मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा व्हावा ः वाघमारे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 2, 2021

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा व्हावा ः वाघमारे

 मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा व्हावा ः वाघमारे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण ज्या अस्मितेने आणि उत्साहात साजरी करतो त्याच अस्मितेने व उत्साहाने  मराठी राजभाषा दिन साजरा झाला तर निश्चितच चांगले प्रबोधन व जागृती होईल. असे प्रतिपादन पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष  संजय वाघमारे यांनी केले.
पारनेर महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी राजभाषा दिनाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर होते.कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.दत्तात्रय घुंगार्डे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक घोरपडे, मराठी विभागप्रमुख डॉ. हरेश शेळके, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे, कार्याध्यक्ष विजय वाघमारे, खजिनदार विनोद गोळे, सचिव उदय शेरकर,प्रमोद गोळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वासिम राजे, डॉ. विजयकुमार राऊत, डॉ.भाऊसाहेब शेळके, डॉ.भीमराज काकडे,डॉ. हनुमंत गायकवाड, प्रा. विरेंद्र धनशेट्टी, प्रा.अशोक मोरे, प्रा.संजय गायकवाड, प्रा.जोत्स्ना म्हस्के, प्रा.प्रतीक्षा तनपुरे, प्रा.प्रियंका आतकर, प्रा.तुषार गालबोटे, डॉ.विशाल साळवे, प्रा. रणजीत शिंदे, प्रा.संदीप ठोंबरे, प्रा. शिवाजी पठारे  आदी उपस्थित होते.
   संजय वाघमारे पुढे म्हणाले की मराठी भाषेच्या संवर्धानाकडे दुर्लक्ष झाले तर भविष्यात छत्रपती शिवाजी महारांजांच्या जयंती ऐवजी ’शिवाजी फेस्टिवल’, ’ट्रॅडीशनल डे’ केव्हा सुरु होतील हे कळणारही नाही.यासाठी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वच पातळ्यांवर  प्रयत्न होणे आवश्यक आहे. मराठी बोलणे व लिहिणे या दोन क्रिया  काळजीपूर्वक केल्या पाहिजेत.त्यासाठी तरुणांनी जागृत असणे गरजेचे आहे.अन्यथा हा हलगर्जीपणा मराठीच्या र्‍हासाला कारणीभूत ठरू शकतो.आज अनेक इंग्रजी शब्द आपण मराठी असल्याप्रमाणे सर्रास वापरतो. पण त्याचा अतिरेक होऊ देता कामा नये. अन्यथा मराठीचा र्‍हास कोणीच थांबवू शकणार नाही. यासाठी आत्तापासूनच विद्यार्थ्यांनी व समाजातील प्रत्येक मराठी भाषिकाने प्रयत्नपूर्वक मराठीची जपणूक करून तिच्या संवर्धनासाठी काम केले पाहिजे असे वाघमारे म्हणाले.
   प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर म्हणाले की मराठी भाषेला हजारो वर्षांची समृद्ध परंपरा आहे. अनेक साहित्यिकांनी  मराठी भाषेत साहित्य निर्मिती करून मराठी भाषेला वैभव प्राप्त करून दिले आहे. यामध्ये कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, वि.स. खांडेकर, भालचंद्र नेमाडे यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
   याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते वसिम राजे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले.प्रास्ताविक प्रा.नंदकुमार उदार  यांनी केले.डॉ.हरेश शेळके यांनी सूत्रसंचालन केले.डॉ.माया लहारे यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment