महापालिका ही धर्मशाळा आहे का? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 6, 2021

महापालिका ही धर्मशाळा आहे का?

 महापालिका ही धर्मशाळा आहे का? 

पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी, वॉलमनमुळे पाणी पुरवठा विस्कळीत..

..तर वॉलमनला नारळ देऊन निलंबित करा : घुले


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पाणीपुरवठा विभागातील कर्मचारीफ वॉलमन यांच्या निष्काळजीपणामुळे पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. महापालिका ही काय धर्मशाळा आहे का? एकमेकांच्या आड लपून काम चालू आहे. ऐकमेकांना पांगरुन घालण्याचे काम करत असल्यामुळे, त्यांच्यावर कुठलाही धाक नाही, त्यामुळे चुकीची बाब सुरु आहे. वॉलमन यांनी चुकीचे उत्तरे देऊ नये. ही काय ग्रामंचायत नाही. तुम्ही महापालिकेत काम करत आहात. चुकीचे काम निदर्शनास आल्यास जागेवर निलंबित करण्यात येईल. जबाबदारीचे भान ठेवून काम करा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. बोटावर मोजण्या इतकेच कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात. नागरिकांना उत्तरे देता देता तोंडाचा फेस निघू लागला आहे. जो कोणी कर्मचारी ड्रेसकोड व आयकार्ड घालणार नाही, त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी दिला आहे.

पाणीपुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत अविनाश घुले, यांनी पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍यांना फैलावर घेतले. जल अभियंता परिमल निकम, पाणीपुरवठा विभागप्रमुख अधिकारी इंजि. रोहिदास सातपुते, माजी नगरसेवक निखिल वारे, इंजि. गणेश गाडळकर, अधिकारी, कर्मचारी व वॉलमन उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना घुले म्हणाले की, वॉलमन यांना आपल्या भागाची पाहणी अहवाल डायरी ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पाणी सोडले जाते की नाही, याची तपासणी करण्यात आली आहे. आपआपल्या भागामध्ये खराब वॉल, पाणी टंचाई आढावा, व वॉलमनची माहिती, नागरिकांच्या सह्या घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पाणी हे नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मुळाधरणात पाणीसाठा मुबलक असतानाही गेल्या 2-3 महिन्यापासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असल्यामुळे नागरिकांच्या रोशाला नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे. पाणी टंचाईची माहिती घेण्यासाठी मुळा धरण, विळद व वसंत टेकडी येथे पाहणी केल्यानंतर नगर शहरात येणारे पाणी मुबलक असून ते वितरण व्यवस्थेमुळे नागरिकांपर्यंत पोहचत नाही. यासाठी पुढील उपाययोजना करण्यासाठी बैठकीचे आयोजन करत आहे. टाकीवरील कर्मचारी व वॉलमन यांच्या निष्काळजीपणामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सूचना देऊनही वॉलमन ऐकत नसतील तर त्यांना नारळ देऊन निलंबित करा. येत्या 8 तारखेला स्थायी समितीच्या सभेमध्ये पाणीपुरवठा विभागामध्ये कर्मचारी भरण्याचा विषय घेण्यात आला असून त्याला मंजुरी देऊन तात्काळ कर्मचारी भरण्यात येईल, अशी माहिती ही घुले यांनी दिली.
कायम सेवेतील वॉलमनने झीरो वॉलमन ठेवला असल्यामुळे पाणी वितरण व्यवस्थेवर परिणाम होत आहे. आपण पाहणी केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने काही उपाययोजना केल्या आहेत, अशी माहिती जल अभियंता परिमल निकम यांच्याकडे विचारणा केली असताना त्यांनी सांगितले की, टाकीवरच्या व वॉलमनच्या हलगर्जीपणामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. आपण एक-एक भागामध्ये जात असून, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना सुरू आहे. ज्या ज्या ठिकाणी लिकेज होत्या, अशा 10 ठिकाणी शटडाऊन गेऊन लिकेज काढण्यात आले आहे. कल्याण रोडचा पाणीपुरवठा सुरळित करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. याचबरोबर एअरवॉलची दुरुस्ती केली आहे. नागापूर, बोल्हेगाव भागाला फेज 2 योजना पूर्ण केली असून पाणीपुरवठा सुरू करायचा आहे. मुकुंदनगरलाही फेजर2 चे काम पूर्ण करून ते चालू करण्यासाठी तयारी सुरू आहे. मुकुंदनगरला पाणीपुरवठा असताना 4 मोटर चालू असतात ते आता बंद होणार आहे. सारसनगर, विनायकनगर, रेल्वेस्टेशन परिसराला दूषित पाणीपुरवठा होत होता. तो आता सुरळित केला आहे. टाकीवरचे कर्मचारी व वॉलमनच्या सोबतीशिवाय पाणीपुरवठा सुरळित होणार नाही. आता झोनवाईज बैठका सुरू करणार आहे. महापालिकेला पाणीपुरवठा करणार्‍या पाणी योजनेतून ग्रामपंचायतींना पाणी दिले जात आहे. ग्रामपंचायतींकडून कुठलेही थकीत पाणीपट्टीची वसुलीही होत नाही. यासाठी नगरसेवकांनी महासभेत धोरणात्मक निर्णय घ्यावा, आम्ही त्यावर अंमलबजावणी करू, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment