कर्मचार्‍यांचा पगार कोण देणार? टॅक्स भाडे कसे भरणार?; घरी बसलो तर खाणार काय? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, April 6, 2021

कर्मचार्‍यांचा पगार कोण देणार? टॅक्स भाडे कसे भरणार?; घरी बसलो तर खाणार काय?

 कर्मचार्‍यांचा पगार कोण देणार? टॅक्स भाडे कसे भरणार?; घरी बसलो तर खाणार काय?

व्यापारी नाराज; बाजारपेठेत शुकशुकाट! मिनी लॉकडाउन ला विरोध!


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान यानंतर व्यापारी संघटनांची नाराजी पाहायला मिळत आहे. आम्हाला नुकसानभरपाई देणार का ? असा प्रश्न व्यापारी संघटनांनी राज्य सरकारला विचारलाय. हा मिनी लॉकडाऊन आहे असं सरकार म्हणत आहे मात्र व्यापार्‍यांसाठी हा पूर्णपणे लॉकडाऊन आहे. मॉल, रेस्टॉरंट, कापड दुकान, मोबाईल शॉप, स्टेशनरी दुकाने, हार्डवेअर, इलेक्ट्रिकल शॉप, फर्निचर शॉप, टू व्हीलर, फोर व्हीलर शोरूम बंद असणार आहेत. दुकानांपैकी 10% दुकानं अत्यावश्यक असतील. बाकी सर्व दुकानं बंद राहणार आहेत. या निर्णयामुळे व्यापारी नाराज आहेत. वाढत्या कोरोनामुळे सरकारने हा निर्णय घेतला. पण  आमच्या कर्मचार्‍यांचा पगार कोण देणार, टॅक्स, भाडं कसं भरणार ? असा प्रश्न व्यापारी उपस्थित करीत आहेत. आम्ही सरकारबरोबर आहोत, पण जर लोक घरी बसले तर खाणार काय ? त्यांना पगार कोण देणार ? त्यांच्या मुलांना कुटुंबाला पैसे कोण देणार ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. अनेक दुकानं, मॉल भाड्यावर असतात, भाडं कसं भरायचं ? याचे उत्तर महाविकास आघाडी सरकारने द्यावे अशी मागणी व्यापारी संघटनेनं केलीय.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी रात्री उशिरा अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण दुकाने बंद करण्याचा आदेश पारित केला. आज शहरातील व्यापार्‍यांना या आदेशान्वये सर्व दुकाने बंद करण्यास स्थानिक प्रशासनाने सांगितल्यानंतर शहरातील व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली. तसेच अचानक बंद कसे करता काही तरी सवलत द्या, अशी मागणी करत व्यापार्‍यांनी या बंदला कडाडून विरोध केला. जिल्ह्यातील ग्रामीण भाग, ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आदी हद्दींमध्ये ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 30 एप्रिल पर्यंत संचारबंदी वाढवण्याचा आदेश देण्यात आला आहे. काल दुपार नंतर उशिरा जिल्हाधिकार्‍यांनी अत्यावश्याक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. अचानक आलेल्या या नव्या आदेशामुळे व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांना धक्का बसला. त्यामुळे व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. हा आदेश म्हणजे व्यापार्‍यांचे कंबरडे मोडणारा आहे अशा शब्दात व्यापार्‍यांनी शासनाच्या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शहरात मंगळवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. विश्वासात न घेता तसेच पूर्व कल्पना न देता अचानक दुकाने बंद करायला लावल्याने व्यापार्‍यांनी मोठी नाराजी व्यक्त केली. तसेच दुकाने बंद झाल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची देखील तारांबळ उडाली.
मागील वर्षाच्या संचारबंदीमुळे व्यापारीवर्ग अजुनही आर्थिक संकटात आहे.आता नव्याने संचारबंदी लागू केल्यामुळे व्यापार्‍यांचे कंबरडे मोडणार आहे. प्रचंड आर्थिक नुकसानीला आम्हाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे आठ दिवस बंद त्यानंतर चार-पाच दिवस दुकाने सुरू करू द्यावीत. काही दिवसांवर गुढीपाडवा आला आहे. व्यापारीवर्गासाठी हा सण महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रशासनाने व्यापार्‍यांच्या अडचणी समजुन घ्यायला हव्यात. असं मत अनेक व्यापार्‍यांनी व्यक्त केल आहे.
कोरोनाचा वेगाने होणारा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन आक्रमक झाले असून कठोर पावले उचलत आहे.याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार व महापालिका प्रशासन यांच्याद्वारे शहरात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकानांना सुरू ठेवण्यास परवानगी नाकारली आहे. याचाच निषेध म्हणून विविध व्यापारी संघटनांनी प्रशासनाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवला आहे. आज सकाळी रस्त्यावर अनेक व्यापारी राज्य सरकार व प्रशासनाच्या निषेध व्यक्त करणार्‍या फलकांसह रस्त्यावर घोषणाबाजी केली. यावेळी अनेक व्यापारी वर्गाने गर्दी करत प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणीही केली आहे. प्रशासनाचा हा निर्णय सर्व छोट्या मोठ्या व्यापार्‍यांवर अन्याय करणारा आहे.आधीच अडचणीत सापडलेल्या व्यापारी वर्गाला या निर्णयामुळे खूप मोठा फटका बसणार आहे.सरकार व प्रशासनाने आमच्या भावनांचा व परिस्थितीचा विचार करावा. आम्हाला दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. कोरोनावरून सरकारने जाहीर केलेल्या बंदचा लक्ष्मी रस्त्यावरील व्यापार्यांनी मंगळवारी सकाळी निषेध केला. सरकार अनावश्यक बंद घोषित करून दुकानदार व कामगारांच्या जगण्यावरच गदा आणत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here