शाळा ऑलंम्पियन बनविण्याचे केंद्र व्हावे - आ सुधीर तांबे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 16, 2021

शाळा ऑलंम्पियन बनविण्याचे केंद्र व्हावे - आ सुधीर तांबे

 शाळा ऑलंम्पियन बनविण्याचे केंद्र व्हावे - आ सुधीर तांबे

वाटचाल -आधुनिक शारीरिक शिक्षणाची या नियतकालीकाचे प्रकाशन



नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शारीरिक शिक्षण हे सुदृढ समाजाच्या विकासाचे माध्यम, तर शिक्षक हा शाळेचा आत्मा आहे. शारीरिक शिक्षक संचमान्यतेत यावा म्हणून सभागृहात व शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा करून आगामी संचमान्यतेत शिक्षकाला घेतले असून ग्रेसगुणांबाबत सकारात्मक निर्णय होईल. कोरोना परिस्थिती सुधारल्यानंतर नोकर भरती संदर्भात पाठपुरावा करू. क्रीडासाठी शासनाने गायरान जमिनी, शिक्षक व निधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षणमंत्री सकारात्मक असल्याचे व आगामी काळात शाळा हे ऑलंम्पीअन घडविण्याचे केंद्र व्हावे असे मत पदवीधर आमदार डॉ. सुधीरजी तांबे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील नावीन्याच्या ध्यास घेतलेल्या क्रीडा क्षेत्रातील क्रीडा शिक्षकांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा महासंघ अहमदनगर या संघटनेच्या वाटचाल आधूनिक शारीरिक शिक्षणाची या डिजिटल नियतकालीकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळयाप्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे बोलत होते. दरम्यान या ऑनलाईन सोहळ्यास उपस्थित सर्व आमदारांच्या शुभहस्ते लिंक ओपन करून ऑनलाईन पद्धतीने प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
खेळामुळे समाजातील प्रत्येक घटक जोडला जातो. सुदृढ देश व समाज घडविण्यासाठी शारीरिक शिक्षण विषयाला विशेष महत्त्व प्राप्त होणे गरजेचे आहे. नवीन संच मान्यतेत शारीरिक शिक्षण शिक्षक पदाची पुर्नस्थापना होणार असून, येत्या नवीन संचमान्यतेत कला व शारीरिक शिक्षण शिक्षक हे पद निश्चितच कायम राहणार असल्याची माहिती शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी दिली.शारीरिक शिक्षणावर यापूर्वी शासनाकडून मोठा अन्याय झाला आहे. महाराष्ट्रातील शारीरिक  शिक्षकांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शारीरिक शिक्षण शिक्षकांची प्रत्येक समस्या शासन दरबारी मांडण्याचेही आश्वासन अमरावती विभागाचे आमदार डॉ. किरण सरनाईक यांनी दिले. पवित्र पोर्टलवर बीपीएड पद आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार जयंत आसगावकर यांनी देत, वाटचाल नियतकालिक राज्यातील क्रीडा शिक्षक व विद्यार्थ्यांना दीपस्तंभासारखे निश्चितच मार्गदर्शक ठरेल असा आशावाद व्यक्त केला. नागपूर विभागाचे आमदार अभिजीत वंजारी यांनीही नियतकालीकास शुभेच्छा दिल्या. शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे, शिवदत्त ढवळे, उपाध्यक्ष आनंद पवार, घनश्याम सानप, संपादक राजेश जाधव, कार्यकारी संपादक सुवर्णा देवळाणकर, राजेंद्र पवार, दत्तात्रय मारकड, डॉ. मयुर ठाकरे, डॉ.जितेंद्र लिंबकर, महेंद्र हिंगे, दिनेश म्हाडगूत, तायाप्पा शेंडगे, दत्तात्रय हेगडकर, शेखर शहा यांनी मनोगत व्यक्त केली.
या प्रकाशन सोहळ्यासाठी आत्मा मालिक शैक्षणिक संकुल कोकमठाण व स्पेस इन्फोटेकचे प्रशांत खिलारी यांनी तांत्रिक सहकार्य पुरविले. महासंघाचे उपाध्यक्ष आनंद पवार यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. आभार प्रितम टेकाडे यांनी मानले. तंत्रस्नेही म्हणून गणेश म्हस्के, राहुल काळे यांनी काम पाहिले. या सोहळ्यास जिल्हाध्यक्ष सुनील गागरे, अजित वडवकर, नंदकुमार शितोळे, प्रशांत होन, दिनेश भालेराव, सुनील मंडलिक, सोपान लांडे, ज्ञानेश्वर रसाळ, प्रताप बांडे, संदिप घावटे, निवृत्ती शेलार, विनोद तारू, बाळासाहेब कांडेकर आदींसह राज्यभरातील शिक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment