंती बुथ रुग्णालयाला असते. त्यामुळे हे रुग्णालय फुल्ल झाले आहे.

No comments:

Post a Comment