‘संचारबंदी’ फस्ट डे फेल! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 15, 2021

‘संचारबंदी’ फस्ट डे फेल!

‘संचारबंदी’ फस्ट डे फेल!

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांची धावपळ..

कडक निर्बंधांचे आवाहन करत, जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक उतरले रस्त्यावर

12 ठिकाणी भाजी विक्री बंद भाजीपाला विक्रेत्यांना हटविले.नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत संचारबंदी चा आज ‘फस्ट डे’ नगरकरांनी घराबाहेर पडून फेल केला असं म्हणावं लागेल. बाजारपेठेतील दुकाने बंद असल्यामुळे शुकशुकाट जाणवला, पण रिकामटेकड्यांनी “लॅाकडाऊन” डोळ्यातून अनुभवण्यासाठी मोठी गर्दी केली. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना ही माहिती प्राप्त होताच त्यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांना भेटी देऊन नागरिकांना संचारबंदी असल्याची जाणीव करून दिली. चितळे रोड, दिल्ली गेट, चौपाटी कारंजा, नेप्ती नाका परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ दिसून आली. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिल्ली गेट परिसरात विनाकारण फिरणार्‍या, मास्कचा वापर न करणार्‍या नागरिकांची तपासणी करून दंड लागू केला. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी केल्यास उद्यापासून पोलीस संचार बंदी साठी आणखी कडक पाऊल उचलतील असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिला.

राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात काल रात्रीपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच बाहेर पडण्याची मुभा आहे. रेल्वे, बसमधून अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना प्रवास करण्यास परवानगी आहे.  संचारबंदीचा आजचा पहिला दिवस असल्याने काही ठिकाणी त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, काही ठिकाणी वर्दळ पाहायला मिळाली. शहरातील 12 ठिकाणचे भाजीपाला बाजार बंद केले. आयुक्त शंकर गोरे यांनी यासंदर्भात रात्री उशिरा आदेश काढला. हे बाजार 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील, असे आदेशात म्हटले पण भाजीपाला विक्रेता पर्यंत हा आदेश न पोहोचल्याने भाजीपाला विक्रेत्यांनी अनेक रस्त्यांवर भाजीपाला विकायला सुरुवात केल्याने सकाळीच पोलिस प्रशासनाने या विक्रेत्यांना रस्त्यावरून उठून लावले.
अमरधामसमोर गाडगीळ पंटागणावरील भाजीबाजार, दिल्ली दरवाजा येथील भाजीबाजार, चितळेरोडवरील भाजीबाजार, गंजबाजार येथील भाजी मार्केट, प्रोफेसर कॉलनी चौकातील भाजीबाजार, पाईपलाईन रोडवरील यशोदानगरमधील भाजीबाजार, एकवीरा चौकातील भाजीबाजार, नागापूर गावठाणमधील भाजीबाजार, केडगावच्या अंबिका बसस्टॉप येथील भाजीबाजार, केडगावच्या अंबिका देवीसमोरील भाजीबाजार, शाहूनगर पाच गोडाऊन येथील भाजीबाजार, लिंक रोड भूषणनगर चौकातील भाजीबाजार, दरम्यान आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरोधात दंडात्मक आणि फौजदारी कारवाईचे संपूर्ण अधिकार शहर पोलिसांना देण्यात आले आहेत.
राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने 30 एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नगर जिल्ह्यात  कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याने पालिका, आरोग्य आणि पोलीस प्रशासन रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कंबर कसत आहेत. दरम्यान आज लॉकडाउन नियमांचे कडक अंमलबजावणी पाहण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक ,जिल्हाधिकारी स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी त्यांनी नगरकरांना कडक निर्बंधाचे पालन करा असा आवाहन केले आहे.  लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी होत आहे की नाही, नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत तर नाही ना याची जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी पाहणी केली. यावेळी बोलताना  जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले, नागरिकांवर पूर्ण विश्वास ठेवतोय, शासनाने सांगून दिलेल्या सुचनांप्रमाणे, नागरिकांनी घरीच राहावे, परंतु अत्यंत आवश्यक कारणासाठी म्हणजे वैद्यकीय, खाजगी, कौटुंबिक आणि बाजारातून काही खाण्यापिण्याच्या वस्तू आणण्यासाठीच घराबाहेर पडावे. अन्यथा दुसर्‍या कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये. अशी सर्व नगरकरांना सुचना आहे. रस्त्यावरील ट्राफिक कमी आहे परंतु तरीही अनेक वाहनांना थांबवून चौकशी केली जात आहे. तसेच अनावश्यक कारणासाठी फिरणार्‍या नागरीकांना समज दिली जातेय. तसेच पोलीस कर्मचार्‍यांनीही सुचना आहेत त्यांनी नागरिकांशी चांगल्या पद्धतीने बोलावे, वागावे तसेच कोणत्याही प्रकारे शिवीगाळ किंवा बळाचा वापर न करता सौजन्याने वागावे. असे पोलीस अधीक्षक म्हणाले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here