नगरमध्ये प्रशासनाचा कारभार रामभरोसे, आ.संग्राम जगताप यांची तीव्र नाराजी
नगरी दवंडी
नगर : कोरोना थोपविण्यासाठी उपाययोजना करण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरत असून, प्रमुख अधिकार्यांचे संपर्क क्रमांक बंद आहेत. प्रशासनाचा कारभार रामभरोसे सुरू आहे, अशा शब्दांत आ. संग्राम जगताप यांनी गुरुवारी जिल्हा प्रशासनावर संताप व्यक्त केला.
आ. जगताप म्हणाले, जिल्हा रूग्णालयासह खासगी रूग्णालयांंना ऑक्सिजन न मिळाल्याने रूग्णांना जीव गमवावा लागत आहे. दुसरीकडे ऑक्सिजनचा आलेला टँकर बंद पडतो. ही बाब अत्यंत गंभीर आहे. आक्सिजनचा टँकर बंद पडल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे संपत बारस्कर, अविनाश घुले यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना फोन केला. त्यांनी फोन घेतला नाही. त्यानंतर या दोघांनी जिल्हा शल्यचिकित्सक अनिल पोखरणा यांनाही फोन केला. त्यांनी देखील फोन उचलला नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी टँकर सुरू करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केले. टँकरला बेल्ट नव्हता. रात्री शोधाशोध करून बेल्ट उपलब्ध करून दिला. त्यानंतर ऑक्सिजनचा टँकर सुरू झाला. ऑक्सिजन वेळेवर पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. एवढे सर्व होऊनही अधिकारी फोन बंद करून बसतात. नातेवाइकांनी संपर्क करूनही तो होत नाही. त्याचा परिणाम रूग्णांच्या उपचारावर होत असून, वेळेवर आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत.
रेमडेसिविरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. एका एका इंजेक्शनसाठी नातेवाइकांची अक्षरश: धावपळ सुरू आहे. रेमडेसिविरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी कक्ष स्थापन केला आहे. 24 तास यावर अधिकारी, कर्मचारी उपस्थित असतील, असे सांगण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त पी. एन. कातकडे व उपजिल्हाधिकारी किशोर कदम या दोन अधिकार्यांचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत. या दोन्ही अधिकार्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कदम फोन उचलत नाहीत. अधिकार्यांवर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही. अधिकार्यांची मनमानी सुरू आहे. जनतेसाठी खुले केलेले किती संपर्क क्रमांक सुरू असतात, किती बंद असतात आणि सुरू असले तरी किती फोन उचलतात याची चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment