राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना की भारतीय जनता पक्षाचा ? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 1, 2021

राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना की भारतीय जनता पक्षाचा ?

 राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना  की भारतीय जनता पक्षाचा ? सभापती कोणाचा?

स्थायी समिती सभापती निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

पडद्याआड हालचालींना वेग


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्थायी समितीच्या सभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रम मनपा नगर सचिव यांचेकडून जाहीर करण्यात आला आहे. नगरसचिव कार्यालयातून दि. 2 व 3 मार्चला सकाळी 11 ते 1.30 या वेळेत नामनिर्देशनपत्रे देण्यात येणार आहे. दिनांक 3 मार्च रोजी सकाळी 11 ते 1.30 या वेळेत नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची वेळ असून 4 मार्चला पीठासीन अधिकारी या पत्रांची छाननी करून त्यावेळी निवडणूक प्रक्रिया सुरू करणार आहेत. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले काम पाहणार असून मास्कचा वापर सोशल डिस्टंसिंग सॅनी टायझर चा वापर तसेच सर्दी व खोकताना काळजी घ्यावी इ कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना प्रत्येकी 5 सदस्य, भारतीय जनता पक्षाचे 4 व काँग्रेस बसपा यांचा प्रत्येकी 1 सदस्य असे बलाबल आहे. मनपा मध्ये भाजपा - राष्ट्रवादी युती आहे तर राज्यात शिवसेना - राष्ट्रवादी - काँग्रेस अशी महा विकास आघाडीची सत्ता असल्यामुळे स्थायीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत वरून कीर्तन व आतून तमाशा पार पडणार आहे. बसपा व काँग्रेस पक्षाचं प्रत्येकी 1 सदस्य यांची भूमिकाही या निवडणुकीत महत्त्वाची असणार आहे. राष्ट्रवादीकडून अविनाश घुले, शिवसेनेकडून विजय पठारे, भाजपाकडून रवींद्र बारस्कर हे स्थायी समिती सभापती पदाची संभाव्य उमेदवार आहेत. सभापती पदासाठी शिवसेना व भाजपानेही जोर लावला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी आहे; परंतु नगर शहरात मात्र सेना व राष्ट्रवादीचा सूर जुळलेला नाही.
गेल्या चार महिन्यांत हे दोन्ही पक्ष एकत्र आले नसून, त्यांच्यात हा दुरावा कायम आहे. त्यामुळे सेनेने नेहमीप्रमाणे सभापती पदाच्या निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच भाजपाने महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीची मदत घेतली. त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीत उमेदवार न देता राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याच्या विचारात शहर भाजपा होते; परंतु वरिष्ठांनी उमेदवार देण्याच्या सूचना केल्याने त्यांच्याकडून रवींद्र बारस्कर यांचा अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता आहे. हे तिन्ही पक्ष सभापती पदाच्या निवडणुकीत उतरल्यास सदस्यांचे महत्त्व वाढणार आहे.
सभापती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करून राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे करण्याची दोन्ही पक्षांची खेळी दिसते. शिवसेनेकडून पठारे यांचा अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता आहे. मागील सभापती निवडीच्यावेळीही नगरसेवक योगिराज गाडे यांनी अर्ज दाखल केला होता; परंतु ऐनवेळी तो मागे घेण्यात आला होता. त्याचीच पुनरावृत्ती यावेळी होणार की सेना व राष्ट्रवादीत लढत होणार, याची उत्सुकता आहे. शिवसेनेकडून ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यास सेना व राष्ट्रवादीत सभापती पदासाठी लढत होईल. राष्ट्रवादीला बहुमतापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाची मदत घ्यावी लागेल. भाजपाकडून उमेदवार दिल्यास मोठी अडचण निर्माण होणार असून, भाजपाचा पाठिंबा मिळविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.

No comments:

Post a Comment