‘घर घर लंगर सेवा’मार्फत हॉटेल नटराज व पितळे वसतिगृहात निशुल्क कोविड सेंटर सुरू.
मागील टाळेबंदीत व त्यानंतर देखील घर घर लंगर सेवा व अहमदनगर पोलीस दलाने दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने दि.22 मार्च ते 28 नोव्हेंबर 2020 पर्यंत तब्बल 8 महिने 6 दिवसांत शहरातील 4 लाख 26 हजार 400 लोकांना जेवणाचे पार्सल, 2 हजार 350 रेशनिंग व किराणा किट, 115 दिवस मन्सूरी युनानी काढ्याचे वाटप केले. 11 हजार श्रमिक प्रवाश्यांना जेवण आणि पाण्याची व्यवस्था केली होती. तसेच 650 झोपडपट्टीतील विद्यार्थ्याना शिक्षण साहित्य, 38 विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल आणि लॅपटॉपचे वितरण केले. विसापूर कारागृहाकरिता संगणक आणि प्रिंटर भेट देण्यात आली. अनेक परप्रांतीयांना महाराष्ट्राच्या सिमे पर्यंत सोडण्याचे सामाजिक कार्य करण्यात आले. तर फक्त महिलांकरिता जैन पितळे वसतीगृहात गुरु अर्जुन देव कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली होती. यामध्ये अनेक कोरोनाग्रस्त महिला चांगले होऊन घरी परतल्या.नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाच्या दुसर्या लाटेने सर्वच भयभीत व चिंताग्रस्त आहेत. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना प्रशासनाने घर घर लंगर सेवेचे सामाजिक कार्य पाहून त्यांना कोविड सेंटर चालवून सर्वसामान्यांना मदतीचा हात देण्याची विनंती करण्यात आल्यानंतर लंगर सेवेच्या वतीने दि.3 मार्च पासूनच हॉटेल नटराज व पितळे जैन वसतिगृह या दोन ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. लंगर सेवेने केलेल्या सामाजिक कार्य व योगदानातून शहरात मोठे सामाजिक कार्य उभे राहिले असून, सर्वांच्या मनात एक आदर व विश्वास निर्माण केला आहे.
पुन्हा घर घर लंगर सेवेच्या वतीने मनपाच्या सहकार्याने दोन्ही ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या गुरु अर्जुन देव कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून कोरोनाग्रस्त रुग्णांना निशुल्क सेवा दिली जात आहे. या कार्यासाठी लंगर सेवेचे हरजीतसिंग वधवा, जनक आहूजा, राहुल बजाज, प्रीतीपालसिंग धुप्पड, किशोर मुनोत, प्रशांत मुनोत, कैलास नवलानी प्रयत्नशील असून, मनपा आयुक्त शंकर गोरे, वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिल बोरगे, उपआयुक्त यशवंत डांगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
शहरात झपाट्याने कोरोनाचे संक्रमण वाढल्याने हॉटेल नटराज येथे आत्तापर्यंत 156 रुग्ण दाखल झालेले आहेत. यापैकी पन्नास पेशंट बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच जैन पितळे वसतीगृहातील कोविड सेंटरमध्ये 48 महिला रुग्ण दाखल झाल्या आहेत. यापैकी बरे झालेल्या 18 महिलां रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोविड सेंटरची क्षमता मर्यादित असताना रुग्ण वाढत असल्याने सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन घर घर लंगर सेवेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच दोन्ही कोविड सेंटरमधील बेडची क्षमता वाढविण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी लंगर सेवेच्या वतीने सकाळचा नाष्टा, दुपारचे व रात्रीचे जेवण तसेच विरंगुळा म्हणून खेळण्याचे साहित्य, ड्रॉइंग बुक, प्राथमिक गरजेचे साहित्य पुरविण्यात येत आहे. रुग्णांच्या नाश्त्याची सोय हॉटेल रॉयल येथून कुकरेजा परिवार तर दुपार व संध्याकाळच्या जेवणाची सोय हॉटेल अशोका येथे करणसिंह धुप्पड, प्रितपालसिंह धुप्पड यांच्या निरीक्षणाखाली होत आहे. या सर्व सेवेत राहुल बजाज, राजा नारंग, सनी वधवा, मनप्रीतसिंग धुप्पड, आदित्य छाजेड, दलजीतसिंह वधवा, कबीर धुप्पड, नारायण अरोरा, गोविंद खुराणा, जय रंगलानी, राहुल शर्मा, शरद बेरड, प्रमोद पांतम, पुरुषोत्तम बेती, संदेश रपारिया, सुनील मुळे आदी योगदान देत आहे. या सामाजिक सेवेत सर्वांनी आपल्या क्षमतेनुसार हातभार लावण्याचे आवाहन घर घर लंगर सेवेच्या वतीने करण्यात आले आहे. मदत देऊ इच्छिणार्यांनी मोबाईल नं.9423162727 व 9881463234 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment