काँग्रेसने केली नगर शहरात कोवीड केंद्राची उभारणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 23, 2021

काँग्रेसने केली नगर शहरात कोवीड केंद्राची उभारणी.

 काँग्रेसने केली नगर शहरात कोवीड केंद्राची उभारणी.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा


अहमदनगर - 
अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नागरिकांच्या मदतीसाठी नगर शहरात कोवीड सहाय्यता व मदत केंद्राची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांनी काल नगर शहरातील कोरोना स्थितीचा आढावा किरण काळे यांच्याकडून झूम मीटिंगच्या माध्यमातून ऑनलाईन घेतला. 

यावेळी झालेल्या झूम मिटींगला आ. पटोले यांच्यासह काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र विभागाच्या प्रमुख आ.प्रणिती शिंदे, आ.कुणाल पाटील, शिवाजीराव मोघे, मुजफ्फर हुसेन आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. किरण काळे यांनी नगर शहरातील कोरोना स्थितीबाबत काँग्रेसच्या राज्य नेत्यांना अवगत केले.

किरण काळे म्हणाले की, नगर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिक हवालदिल झाले आहेत. शहरामध्ये आरोग्य विषयक आणीबाणीची परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. अशा काळामध्ये नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याचे काम काँग्रेसच्यावतीने करण्यात येत आहे. 

कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर बेड मिळणे, ऑक्सिजन बेड मिळणे, रेमेडीसेवेर इंजेक्शन्स मिळणे, रुग्णांची वाढीव बिलांच्या माध्यमातून पिळवणूक होणार नाही यासाठी मदत मिळेल आदी विविध कामांसाठी नागरिकांना मदत व्हावी यासाठी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयामधून चोवीस तास सेवा देणारे कोवीड सहाय्यता व मदत केंद्र आम्ही सुरू केले असल्याची माहिती, किरण काळे यांनी दिली आहे. 

काळे यांनी काँग्रेसच्या केंद्राचे हेल्पलाईन नंबर नागरिकांसाठी खुले केले आहेत. प्रवीण गीते (मो.  +917972673430), ॲड. अक्षय कुलट (मो. +918668252702), आसाराम पालवे (मो. 09130098783) या काँग्रेस हेल्पलाईनच्या क्रमांकांवर कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना आवश्यक त्या मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. शहर काँग्रेसच्या कालिका प्राईड येथील कार्यालयास थेट भेट देवून नागरिक मदत मिळवू शकतात.

आ. नाना पटोले यांनी नगर शहरातील कोरोना स्थितीची माहिती किरण काळे यांच्याकडून ऑनलाइन झालेल्या मीटिंग द्वारे घेतली. यावेळी आ.पटोले यांनी काळे यांना कोविड सहाय्यता व मदत केंद्र तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना केल्या. तसेच प्रशासनाला आवश्यक त्या सूचना महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून नगर शहरासाठी दिल्या जातील, अशीही ग्वाही दिली. नगर शहरातील ऑक्सिजन तुटवडा, रेमेडीसेवेर इंजेक्शन्सची कमतरता भरून काढण्यासाठी ना.बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. 

किरण काळे म्हणाले की, नगर शहरामध्ये ना. बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्षा तथा उत्तर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रमुख आ.प्रणिती शिंदे, आ.डॉ.सुधीर तांबे, आ.लहू कानडे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून नगर शहरातील कोविड सहाय्यता व मदत केंद्र नागरिकांसाठी चोवीस तास काम करेल. जिल्हा प्रशासनाला मदत करेल. 

नगर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी तसेच काँग्रेसच्या युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, सेवादल काँग्रेस, महिला विभाग, अल्पसंख्यांक विभाग, मागासवर्गीय विभाग, क्रीडा विभाग, इंटक काँग्रेस, डॉक्टर सेल, वकील सेल आदी सर्व सेल, विभागाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना नागरिकांच्या मदतीसाठी तातडीने सर्वतोपरी पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या असून चोवीस तास काँग्रेस नगर शहरातील नागरिकांसाठी या आणीबाणीच्या स्थितीमध्ये काम करेल, असे किरण काळे यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment