वसंत लोंढा आणि सुहास मुळे यांना लॉरीस्टर ऑफ मासेस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 23, 2021

वसंत लोंढा आणि सुहास मुळे यांना लॉरीस्टर ऑफ मासेस

 वसंत लोंढा आणि सुहास मुळे यांना लॉरीस्टर ऑफ मासेस

स्व. दिलीप गांधी आणि अ‍ॅड.आर.आर. पिल्ले यांना श्रध्दांजली

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या मोठ्या गावांना लोकमान्य उपतालुक्याचा दर्जा देऊन गावांचा विकास साधण्याचा प्रस्ताव पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारकात मांडण्यात आला. तर राज्यातील 120 प्रगत गावांना 1 मे महाराष्ट्र दिनी लोकमान्य उपतालुक्याचा दर्जा देण्याची मागणी संघटनांच्या वतीने करण्यात आली. तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारे सामाजिक कार्यकर्ते वसंत लोंढा आणि सुहास मुळे यांना लॉरीस्टर ऑफ मासेस बहुमानाने सन्मान करण्यात आला.
   प्रारंभी माजी केंद्रीय राज्यमंत्री स्व. दिलीप गांधी आणि सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.आर.आर. पिल्ले यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. उपस्थितांच्या हस्ते 120 प्रगत गावांना 1 मे महाराष्ट्र दिनी लोकमान्य उपतालुक्याचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाचे पूजन करण्यात आले. तसेच नागरिकांच्या निरोगी व सदृढ आरोग्यासाठी आरोग्य धनसंपदा मोहिमेची घोषणा करण्यात आली. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, जालिंदर बोरुडे, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका जाधव, पद्मा गोरख, गोपीनाथ म्हस्के, संगीता साळुंके, शारदा भालेकर, फरिदा शेख, सुशीला देशमुख आदी उपस्थित होते.  
   ग्रामीण महाराष्ट्रात असलेल्या तालुक्यासह इतर मोठ्या गावांचा विकास साधण्यासाठी लोकमान्य उपतालुक्यांची निर्मिती होणे आवश्यक आहे. यामुळे ग्रामीण भागात स्वयंरोजगार, निवारा, आरोग्य व उच्च शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच निरोगी व सदृढ आरोग्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने व्यायाम करण्याची गरज आहे. सकाळी लवकर उठून निशुल्कपणे व्यायाम करता येऊ शकतो. यासाठी चालना देण्याची गरज असून, संघटनेने आरोग्य धनसंपदा मोहिम सुरु करण्यात आल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तर नगर जिल्ह्यातील मिरजगाव, तळेगाव दिघे, तिसगाव, साकुर, आष्टी, घारगाव इत्यादी गावांना उपतालुक्याचा दर्जा देण्याची मागणी संघटनेने लाऊन धरली आहे. मोठ्या गावांना लोकमान्य उपतालुक्याचा दर्जा दिल्यास उच्च शिक्षण संकुलाची निर्मिती होऊ शकणार आहे. त्याशिवाय लघु उद्योगांचा विकास व स्वयंरोजगार निर्माण होऊन विकास साधला जाणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment