पारनेरच्या पाणी योजनेचे सर्वेक्षण सुरू ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 9, 2021

पारनेरच्या पाणी योजनेचे सर्वेक्षण सुरू !

 पारनेरच्या पाणी योजनेचे सर्वेक्षण सुरू !

आ. लंके यांच्या पाठपुराव्यास यश : जीवन प्राधिकरणाचे अधिकारी पारनेरमध्ये दाखल


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर शहराचा अतिशय जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सुटला आहे ! आमदार निलेश लंके यांनी विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आज (दि. 8) योजनेच्या सर्वेक्षणासाठी पारनेरमध्ये पोहोचले आहेत.

पारनेरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा शब्द आ. निलेश लंके यांनी शहरवासीयांना दिला होता. वावरथ जांभळी येथून मुळा धरणाच्या बॅक वॉटर मधून ही योजना राबविण्यात यावी असा प्रस्ताव लंके यांनी मंत्रालय स्तरावर सादर केला होता. हा प्रस्ताव सादर केलेला असतानाच शिवेसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या राजकीय घमसनानंतर राष्ट्रवादीत दाखल झालेले नगरसेवक आ. लंके यांनी पुढाकार घेत पुन्हा मातोश्रीवर दाखल केले.
नागरसेवकांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान शहराचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला. आ. लंके यांनीही त्याबाबत आग्रही भूमिका मांडत माझ्या मतदार संघातील तालुक्याचे गावच तहानलेले आहे. मुळा धरणातून शास्वत पाणी योजना राबविण्यासंदर्भात आपण शासन दरबारी प्रस्ताव सादर केला असून तो मंजूर करण्यासाठी आपण सहकार्य करण्याची गळ  आ. लंके यांनी घातली होती. आ. लंके यांच्या भूमिकेनंतर ठाकरे यांनी ’आ. लंके तुमच्या हातात आजही शिवबंधन आहे. तुम्ही आज राष्ट्रवादी काँगेसचे आमदार असले तरी महाविकास आघाडीचे आमदार आहेत व यापुढील काळात राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार असणार आहे. शिवसेनेचे नगरसेवक पुन्हा स्वगृही आले त्याचा आनंद आहे. त्यांचा सन्मान राखला जाईल. शिवाय पारनेरचा पाणी प्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल अशी ग्वाही दिली होती.
पाणी योजनेसंदर्भात आ. लंके यांनी आपल्याशी तसेच अजितदादा यांच्याशी संपर्क करावा, मंजुरी देण्याचे काम आम्ही करू अशी ग्वाही देखील ठाकरे यांनी दिली होती. ठाकरे तसेच पवार यांनी प्राधान्यक्रमाने पारनेरच्या पाणीयोजनेस  चालना दिल्याने  पारनेरकरांचा काही दशकांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.

माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरविणार !  
   सगळ्याच आघाड्यांवर आमचा मतदारसंघ आघाडीवर आहे. मात्र तालुक्याचे शहर असलेल्या पारनेरच्या माता भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते याचे माझ्या मनाला शल्य आहे. खरे तर ज्यांनी 15 वर्ष मतदार संघाचे नेतृत्व केले त्यांनी खरे तर हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे होते. विधिमंडळात मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यानंतर आपण शहराच्या पाणी प्रश्नास प्राधान्य दिले. हा प्रश्न मी धसास लावणार हे माझे अभिवचन आहे.

आ. लंके घेणार सोमवारी आढावा
   जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी योजनेचे सर्वेक्षण सुरू केल्यानंतर आता आ. लंके हे सोमवारी या अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. शहरातील जेष्ठ नागरिकांची मतेही यावेळी जाणून घेण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here