महाराष्ट्राची ‘स्पिडो गर्ल’ ठरली अहमदनगरची अपूर्वा गोरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 9, 2021

महाराष्ट्राची ‘स्पिडो गर्ल’ ठरली अहमदनगरची अपूर्वा गोरे

 महाराष्ट्राची ‘स्पिडो गर्ल’ ठरली अहमदनगरची अपूर्वा गोरे

भरारी राज्यस्तरीयमध्ये सुवर्ण, राष्ट्रीय स्पर्धेत सायकलिंगमध्ये कांस्य

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः 
ग्रामीण भागातून येऊन सायकलिंगबाबत कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही तिने हौस म्हणून सायकलिंगला सुरुवात केली. पण प्रचंड आत्मविश्वास आणि सलगचा सराव या जोरावर अवघ्या 2 वर्षांत वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी वेरूळ येथील 25 व्या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक, तर नवी मुंबई येथील 25 व्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत कांस्यपदक मिळवत अहमदनगरची अपूर्वा गोरक्ष गोरे महाराष्ट्राची स्पिडो गर्ल बनली.
   अपूर्वा गोरे ही जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या रेसिडेंशील हायस्कूलमध्ये दहावीत शिकत आहे. वडील गोरक्ष आणि आई सुलक्षणा शिक्षक म्हणून नगर तालुक्यात रांजनी येथे कार्यरत असून नगर तालुक्यातील रुईछत्तीसी हे त्यांचे मूळ गाव आहे. ग्रामीण भागातून आलेल्या अपूर्वाला सायकलिंगची कोणतीही पार्श्वभूमी नाही. पण हौस म्हणून तिने सायकलिंगला सुरुवात केली. शिवछत्रपती पुरस्कार विजेते रवींद्र करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करताना अवघ्या 2 वर्षांत तिने वेगवेगळ्या ठिकाणच्या स्पर्धा जिंकण्याच्या सपाटा लावला. वय वर्ष 15 वर्षे असताना तिच्या वयापेक्षा जास्त वयोगटात खेळून तिने वयाने जास्त असणार्‍या स्पर्धकांना धूळ चारली. एवढेच नव्हे, तर अगदी मुले स्पर्धक असणार्‍या स्पर्धेतही तिने मुलांनाही मागे टाकले. अपूर्वा हिने 2019-20 मध्ये बिकानेर, राजस्थान येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात खेळताना 10 किमी अंतर 16 मिनिटे आणि 8 सेकंदात पार करत रौप्यपदक मिळवले. त्याच वर्षी गुवाहाटी, आसाम येथे खेलो इंडिया ही स्पर्धा पार पडली वय वर्षे 14 असतानाही ती 17 वर्षे वयोगटात खेळत भारतात पाचवी आली. जानेवारी 2021 मध्ये वेरूळ या ठिकाणी 25 व्या राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली. त्यात राज्यातील 34 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत मुलं आणि मुली एकत्र होते. त्यात अपूर्वा हिने घाट, उलट वारा यांना तोंड देत 10 किमी अंतर 16 मिनिटे आणि 21 सेकंदात पार करत सुवर्णपदक प्राप्त केले. नुकत्याच नवी मुंबई येथे 5 मार्च 2021 रोजी झालेल्या 25 व्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत तिने कांस्यपदक प्राप्त केले. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांतील 35 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ताशी 35.31 किमी वेगाने सायकल लावताना तिने 10 किमी अंतर 16 मिनिटे आणि 59 सेकंदात पार केले. तिचे सुवर्णपदक अवघ्या 16 सेकंदानी हुकले. तरीही निराश न होता तिने दुसर्‍या दिवशी मास स्टार्ट स्पर्धेतही भाग घेतला.
भारतासाठी खेळायचे आहे
माझे प्रशिक्षक रवींद्र करांडे, वडील गोरक्ष गोरे माझा सराव घेतात. नगरमध्ये सरावासाठी सायकलिंगचा ट्रॅक उपलब्ध नाही. मी नगर-कल्याण रोड, नगर-औरंगाबाद रोडला भल्या पहाटे सराव करते. पुढे पुणे बालेवाडी येथे जाऊन सराव करणार असून आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळून पदक मिळवत भारताचे, अहमदनगरचे आणि माझ्या रुईछत्तीसी गावचे नाव उज्ज्वल करायचे आहे, असे अपूर्वा गोरे हिने सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here