दक्ष पत्रकार झुंजार संघाचे संपादक रोहीदास दातीर यांचा मृतदेह रस्त्यावर आढळला. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 7, 2021

दक्ष पत्रकार झुंजार संघाचे संपादक रोहीदास दातीर यांचा मृतदेह रस्त्यावर आढळला.

 दक्ष पत्रकार झुंजार संघाचे संपादक रोहीदास दातीर यांचा मृतदेह रस्त्यावर आढळला.

अपहरण..नी अमानुष हत्या!
  दक्ष पत्रकार झुंजार संघाचे संपादक पत्रकार रोहिदास दातीर यांची हत्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ला आहे. समाजातील वंचित घटकांवर राजकीय नेत्यांकडून होणारा अन्याय, प्रशासनातील भ्रष्टाचार, माहितीच्या अधिकारातून प्राप्त करताना दातीर यांनी अनेकांशी शत्रुत्व पत्करले. या शत्रुत्वातुन त्यांचेवर एकदा हल्लाही झाला होता. पत्रकाराची अपहरण करून हत्या होत असेल.तर मग पत्रकार सुरक्षा कायदा फक्त देखावा आहे काय? या कायद्यात काही तथ्य आहे का? पत्रकारांवरील हल्ले थांबणार आहेत की नाही हा खरा प्रश्न आहे. पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत असताना पत्रकारांना कोणी वाली नाही असेच म्हणावे लागेल. दातीर यांचे मारेकर्‍यांना शोधून त्यांचेवर त्वरित गुन्हा दाखल करावा असे आमचे पोलीस प्रशासनास आवाहन आहे.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः काल दुपारी 12:30 चे दरम्यान अज्ञात इसमांनी स्कार्पिओ गाडीतून अपहरण केलेल्या राहुरीतील पत्रकार रोहिदास दातीर यांचा मृतदेह रात्री राहुरी कॉलेज रस्त्यावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. माहितीच्या अधिकारातून भ्रष्टाचाराचा पोलखोल करणार्‍या दातीर यांची हत्या एका राजकीय पक्षाच्या नेत्याकडून करण्यात आली असा त्यांच्या पत्नीचा संशय आहे. सत्ताधारी राजकीय पक्षाचा तो नेता कोण? अपहरणाचे धागेदोरे सीसीटीव्ही फुटेजमधून प्राप्त झाले असताना पोलिसांना अजून हत्यारे का सापडले नाहीत हा खरा प्रश्न आहे.
   रोहिदास राधूजी दातीर हे त्यांची सफेद रंगाची अ‍ॅसेस कंपनीच्या एम एच 12 जे एच 4063 नंबर च्या दुचाकीवरून काल  दुपारी राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडने आपल्या घरी दातीर वस्ती येथे जात असताना सातपीर बाबा दर्गा ते पाटाच्या दरम्यान असतानाच सफेद रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या अज्ञात लोकांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून मल्हारवाडीच्या दिशेने पळवून नेले. यावेळी त्यांची दुचाकी व पायातील चप्पल घटनास्थळी आढळून आले. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या पत्नीने त्यांना मोबाईलवर संपर्क केला असता मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. घटनेनंतर त्यांची पत्नी सविता रोहिदास दातीर यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला. अपहरण झाल्यावर काही तासातच त्यांचा मृतदेह आढळून आला असल्याने  आता तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक दिनकर चव्हाण हे करीत आहेत.
   सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचा तपास लागला. पोलिसांनी ते ताब्यात घेतले. मात्र, आरोपी मिळाले नाहीत. आरोपी एका राजकीय पक्षाशी संबंधीत असल्याची माहिती पुढे आली आहे. दातीर यांनी एका प्रकरणात माहिती आधिकार वापरून केलेल्या पाठपुराव्यामुळे अडचणीत आल्याच्या कारणातून त्यांनी ही हत्या केली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.
    तालुक्यातील दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या दातीर यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील अनेक घटनांना वाचा फोडली. राहुरी शहरातील रूग्णालयांचे अतिक्रमण, अनाधिकृत बांधकामे, स्टेशन रोड परिसरातील 18 एकरचा प्लॉट, नगर मनमाड रोड वरील एका हॉटेल इमारत या विषयांचा त्यांनी पाठपुरावा केला होता. काही प्रकरणांचे खटले औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, याचा हत्येशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत.

No comments:

Post a Comment