‘अवेक क्रेनिओटॉमी’ने मेंदूतील ट्यूमर काढला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 1, 2021

‘अवेक क्रेनिओटॉमी’ने मेंदूतील ट्यूमर काढला

 ‘अवेक क्रेनिओटॉमी’ने मेंदूतील ट्यूमर काढला

डॉ. अमोल कासवा यांच्याकडून ’नोबल’मध्ये अतिप्रगत तंत्राने शस्त्रक्रिया


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः वैद्यक क्षेत्रातील अतिप्रगत ‘अवेक क्रेनिओटॉमी’ तंत्राने मेंदूतील ट्यूमर काढून टाकण्याची शस्त्रक्रिया ‘नोबल हॉस्पिटल’मध्ये नुकतीच करण्यात आली. मेंदू व मणकेविकार तज्ज्ञ डॉ. अमोल कासवा यांनी ही शस्त्रक्रिया केली. त्यामुळे रुग्णाला पक्षाघात होण्याचा संभाव्य धोकाही पूर्णपणे टळला.
अत्यंत महत्त्वाचा व गुंतागुंतीचा अवयव असलेल्या मेंदूवर शस्त्रक्रिया करताना रुग्ण पूर्ण शुद्धीवर होता, हेच त्या शस्त्रक्रियेचे वैशिष्ट्य होय. आतापर्यंत यासाठी रुग्ण पुणे किंवा मुंबई येथे जात. ते अत्याधुनिक तंत्रज्ञान आता नगरमध्येही सहजपणे उपलब्ध आहे.
जिल्ह्यातील रहिवासी असलेला हा रुग्ण जेमतेम 27 वर्षांचा व त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता. ’फिट’ येण्याचा त्रास त्याला दीर्घ काळापासून चालू होता. अधिक उपचारासाठी तो काही दिवसांपासून डॉ. कासवा यांच्याकडे येत होता. पुण्यात केलेल्या विविध ‘एम. आर. आय.’मधून त्याच्या मेंदूच्या उजव्या भागात ट्यूमर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे डाव्या हात-पायाला पक्षाघात होण्याचा धोका होता. हे लक्षात घेऊन ट्यूमर तातडीने काढून टाकणे आवश्यक होते. डॉ. अमोल कासवा म्हणाले, “शरीराच्या डाव्या बाजूचे नियंत्रण मेंदूच्या उजव्या भागातून होते. तेथेच ट्यूमर होता. वैद्यकीय परिभाषेत त्याला ‘राईट फ्रंटल ट्यूमर’ म्हणतात. त्याला अगदी चिकटूनच डाव्या हाताचे नियंत्रण करणारे केंद्र होते. ट्यूमर आणि ‘लेफ्ट साईड कंट्रोल एरिया’ यांतील अंतर अवघ्या 1-2 मिलीमीटरचे होते. ते पाहता गाठ काढणे मोठ्या कौशल्याचे काम होते. ट्यूमर काढताना नियंत्रण केंद्राला धक्का पोहोचून डाव्या हाताला पक्षाघात होण्याचा धोका होता.” सर्वसाधारणपणे मेंदूतील ट्यूमर काढण्याची शस्त्रक्रिया करताना रुग्णाला पूर्ण भूल दिली जाते. या रुग्णाला असलेला पक्षाघाताचा धोका लक्षात घेऊन ‘अवेक क्रेनिओटॉमी सर्जरी’ करण्याचा निर्णय घेतला, असे डॉ. कासवा म्हणाले. ’नोबल हॉस्पिटल’मध्ये 16 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेली शस्त्रक्रिया अडीच तास चालली. त्या दरम्यान रुग्ण पूर्ण शुद्धीवर होता. त्यानंतर तीन दिवसांनी रुग्णाला डिस्चार्ज दिला. तो स्वतःच्या पायांनी चालत घरी गेला. तो आता व्यवस्थित व पूर्ण बरा आहे, असे ते म्हणाले. या शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. अशोक देठे यांनी काम पाहिले. शस्त्रक्रियेचे गुंतागुंतीचे स्वरूप पाहता ‘इलेक्ट्रो फिजिऑलॉजिकल मॉनिटरिंग’साठी अहमदाबाद येथील तज्ज्ञ उपस्थित होते. आधुनिक तंत्राने महत्त्वाची शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल डॉ. कासवा यांचे विशेष कौतुक करताना ‘नोबल हॉस्पिटल’चे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. बापूसाहेब कांडेकर म्हणाले की, अशा नाजूक व महत्त्वाच्या शस्त्रक्रियांसाठी यापुढे पुण्या-मुंबईसारख्या महानगरांमध्ये जाण्याची गरज राहिली नाही. त्या नगरमध्येही सहज करता येतात, हेच डॉ. कासवा यांनी दाखवून दिले आहे. न्यूरो सर्जन डॉ. अमोल कासवा यांनी मुंबईच्या जी. एस. मेडिकल कॉलेज व के. ई. एम. रुग्णालयातून एम. सीएच. (मास्टर ऑफ चिरुरगी) पदवी उत्तम गुणांनी प्राप्त केली. ‘नोबल हॉस्पिटल’मध्ये ते 2017पासून न्यूरो सर्जन म्हणून काम करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी 650 ते 700 शस्त्रक्रिया करून मेंदू व मणक्याच्या विकारांनी त्रस्त असलेल्या शेकडो रुग्णांना दिलासा दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here