संपादकीय - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 4, 2021

संपादकीय

 संपादकीय

ठाकरे-फडणवीसांचा इगो.
काँग्रेस-राष्ट्रवादीला लाभदायक.


मुंबईत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही शिवसेना आणि भाजप या पूर्वापार दोन मित्रांमधील कलगीतुरा हा देखील रंगताना पाहायला मिळत आहे. या दोघाही मित्रांची व्होट बँक एकच आहे म्हणजे हिंदुत्व. त्यामुळे शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी मतपेटी स्वतःकडे अधिकाधिक कशी ओढता येईल याच्या खटाटोपात लागलेले आहेत. त्यातूनच मग कोण किती प्रखर हिंदुत्ववादी कोणाचे हिंदुत्व असली, कोणाचे हिंदुत्व नकली? कोणाचे हिंदुत्व प्रेम बेगडी आहे? कुणी हिंदुत्वाला तिलांजली दिली आहे? अशा धार्मिक आणि परंपरागत प्रश्नांमध्ये हे दोन्ही पक्ष अडकून पडले आहेत.

   शरद पवार यांच्यासारख्या प्रगल्भ जाणत्या नेत्याने दीड वर्षापूर्वी महाराष्ट्रात सत्तांतर करताना शिवसेनेला मुख्यमंत्री पद पाच वर्षांसाठी का बहाल केले असावे याचे उत्तर गेले दीड वर्ष महाराष्ट्रामध्ये जो काही शिवसेना-भाजपमध्ये राजकीय धुरळा उडत आहे त्यावरून कोणालाही सहजपणे लक्षात यावे असे आहे.     महाराष्ट्रापुढील प्रश्न सुटोत अथवा न सुटोत, मात्र शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असेपर्यंत आणि विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस असेपर्यंत हा कलगीतुरा सुरूच राहणार आहे, आणि आणखीन काही वर्षे हा कलगीतुरा सुरू राहण्यात अथवा तो वाढण्यात जर कोणाचा सर्वाधिक फायदा असेल तर तो राष्ट्रवादी आणि त्यानंतर काँग्रेसचा आहे हे हेरण्याची जी क्षमता वा अनुभव शरद पवार यांच्याकडे आहे तो अन्य कोणत्याही नेत्याकडे नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी आणि शिवसेना भाजप या दोन्ही पक्षांच्या हितासाठी तरी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपापसातील ईगो हा आता कमी करावा आणि महाराष्ट्राच्या आणि स्वतःच्या पक्षांच्या हिताकडे अधिक लक्ष द्यावे असेच सांगावेसे वाटते.
   महाराष्ट्राच्या सत्तांतराच्या वेळी जे एक मोठे कोडे राजकीय पंडितांना पडले होते त्याचे उत्तर विधिमंडळात शिवसेना-भाजपमध्ये जे काही सुरू आहे त्यावरून तरी मिळाले असावे, असे समजण्यास हरकत नसेल. बर्याच वेळा महाराष्ट्राचे जाणते नेते शरद पवार हे जेव्हा एखादा निर्णय घेतात, एखादी कृती करतात, त्यामागे त्यांचे स्वतःचे असे एक स्वतंत्र लॉजिक असते. हे लॉजिक सहजासहजी कोणाच्याही लक्षात येत नसते. चालू स्थिती घडामोडींवरून तर त्याचा संदर्भ बांधणे ते अत्यंत धोक्याचे असते.
   महाराष्ट्रात 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता परिवर्तनाचे जे काहीही नाट्य झाले आणि त्या नाट्यात्मक घडामोडींमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्ता स्थापन झाले. या घडामोडींचे पडसाद अजूनही शिवसेना आणि भाजप या परंपरागत मित्रपक्षांमध्ये सातत्याने उमटताना दिसत आहेत. त्यामुळे वरकरणी जरी महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी व काँग्रेस अशा तीन परस्पर विरोधी विचारसरणी असलेल्या पक्षांचे सरकार सत्तेत असलेले दिसत असले तरी या तीन चाकी दिसणार्या सरकारमध्ये एक चौथे हेही महत्त्वाचे चाक रुतून म्हणा वा अडकून म्हणा पण बसले आहे आणि ते भाजपचे आहे. आणि या चार चाकांमधील आपापसातील स्पर्धेने महाराष्ट्रातील जनतेचा गाडा मात्र पूर्ण पांगुळगाडा करून टाकला आहे.
   महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना हे सांगावेसे वाटते की, महाराष्ट्राचे प्रश्न हे याहून खूप वेगळे आणि गंभीर आहेत. त्यामध्ये कष्टकर्यांचे प्रश्न, बहुजनांचे प्रश्न, दलितांचे प्रश्न, श्रमिकांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, मध्यमवर्गीयांचे प्रश्न, व्यापार्यांचे प्रश्न, शेतकर्यांचे प्रश्न व महिलांचे प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न आणि या बरोबरच मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर जी जबाबदारी आहे. त्यामध्ये भ्रष्टाचार रोखण्याचा प्रश्न हे प्रश्न महाराष्ट्राच्या हिताचे आहेत आणि त्यामुळे हिंदुत्वाच्या प्रश्नाचे जे काय करायचे ते शिवसेना-भाजपने ठरवावे आणि करावे, मात्र हिंदुत्वाच्या प्रश्नामुळे महाराष्ट्रा समोरील या महाकाय प्रश्नांकडे दुर्लक्ष करून मुख्यमंत्र्यांना चालणार नाही हे त्यांनी वेळीच लक्षात घेण्याची गरज आहे.
   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री तसेच भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांना पुन्हा परत येण्याची अभिलाषा आहे असे देवेंद्र फडणवीस यांच्यातील वादांमध्ये महाराष्ट्राने किती अडकून पडायचे यालादेखील काही मर्यादा आहे याचेही भान या दोन्ही मोठ्या नेत्यांनी समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना जनतेच्या वतीने हात जोडून विनंती करावी लागेल की बाबांनो तुमच्यातील वाद आता पुरे झाला आता महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे लक्ष द्या. महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेने तुम्हाला विधानसभेत त्या सभागृहाचा आखाडा करायला निवडून दिलेले नाही. तर महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तसेच त्यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी निवडून दिले आहे त्याला सर्वाधिक प्राधान्य द्या आणि त्यानंतर तुमचे हिंदुत्व, अस्मिता, धार्मिक राजकारण, हिंदू मतपेटीतील खेचाखेची, खरे आणि खोटे हिंदुत्व, बेगडी हिंदुत्व प्रेम यावर भाष्य करा असे कळकळीने सांगावेसे वाटते. कारण महाराष्ट्रातील जनतेसमोर आत्ता हिंदुत्वाचा प्रश्न नसून त्याला पोटापाण्याचा प्रश्न आहे.
कोरोनामुळे राज्यातील जनतेची उदरनिर्वाहाची साधने हिरावली गेली आहेत. परंपरागत शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. व्यापार-उद्योग हा विस्कळीत झाला आहे. लॉकडाऊनची टांगती तलवार ही राज्यातील जनतेवर आहे, अशा परिस्थितीमध्ये हिंदुत्वाचे तुणतुणे वाजवण्यापेक्षा महाराष्ट्रातील हे जीवघेणे प्रश्न आणि त्यावरील उत्तरे कशी शोधता येतील याचा एकत्रित प्रयत्न हा सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने करावयास हवा. आणि तसा प्रयत्न जर सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही बाकांवरच्या सन्माननीय मंडळींकडून झाला तर त्याचे स्वागत निश्चितच महाराष्ट्रातील जनता करेल यात तिळमात्र शंका नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ज्याप्रमाणे त्यांच्या सांगण्यानुसार भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मातोश्रीवरील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बंद खोलीत दिलेले वचन भाजपने नाकारले याचा मनस्वी जो राग आहे तशाच प्रकारचा राग हा भाजपाला विशेषत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी केलेल्या घरोब्याचा आहे. त्यामुळे हे दोघेही नेते त्यांना जेव्हा जेव्हा जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे त्यांच्या या जखमांवरील खपला काढून त्याचे जाहीर प्रदर्शन राज्यातील जनतेला सातत्याने करत आहेत.
   महाराष्ट्रापुढे सध्या अत्यंत भीषण प्रश्न उभे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नव्या कोरोना लाटेचे आव्हान आहे. कोरोना काळात महाराष्ट्रात बोकाळलेला मोठा भ्रष्टाचार आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा आणि विशेषत: राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत आहे. त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे स्वतः महावितरणच्या मुंबईतील खंडित झालेल्या वीज पुरवठ्याबाबत चीनच्या हॅकर्सवर खापर फोडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यासमोर चीनच्या सायबर घुसखोरीचे आव्हान मोठे आहे. त्यात हिंदुत्वाचा मतपेटी वरून एकमेकांमध्ये खेचाखेचीचे राजकारण करणारे शिवसेना आणि भाजपा यासारखे दोन मोठे मातब्बर पक्ष महाराष्ट्रातील जनतेच्या हिताच्या प्रश्नांकडे कधी लक्ष देणार हा खरा प्रश्न आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here